पणजीः महापौरपदाच्या निवडीत जरी एकांगी स्वतःचा निर्णय प्रमाण असल्याचे दर्शविले असले, तरी उपमहापौरपदी मूळ भाजपच्या कार्यकर्त्याला बसविण्यातही आपलाच हुकूम चालणार, हे आमदार अतानासियो (बाबूश) मोन्सेरात यांनी दाखवून दिले आहे. पणजीवर वर्चस्व ठेवायचे झाल्यास पुढील २०२१ मधील निवडणुकीत महापालिकेच्या ३० जागांवर आपल्या मर्जीतील आणि आपण ठरवलेले उमेदवार निवडून आणण्याची व्यूहरचना आमदारांची असणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.
पणजी ताब्यात ठेवायची झाल्यास महापालिकेतही आपल्या मर्जीतील नगरसेवक असणे गरचे आहे, हे मोन्सेरात यांना चांगलेच माहीत आहे. धक्कादायक निर्णयासाठी परिचित असलेल्या बाबूश मोन्सेरात यांची गेली पंधरा वर्षांपासून महापालिकेत सत्ता आहे. एवढ्या वर्षांच्या कालावधीत ज्या गतीने महापालिकेत विकासकामे होणे आवश्यक होते, त्याप्रमाणात ती झालेली नाहीत. कारण पणजीचे आमदारपद माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे होते. पर्रीकर आणि बाबूश यांची दोस्ती अनेक राजकीय विश्लेषकांना विचार करायला लावणारी ठरली आहे.
मनोहर पर्रीकर यांच्या पश्चात मोन्सेरात यांनी पणजीचे आमदारपद स्वतःकडे खेचून घेतले आणि भाजपमध्ये प्रवेश केला. सत्ताधारी गटात असल्यामुळे महापालिकेची अनेक विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत. आमदार आणि महापालिकेच्या माध्यमातून विकासकामे करणे शक्य असल्याचे त्यांना चांगलेच उमगले आहे. महापौरपदाच्या नावावर केवळ बाबूश मोन्सेरातच निर्णय घेतील, हे ज्याअर्थी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे सांगतात, त्यावरून मोन्सेरात यांचाच निर्णय अंतिम राहणार हे निश्चित होते.
भाजपमध्ये आल्याने उपमहापौरपद भाजपच्या मूळ नगरसेवकाला देणे आवश्यक होते आणि घडलेही तसे. त्यांनी वसंत आगशीकर या नावाला सहमती दर्शविली, त्यामागे असलेले कारण जानकारांना सहज उमगणारे आहे. सध्या मोन्सेरात हे संघटक सतीश धोंड यांच्याच अधिकतर संपर्कात असतात. उपमहापौरपदी आगशीकरांच्या निवडीचा निर्णयही धोंड यांच्या चर्चेअंतीच घेण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न
महापालिकेत ३० ठिकाणी नगरसेवक निवडून आणण्याचे मोन्सेरात यांनी जी मनीषा बाळगली आहे, याबाबत त्यांनी एका यूट्यूबवरील चॅनलकडे तसे बोलून दाखविले आहे. ३० नगरसेवकांपैकी २१ नगरसेवक शहरात येतात, त्यामुळे पुढील विधानसभेची निवडणूक सहज सोपी जावी हा त्यामागील दृष्टीकोन आहे.
काही झाले तरी मोन्सेरात यांच्याशी चर्चा केल्याशिवाय पक्ष कोणताच निर्णय घेणार नाही, हेही निश्चित असल्याने विद्यमान नगरसेवकांमध्ये किती जणांना पुन्हा संधी मिळतेय हे मात्र महापालिकेच्या निवडणुकीवेळी निश्चित होणाऱ्या उमेदवारांच्या यादीनंतरच स्पष्ट होईल. एकंदर पणजीविषयी निर्णय घेताना बाबूश यांना बरोबर घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, हे भाजपला केव्हाच ज्ञात झाले असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.