सासष्टी : मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी शुक्रवार, ४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता पालिका मंडळाची खास बैठक बोलावली आहे. या बैठकीत वैधानिक समित्यांचे गठन होणार आहे. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी भाजपमध्य़े प्रवेश केल्याने ते पाठिंबा देत असलेले नगरसेवकही भाजपवासी झाले. तरीही या समित्यांवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी मूळ भाजपचे आणि आमदार दिगंबर कामत यांचा पाठिंबा असलेल्या नगरसेवकांमध्ये चढाओढ असेल.
पालिकेत भाजपप्रणित नगरसेवकांची संख्या नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ धरून १७ आहे, तर घन:श्याम शिरोडकर हे अपक्ष आणि गोवा फॉरवर्डचे सात नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपप्रणित नगरसेवकांचे या समित्यांवर वर्चस्व राहील, हे नक्की. उद्याच्या बैठकीत समित्यांवरील सदस्यांची निवड हात उंचावून होईल की, गुप्त मतदानाद्वारे, ते उद्याच स्पष्ट होईल. या समित्यांवर जाण्यासाठी इच्छुक नगरसेवकांनी अर्ज शुक्रवारी १ वाजेपर्यंत मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.
उपनगराध्यक्ष निवडीचा निर्णय पुढील आठवड्यात
समित्यांतील सदस्यांची निवड सुरळीत व्हावी यासाठी मंगळवारी सर्व भाजपप्रणित नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला आमदार दिगंबर कामत, माजी आमदार दामू नाईक, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर उपस्थित होते. या बैठकीत उपनगराध्यक्ष निवडीवर चर्चा झाली. उपनगराध्यक्ष निवडीसंबंधीचा निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाईल, असे नगरसेवकांना सांगण्यात आले. गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनीही आमदार विजय सरदेसाई यांच्याबरोबर चर्चा केली.
या समित्यांसाठी सदस्यांची होणार निवड
यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या विशेष बैठकीत आठ सदस्यांची स्थायी समिती निवडण्याचा निर्णय झाला होता. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष हे या समितीचे कायमस्वरूपी सदस्य असल्याने सहा इतर नगरसेवकांची नियुक्ती उद्या केली जाईल. शिवाय बाजार समिती, स्वच्छता, बाग, वाचनालय व्यवस्थापन उपसमित्याही निवडण्यात येतील. या समित्यांमध्ये जास्तीत जास्त पाच नगरसेवकांना सामावून घेण्याचे ठरले होते. जुन्या मार्केटमध्ये वाहने ठेवण्यासाठी असलेल्या गॅरेजचे व्यवस्थापन करण्यासाठी दोन सदस्यीय समितीही उद्याच्या बैठकीत निवडण्यात येणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.