I-League Football Tournament: आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता शर्यतीत कायम राहताना स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने शनिवारी एफसी बंगळूरु युनायटेडवर 1-0 असा निसटता विजय नोंदवून आय-लीग 2 स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला. सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला.
दरम्यान, गोलशून्य बरोबरीनंतर स्पोर्टिंग क्लब गोवासाठी निर्णायक ठरलेला गोल अलिस्टर अँथनी याने 52व्या मिनिटास नोंदवला. मागील लढतीत केंकरे एफसीला नमविलेल्या स्पोर्टिंग क्लब गोवाचा हा सलग दुसरा विजय ठरला. त्यांचे आता 10 लढतीनंतर 16 गुण झाले आहेत. लागोपाठ दुसरा सामना गमावणे एफसी बंगळूरु युनायटेडसाठी धक्कादायक ठरले. त्यामुळे 10 सामन्यानंतर त्यांचे 19 गुण व दुसरा क्रमांक कायम राहिला. स्पोर्टिंग क्लब गोवाचा पुढील सामना 11 एप्रिल रोजी स्पोर्टिंग क्लब बंगळूरुविरुद्ध होईल.
बंगळूरु येथे बलाढ्य स्पोर्टिंग क्लब बंगळूरविरुद्ध धेंपो स्पोर्टस क्लबला पराभवाचा धक्का बसला. दहा खेळाडूंसह खेळताना धेंपो क्लबला 0-3 फरकाने सामना गमवावा लागला. सामन्याच्या 59व्या मिनिटास त्यांच्या ब्रायन फारिया याला दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. सलग दोन विजयानंतर स्पर्धेतील एकंदरीत तिसरा पराभव पत्करल्यामुळे धेंपो क्लबचे 10 सामन्यानंतर 17 गुण व तिसरा क्रमांक कायम राहिला.
दुसरीकडे, स्पोर्टिंग क्लब बंगळूरुने अग्रस्थान बळकट करताना 10 सामन्यांत एकंदरीत आठवा, तर सलग पाचवा सामना जिंकला. त्यांचे आता सर्वाधिक 24 गुण झाले आहेत. विशेष बाब म्हणजे, त्यांनी आता दुसऱ्या क्रमांकावरील संघापेक्षा पाच गुण जास्त प्राप्त केले आहेत. आरिफ शेख याने सामन्याच्या पहिल्याच मिनिटास गोल केल्यानंतर चोंगथाम किशन सिंग याने 13व्या मिनिटास स्पोर्टिंग बंगळूरची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. आरिफने 90+1व्या मिनिटास बंगळूरुमधील संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.