St Estevam Incident
पणजी: बेपत्ता बाशुदेवचे वडील नारायण भंडारी हे गोव्यात आले असून बाशुदेवचे थोरले बंधू बलराम हेही पोखरा नेपाळ येथून येऊन गोव्यात भावाचा शोध घेत आहेत. बाशुदेवने २७ ऑगस्ट रोजी गोव्यात आल्यानंतर फिरण्यासाठी कार भाड्याने घेतली होती. त्या कारमध्ये कारमालकाने ट्रॅकर बसविला होता. त्या आधारे ती कार ३१ ऑगस्टच्या रात्री कुठे कुठे गेली, याची माहिती नारायण यांनी आज घेतली. त्यासाठी उत्तर गोव्यात जाऊन त्या कारमालकाची आज त्यांनी भेट घेतली.
त्या कारमालकाने नारायण यांना दिलेल्या माहितीनुसार, साखळीतील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेपासून ५०० मीटरवर असलेल्या हॉटेलपासून संस्थेच्या फाटकापर्यंत रेंज नसल्याने ट्रॅकिंग उपकरण काम करत नव्हते. संस्थेच्या फाटकासमोरून ही कार रात्री १२.४३ वाजता गेली. हॉटेलमधील सीसीटीव्हीतील माहितीनुसार, मध्यरात्री १२.३३ वाजता हॉटेलमधून कार निघाली, तर ५०० मीटर अंतर कापण्यासाठी १० मिनिटे का लागली, हा प्रश्न आहे.
त्यानंतर माशेल परिसरात कारमधील ट्रॅकर काम करत नव्हता. आमोणा पूल ओलांडल्यानंतर ट्रॅकरने काम बंद केल्याने कारचा पुढील प्रवास समजून येत नाही. १ वाजून ४ मिनिटांनी ती कार एका पेट्रोल पंपवर गेल्याची माहिती ट्रॅकरकडून उपलब्ध झाली आहे. आता नारायण त्या पेट्रोल पंपवर जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून कार कोण चालवत होता, याची माहिती घेणार आहेत.
मध्यरात्री बुडालेली कार कोण चालवत होता, याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे साखळी ते सांतइस्तेव दरम्यानच्या एका पेट्रोल पंपवर ती कार मध्यरात्री १ वाजून ४ मिनिटांनी गेली होती, तेथील सीसीटीव्हीत कार कोण चालवत होता याचे चित्रण मिळते का, याची चौकशी करण्यात येणार आहे. बाशुदेव भंडारी हा अहमदाबाद येथील तरुण कार बुडाल्यापासून बेपत्ता झाला असून त्या कारमधील युवती पोहून नदीबाहेर आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.