Dainik Gomantak Dainik Gomantak
गोवा

अजूनही मतभेद, अजूनही अडथळे, अनेक प्रश्‍न...

‘गोव्‍याची संकल्‍पना’ परिसंवादात मान्‍यवरांचे विचारमंथन : ‘गोमन्तक टीव्ही’चा उपक्रम

दैनिक गोमन्तक

दै. ‘गोमन्तक’च्या हीरकमहोत्‍सवी वर्धापनदिनानिमित्त ‘गोमन्तक टीव्ही’ने आयोजित केलेल्या ‘गोव्याची संकल्पना’ (आयडियाज्‌ ऑफ गोवा) या विषयावरील परिसंवादाच्या माध्यमातून मान्यवर-विचारवंत, अध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, उद्योजक, चित्रकार, कलाकार अशा गोव्यातील विविध क्षेत्रांतील बुद्धिजीवी विषयतज्ज्ञ मंडळींना एका व्यासपीठावर आणले होते. त्या वक्त्यांनी अगदी दिलखुलासपणे आणि तेवढ्याच सडेतोडपणे मतप्रदर्शन केले. (special program organized by dainik gomantak occasion of 60th anniversary)

या परिचर्चेचे संचालन करणारे ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी उपस्थित केलेल्या काही महत्त्वपूर्ण तथा गंभीर स्वरूपाच्या मुद्यांच्या अनुषंगाने त्या वक्त्यांनी अभिव्यक्त केलेल्या विचारांमुळे गोमंतभूमीप्रति असलेली त्यांची आत्मीयता आणि कळवळा ठळकपणे दिसून आला. पिळर्ण औद्योगिक वसाहतीत असलेल्या डॉ. सुबोध केरकर यांच्या ‘म्युझियम ऑफ गोवा’मध्ये हा परिसंवाद झाला.

गोव्याच्या सर्वांगीण भवितव्याचा विचार व्हावा

‘गोमन्तक’ दैनिक सुरू होऊन 60 वर्षे पूर्ण होत आहेत. दुसरीकडे ‘गोमन्तक टीव्ही’ अलीकडेच सुरू झाली आहे. गोवा मुक्तिनंतर सुमारे 61 वर्षे उलटली आहेत आणि या पार्श्वभूमीवर ‘गोव्याची संकल्पना’ या विषयावरील हा परिसंवाद ‘गोमन्तक टीव्ही’ने आयोजित केल्याचे संपादक-संचालक प्रास्ताविकपर मनोगतात म्हणाले. विषय-प्रतिपादन करताना त्यांनी स्पष्ट केले की, ‘गोव्याची संकल्पना’ असे म्हटल्यानंतर सगळीच माणसे कासावीस होत असतात. गोवा म्हणजे नेमके काय, हा मुद्दा त्या अनुरोधाने उपस्थित होत असतो. यासंदर्भात सालसेत तालुक्यातील लोकांची प्रतिक्रिया विचारल्यास त्यांच्याकडून एक वेगळेच उत्तर मिळते. त्यांची दृष्टी पोर्तुगालकडे लागली आहे की काय, असे वाटते. परंतु या प्रश्नावर बार्देशवासीयांचे उत्तर वेगळे तथा परस्परभिन्न असते व ते या विषयावर कासावीसही होतात. यासंदर्भात सत्तरी, पेडणे किंवा काणकोण (Canacona) या तालुकावासीयांचा दृष्टिकोनही वेगळाच असतो, हे तर आपल्याला माहीतच आहे. खाण व पर्यटन या व्यवसायातील ‘अती’चा मुद्दाही उपस्थित झाला आहे. कारण, परस्परविरोधी मते त्यासंदर्भात व्यक्त केली जात आहेत. या विषयात गोव्याची सामाजिकता दडलेली आहे. त्यामुळे गोव्यातील लोकांनी एकत्रित येऊन गोव्याच्या सर्वांगीण भवितव्याचा विचार करायला नको का, असे आम्हाला प्रकर्षाने वाटते. केवळ राजकारण्यांना दोष देऊन उपयोगाचे नाही. प्रशासनही तेवढेच जबाबदार आहे, हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे. काही का असेना, गोव्याची संकल्पना ठरविण्याची वेळ साठ वर्षांनंतरही निर्माण झाली आहे. गोव्यात जे पर्यटक येतात ते जाताना गोव्याची स्मृती, गोव्याचे प्रतीक म्हणून काहीतरी नेतात. हे प्रतीक नेमके काय? मद्याची बाटली की काजूच्‍या बिया? हाही प्रश्न आहे. क्‍लॉड आल्वारीस यांच्यासारख्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी गोव्याच्या अस्मितेच्या रक्षणार्थ कार्य केले नसते तर गोवा कधीच विकला गेला असता. म्हणून आम्हाला गोव्याच्या स्वयंपोषक विकासासाठी या विषयावरील चर्चा महत्त्वाची वाटते.

परिसंवादात मान्यवरांचा सहभाग

या परिसंवादान अर्थतज्ज्ञ, राजकीय अभ्यासक तथा काणकोण येथील मल्लिकार्जुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत, राशोल सेमिनारीचे माजी अधिष्ठाता व्हिक्टर फेर्राव, साहित्यिक तथा खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयातील अध्यापक डॉ. प्रकाश वजरीकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, विचारवंत तथा उद्योगपती दत्ता दामोदर नायक, नामवंत चित्रकार सुबोध केरकर, नामवंत डॉक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते ऑस्कर रिबेलो, गोव्यासंदर्भात विपुल लेखन केलेल्या महाविद्यालयीन अध्यापक सुशीला मेंडिस, राजकीय विश्लेषक तथा गोवा विद्यापीठातील प्राध्यापक नीलेश बोर्डे व पर्यावरणतज्ज्ञ क्लॉड आल्वारीस यांचा समावेश होता. या परिसवादाचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांमध्ये आवर्जून उपस्थित असलेल्या ‘पद्मश्री’ पुरस्काराच्या मानकरी नॉर्मा आल्वारीस यांनीही या विषयावर उर्त्फूर्ततेने मतप्रदर्शन केले. प्रेक्षकगणांमधील नीरज नाईक, सुदेश शिरोडकर, संगीता नाईक, किशोर कोरगावकर, विद्याधर आगरवाडेकर, श्रुती खांडेपारकर यांनीही स्वत:चे विचार व्यक्त केले.

समारोप करताना राजू नायक म्हणाले...

गोवा (Goa) आकाराने अतिशय लहान असून निसर्गाच्या दृष्टीने सर्वांगसुंदर आहे. लहानपणातच अधिक सौख्य असते. असा लहानपणा असल्यानंतरच जास्त लाड होत असतात व अशा या छोट्याशा गोव्याप्रति प्रेमादर व्यक्त करून गोव्याचे सौंदर्य पिढ्यान्‌पिढ्या कायम कसे राखता येईल या दृष्टीने आम्हा सर्वांचा प्रयत्न असायला हवा.

गोव्याच्या हिताचा कळवळा सर्वांनाच आहे. या परिसंवादातील मत-मतांतरांतूनही ही बाब प्रकर्षाने जाणवली. ‘गोव्याची संकल्पना’ राबवून आमचा गोवा आम्ही भावी पिढ्यांसाठी सांभाळून ठेवायला हवा असे मला वाटते.

या परिसंवादाच्या माध्यमातून वक्त्यांच्या मनांत गोव्याविषयी असलेला कळवळा दिसून आला. त्यांच्या ह्रदयातील भावभावना आम्हाला कळल्या. सातत्याने व दक्षतापूर्वक बारीक नजर ठेवून गोवा वाचवायची गरज आहे.

‘गोव्याची संकल्पना’ हा विषय अजून संपलेला नाही. गोवा भावी पिढ्यासाठी राखून ठेवण्यासाठी या विषयावर ‘गोमन्तक टीव्ही’च्या तसेच दै. ‘गोमन्तक’च्या वतीने अशा प्रकारचे अन्य चर्चात्मक उपक्रम आगामी काळात निश्चितपणे होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT