Struggle of meritorious 'Lakshmi Gaokar' Dainik Gomantak
गोवा

Navratri 2023: कर्तबगार ‘लक्ष्मी गावकर’

Navratri 2023: नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीची उपासना आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा सण! राज्यात आजपासून ठिकठिकाणी देवीच्या मूर्ती स्थानापन्न होत आहेत.

Manaswini Prabhune-Nayak

Navratri 2023: नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीची उपासना आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा सण! राज्यात आजपासून ठिकठिकाणी देवीच्या मूर्ती स्थानापन्न होत आहेत. तेथे मनोभावे आराधना सुरू होत आहे. पण वाचकहो, आपल्या आजूबाजूला देवीची, स्त्री शक्तीची चालती-बोलती अनेक रूपं आहेत, ती तुमचं-आमचं जीवन सुखमय करत आहेत.

त्यांपैकी एक म्हणजे नेत्रावळी परिसरात कार्यरत, महिलांच्या विकासासाठी, कल्याणासाठी झटणाऱ्या कष्टकरी लक्ष्मी गावकर या रणरागिणी आहेत. अनेक कठीण प्रसंगांवर मात करून ग्रामीण भागातील महिलांसाठी त्या मौलिक योगदान देत आहेत. नवदुर्गा या खास सदरातून कर्तबगार लक्ष्मी यांच्या प्रवासाचा वेध घेताना त्यांना ‘गोमन्तक''तर्फे मानाचा मुजरा!!

मनस्विनी प्रभुणे-नायक

त्रावळी हे घनदाट जंगलाने वेढलेले सुंदर गाव. यातल्या कोणत्याही वाड्यावर जा येथील जंगल तुम्हाला सोबत करत असतं. २००९ साली तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी ''आदर्श ग्राम'' या योजनेत निवड केली

होती. या गावात अनेक महिला बचतगट होते, पण सगळे एकत्र येणे कठीण असायचे. खूप उत्साही, कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या, आपल्या संसाराला आर्थिक हातभार लावता येईल, या उद्देशाने वाट्टेल ते कष्ट उपसणाऱ्या या महिला मला या गावाचा मुख्य चेहरा वाटतात. त्यांचा उत्साह बघून आपण त्यांच्यापुढे कमी पडतोय कि काय? असेच वाटत राहायचे. नेत्रावळी आदर्श ग्राम योजनेतून ‘नेत्रावळी महिला उद्योग समूह’ची स्थापना झाली आणि गावातल्या महिलांना एकत्र यायला हक्काचे व्यासपीठ मिळाले.

वरवर एकदम साध्या दिसणाऱ्या, कमी बोलणाऱ्या या महिला संघर्षाची वेळ येताच अटीतटीला जाऊन पेटून उठतात. आपल्या गावातल्या लोकांचे जीवनमान सुधारले पाहिजे, एवढाच त्यांचा स्वार्थ असतो. गोवा शासनाच्या ‘नियोजन आणि सांख्यकी’ विभागाकडे ‘आदर्श ग्राम योजना’ राबविण्याचे काम असल्यामुळे या विभागाच्या आणि सीडीपीआर या संस्थेच्या माध्यमातून नेत्रावळीत महिलांच्या आर्थिक विकासासाठी छोटे छोटे व्यवसाय सुरू करण्याचे एक मॉडेल तयार करण्यात आले होते.

‘माटोळी बाजार’ हा त्याचाच एक भाग होता. या प्रकल्पाच्या निमित्ताने नेत्रावळीतील डोंगरावरील वेर्ले गावात राहणाऱ्या लक्ष्मी गावकरांशी ओळख झाली. वरवर साधी दिसणारी पण अतिशय करारी, चपळ असणाऱ्या लक्ष्मी गावकरने प्रकल्पातील प्रत्येक कामात सहभाग घेतला. त्यात ‘माटोळी बाजार’ हा महत्त्वाचा प्रकल्प होता.

नेत्रावळीतून लक्ष्मी गावकर ही एकमेव महिला माटोळी बाजाराला जायची. तिला एकटीलाच माटोळी बाजाराचा अनुभव होता. नेत्रावळीतील बाकी साऱ्या महिला गावातल्या भाटकारांच्या कुळागरात रोजंदारीवर काम करायच्या. गावातील महिलांचे आठ - दहा बचत गट होते, पण एकमेकींशी सुसंवाद नव्हता.

त्यामुळे माटोळी बाजाराची कल्पना जेव्हा त्यांच्यापुढे ठेवण्यात आली, तेव्हा त्यांच्यातील सर्वांनीच ती धुडकावून लावली. आम्हाला त्याचा अनुभव नाही, आम्ही कसा हा बाजार भरवणार? आम्हाला घरातून बाहेर सोडणार नाहीत, नवऱ्याला आवडणार नाही, अशी अनेक कारण इतर महिलांकडून सांगण्यात येत होती.

‘आम्ही तुम्हांला माटोळीचे सर्व सामान देतो. पण आम्ही तिथे येऊ शकणार नाही’ असेही अनेक ग्रुपकडून सांगण्यात आले. शेवटी त्यांच्यातील लक्ष्मी गावकर पुढे आली आणि तिने मडगावला माटोळी बाजार करण्यासाठी नेत्रावळीतील सर्व महिलांना तयार केले. लक्ष्मी अनुभवी असल्यामुळे सर्व महिलांनी तिच्यावर विश्वास टाकला. लक्ष्मीतील नेतृत्व गुण त्यावेळी सर्वांसमोर आले.

लक्ष्मी कधी शाळेत न गेलेली, अक्षर ओळख नसलेली. पण साक्षर लोकांनाही लाजवेल, अशी आर्थिक व्यवहारात हुशार. उद्या लक्ष्मीला जर म्हटलं कि आपल्याला लंडनला जाऊन माटोळी बाजार भरवायचाय तर ती तिथे जाऊन तिथल्या गोऱ्या लोकांना माटोळी विकून येईल, अशा लक्ष्मीप्रत्येक बचत गटालासोबत घेऊन गेल्या. तिच्यामुळे काहीजणी माटोळी बाजारासाठी तयार झाल्या. नेत्रावळीतील आदर्श ग्राम योजनेच्या ऑफिसमध्ये महिलांची लगबग सुरू झाली.

माटोळी बाजाराची तयारी बघून ज्या महिला यात सहभागी व्हायला तयार नव्हत्या, त्या देखील तयार झाल्या आणि २०१३ ला मडगावात पहिला नेत्रावळी माटोळी बाजार भरला. नेत्रावळीतील बचत गटांमधील महिलांनी हा माटोळी बाजार प्रसिद्ध केला. यंदाच्या वर्षी या माटोळी बाजाराला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. याचे श्रेय लक्ष्मी गावकर यांना द्यावे लागले.

पहिल्यांदा पणजी दर्शन! : २०१३ च्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नेत्रावळीतील महिलांना ''फूड स्टॉल'' देण्यात आला होता. त्यात ‘केटरींग’चे प्रशिक्षण दिलेल्या महिलांना संधी देण्यात आली. इफ्फीतील या फूड स्टॉलसाठी नेत्रावळीतील महिलांना दहा दिवस पणजीमध्ये येऊन राहावे लागणार होते. परत महिला पणजीला यायला तयार नव्हत्या. पण लक्ष्मी गावकर मात्र एका पायावर तयार होती. तिला अशा प्रकारचे काम फार आवडते. परत तिचा उत्साह बघून एक एक करून सात-आठजणी पणजीत यायला तयार झाल्या. पणजीत या सगळ्याजणी पहिल्यांदा आल्या.

सकारात्मक उदाहरण! : लक्ष्मीला पणजीची कोणतीही माहिती नव्हती, पण फूड स्टॉलसाठी लागणारी रोजची ताजी भाजी - ताजी मासळी खरेदी करायला ती एकटीच बाहेर पडली. नेत्रावळीच्या जंगलात राहणाऱ्या या महिलेने पणजीची भाजी मंडई आणि मासळी बाजार शोधून काढला. तिच्यातल्या या धाडसी वृत्तीला वेगवेगळ्या प्रकल्पांच्या निमित्ताने संधी मिळाली. कधीही शाळेत न गेलेल्या लक्ष्मीचे आर्थिक ज्ञान फार चांगले आहे. वेर्ले या दुर्गम गावात लक्ष्मी गावकरसारखी कार्यकर्ती तयार होणे, हे गावाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक उदाहरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT