विजयची पत का घसरली? खरी कुजबुज!

काणकोणचे विजय पै खोत यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

विजयची पत का घसरली?

काणकोणचे विजय पै खोत यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. फरक एवढाच की गतवेळी ते भाजपा उमेदवार होते तर यावेळी अपक्ष होते. मात्र, तरीही ते पराभव टाळू शकले नाहीत. सुरवातीला पणजीत जसे उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) तसेच काणकोणमध्ये विजय असा प्रचार त्यांच्या समर्थकांनी करून पाहिला व मनोहर पर्रीकरांना अजूनही मानणाऱ्या उच्चवर्गीय मतदारांना त्यांच्या बाजूने वळविण्याचाही प्रयत्न केला; पण त्याला तेवढे यश आले नाही. त्यालाही एक कारण असल्याचे सांगितले जाते. पै खोत यांना निकट असलेल्या एका काँग्रेस नेत्याने त्याला निवडणुकीसाठी आर्थीक मदत केल्याची आवई उठली व त्यातून पै खोत निवडून आलेच तर पाठिंबा कुणाला देणार अशी आशंका निर्माण झाली व त्याचा परिणाम त्यांच्या मतांवर झाला, असे मानले जाते. दोन होडीवर पाय ठेवला की अशी गत होणारच ना? ∙∙∙

दोतोराचे निदान चुकले

हे दोतोर मुख्यमंत्री नाहीत, त्यांचे निदान सहसा चुकत नाही हे त्यांच्या 22 प्लसवरून आले आहेच. हे दोतोर ते नव्हेत तर कुंकळ्ळीचे दोतोर जोर्सन आहेत. निवडणुकीच्या तोंडावर युगोडेपाचे अध्यक्षपद त्यागून त्यांनी तृणमूलची साथ पकडली होती व त्या पक्षाने त्यांना कुंकळ्ळीतून उमेदवारी दिल्यानंतर विशेषतः काँग्रेसच्या युरी आलेमावच्या पोटात भीतीचा गोळा उठला होता. युरीची भरवंशाची मते दोतोर घेतील व त्या मतविभागणीचा लाभ भाजपचे क्लाफास यांना होईल असा सर्वसाधारण कयास होता. पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही व युरी आरामात निवडून आले. त्यामुळे दोतोरांचे वैद्यकीय पेशांतील निदान राजकारणात चालले नाही हेच खरे. ∙∙∙

धिरयोंना चाप

या निवडणुकीत बाणावली मतदारसंघात परिवर्तन झाले आहे. त्या परिवर्तनाची चाहुल खरे तर निवडणुकीपूर्वीच लागली होती. निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केले व त्यानंतर लगेचच बाणावलीतील विविध भागात सुटीच्या दिवसात चालणाऱ्या धिरयोविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली. मात्र, या पोलिस कारवाईमुळे लोकांमध्ये वेगळीच चर्चा सुरू आहे. आजवर धिरयोकडे पोलिस यंत्रणा दुर्लक्ष करत असे. कोणी तक्रार केली तर त्या आटोपल्यावर तेथे जात. पण, आता तक्रार येण्यापूर्वीच त्या भागात पोलिस छावणी तयार होते. त्यामुळे ही परिवर्तनाची करामत मानली जात आहे. की आता पोलिसातच परिवर्तन झाले म्हणायचे? ∙∙∙

आता आधार दोतोरांचाच

गोव्यात भाजपचे (Goa BJP) सरकार आले; पण कुंकळ्ळीत भाजपाचा उमेदवार जिंकून येऊ शकला नाही. याची खंत भाजपच्या कित्येक जणांना वाटत आहे. मात्र, आता त्यांनी आपला आधार म्हणून दोतोरांचा हात धरण्याचे ठरविले आहे. हे दोतोर म्हणजे मुख्यमंत्री प्रमोद सावंत. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांची बहीण कुंकळ्ळीत लग्न करून दिली आहे. त्यामुळे दोतोर अधूनमधून कुंकळ्ळीला येतच असतात. काल कुंकळ्ळीत झालेल्या छत्रोत्सवालाही दोतोर हजर होते. त्यांच्याबरोबर सुभाष फळदेसाई, राजेश फळदेसाई, उल्हास तुयेकर आदी मराठा समाजाचे आमदारही उपस्थित होते. यावेळी लोकही बोलत होते आता आम्हाला आधार दोतोरांचाच. दोतोर कुंकळ्ळीला न्याय देणार काय? ∙∙∙ (discussion about goa politics)

Goa
तिढा कायम, गोव्यात अजूनही मंत्रिमंडळ अनिश्चित

कब्रस्तान प्रश्नावर पडदा?

विधानसभा निवडणूक प्रचार काळात मडगावातील कब्रस्तानाचे अनेकांनी राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला तर अन्य काहींनी त्याच मुद्यावरून आमरण उपोषणही केले. त्याचा प्रत्यक्षात काही लाभ झाला की काय ते त्यांचे त्यांनाच माहीत. कारण निवडणूक होऊन निकालही जाहीर झाला आहे व सरकार स्थापनेचा दिवसही जवळ येत आहे; पण मजेची गोष्ट म्हणजे या दिवसात कोणीच कब्रस्तानचा मुद्दा उपस्थित केलेला नाही. कदाचित पुढच्या निवडणुकीची प्रतिक्षा तर केली जात नसावी ना असा संशय व्यक्त होत आहे. ∙∙∙

जिल्हा पंचायतीची परंपरा राखली

गोव्यात जिल्हा पंचायतीला तसे फारसे अधिकार नसले तरी ही पंचायत राज्याला आमदार पुरविणारी स्रोत नक्कीच झाली आहे. यावेळी दक्षिण गोवा पंचायतीचे सदस्य असलेले उल्हास तुयेकर व आंतोन व्हाझ हे दोघे आमदार म्हणून निवडून आले. काल त्यांचा त्यानिमित्ताने सत्कार ठेवला होता. त्यावेळी जिल्हा पंचायतीचे ज्येष्ठ सदस्य खुशाली वेळीप यांनी या परंपरेचा उल्लेख केला. ते म्हणाले, मागच्या निवडणुकीत आमचे सदस्य असलेले क्लाफास डायस व बाबाशान डीसा हे दोघे निवडून आले. त्यापूर्वी सुभाष फळदेसाई, माथानी साल्ढाणा, बाबू कवळेकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हेही दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीची पायरी चढल्यावरच त्यांच्या खांद्यावर आमदारकीची शाल चढली होती. ∙∙∙

वन नेशन वन इलेक्शन

मोदी सरकार आल्यापासून देशात अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या. खितपत पडलेले प्रश्न सोडविले. उदा. ३७० कलम, अयोध्या विषय यासोबत जगात भारताची मान ताठ राहील अशी कामगिरी केली. एक एक करून जुने विषय नाहीसे झाले. देशातील निवडणूक प्रक्रिया आर्थिकदृष्टीने देशाला पोखरणारी आहे. आता याही विषयात पंतप्रधान मोदी साहेबांनी लक्ष घालून देश महासत्ता होण्यासाठी दरवर्षी या ना त्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे देशात आर्थिक होळी होत असते आणि ती थांबवून देशभरात विधानसभा आणि लोकसभा एकाच वेळी घेतल्यास देशात अब्जावधी रुपये वाचतील आणि पर्यायाने राष्ट्र बलवान होईल. ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच शक्य असल्यामुळे आता वन नेशन वन इलेक्शन ही क्रांती करायला हवी. कारण आता नाही तर कधीच होणे शक्य नाही. कारण अशक्य तेच शक्य करून दाखविणारे मोदींशिवाय अन्य कोणालाच शक्य होणार नाही. ∙∙∙

गाडा झाला गायब

निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मडगाव पॉवर हाऊस जवळील एक हातगाडा उभा झाला होता. मात्र, अँड्र्यू सिक्वेरा या समाजसेवकाने नगरसेवक महेश आमोणकर यांना सोबत घेऊन याबद्दल समाज माध्यमातून आवाज उठविल्यावर हा गाडा रातोरात गायब झाला. असे म्हणतात की, एका नगरसेवकाच्या आशीर्वादानेच हा गाडा विनापरवाना उभारण्यात आला होता. हातगाडा उभारला याचे दुःख नव्हते, तर तो परवाना न घेता बेकायदेशीर चालवला जात होता. रातोरात गाडा गायब झाल्यामुळे त्याची चर्चा होत आहे. त्यामुळे आता यापुढे अशा बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी समाजमाध्यमांचा जास्तीत जास्त उपयोग कुणी केला तर कुणाला आश्चर्य वाटायला नको! ∙∙∙

उल्हासच्या जागेसाठी लॉबिंग!

दक्षिण गोवा जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर आमदार बनल्यामुळे रुमडामळ जिल्हा पंचायत सदस्य जागा आता खाली होणार आहे. उल्हास तुयेकर यांना जिल्हा पंचायत सदस्यपद सोडायला लागणार आहे. उल्हासच्या जागेसाठी आता भाजपात रस्सीखेच सुरू झाली आहे. उल्हासच्या विरोधात काम केलेले व स्वतःला भाजपा निष्ठावान म्हणविणारे आता जिल्हा पंचायतीवर जाण्यास फिल्डिंग लावत आहेत. हल्लीच भाजपात आलेले बबलू व किसन फडते यांची नावे जिल्हा पंचायतीसाठी घेतली जात आहेत. ∙∙∙

Goa
जिल्हा पंचायत भवन वर्षभरात पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न करू: उल्हास तुयेकर

जिल्हा पंचायतीत होणार बदल?

‘जिसकी लाठी उसीकी भैस’ अशी हिंदीत एक म्हण आहे. आता नवीन आमदार, नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आले म्हणल्यावर स्वराज्य संस्थातही बदल होणे स्वाभाविक आहे. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षांना व उपाध्यक्षांना बदलण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे कळते. जिल्हा पंचायत अध्यक्षा मॅडमने पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्यामुळे त्यांना खुर्ची सोडावी लागणार हे निश्चित. उपाध्यक्ष खुशाली वेळीप यांचे मेंटर बाबू कवळेकर हरल्यामुळे खुशालीची खुर्चीही हलायला लागली आहे. आता जिल्हा अध्यक्षपद व उपाध्यक्षपद मिळविण्यासाठी इच्छुकांचे लॉबिंग सुरू झाले आहे. ∙∙∙

‘मी’ परत (महागाई) आली

निवडणूक जवळ आल्याने थांबलेली महागाई आता परत एकदा जोरदाररित्या डोके वर काढू लागल्याने जनता परत एकदा भरडू लागली आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर हजार रुपयाला टेकला. पेट्रोल, डिझेल वाढ होणे म्हणजे कडधान्य वाढ ही स्वाभाविक पणे होणारच आहे. आता काही जण महागाई लपविण्यासाठी देश, देव, धर्म पुढे करून भरपेट क्रांती केल्यासारखे सफाई देत आहेत; पण ज्यांच्या घरात अठराविश्व दारिद्र्य आहे. काहीजण शिकून सुद्धा नोकरी नसल्याने मोलमजुरी करून दिवस कंठीत असताना त्यांच्यासाठी रिकाम्या पोटी क्रांती केल्यासारखे वाटत असल्याने गरीब लोकांसाठी महागाई म्हणजे काय असते ते सत्तेच्या मुंगळ्यांना आणि सरकारी बाबूंना कळणार नाहीच. म्हणून निवडणूक होताच सरकारने आपले खरे दात दाखवत पुन्हा आलो नाही तर (महागाई) मी पुन्हा आली असे म्हणावे लागेल. ∙∙∙

पराभवाचे विश्लेषण!

कुंकळ्ळी मतदारसंघात भाजपाचा उमेदवार आमदार म्हणून निवडून येणे शक्य आहे का? यावर भाजपाने कठोर निरीक्षण व विश्लेषण करणे गरजेचे आहे, असे आम्ही नव्हे भाजपाचे समर्थकच विचारायला लागले आहेत. भाजपाचे नेते म्हणविणारे काही स्थानिक नेत्यांमध्ये एकी नसल्यामुळे व एक दुसऱ्याचे पाय ओढण्याची वृत्ती असल्यामुळे भाजपा उमेदवार या मतदारसंघात जिंकत नाही, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करतात. भाजपाचे मंडळ आपल्या मर्जीतल्यानाच पुढे करतात व सामान्या पर्यत पोहण्यात अपयशी ठरतात म्हणून भाजपा उमेदवार जिंकत नाही असे आता भाजपा समर्थक खुले आम सांगायला लागले आहेत. ∙∙∙

भिवपाची गरज ना!

निवडणुकीचा निकाल लागला, रंगाची उधळण झाली. ‘भिवपाची गरज ना’ म्हणता म्हणता प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रिपदी नाव जाहीर झाले. येत्या काळात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी सावंत राहणार असल्याने जनतेच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. खाणीचा विषय, महागाई, रोजगार आदी समस्या राज्यासमोर आहेत. त्यामुळे सावंत यांना या सर्वांचा गुंता सोडवता आला तरच जनता खऱ्या अर्थाने ‘भिवपाची गरज ना’ म्हणेल. अन्यथा येरे माझ्या मागल्या हा अनुभव आहेच. ∙∙∙

तर मग बाबू, दीपकचे काय चुकले?

सत्तेसाठी काय पण.., असा प्रकार सध्या झाला आहे. तृणमूलमध्ये सहभागी होऊन मगो पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर गरळ ओकले आणि आता भाजपला पाठिंबा देऊन मोकळे झाले. तसे पाहिले तर आता मगोचे दोन आमदार जर भाजपला पाठिंबा देत असेल तर मागच्या विधानसभेत पेडणेचे आमदार बाबू आजगावकर आणि सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर यांनी काय घोडे मारले होते, असा सवाल या दोन्ही मतदारसंघातील लोकच विचारू लागले आहेत. आता भाजपला मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर पाठिंबा देत असतील तर त्यावेळचा बाबू आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांचाही निर्णय योग्यच होता की, अशी ही चर्चा आहे. ∙∙∙

एल्टनचा सारथी गोसावी!

बाबू कवळेकर यांनी निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांना दुखविले म्हणून त्यांना भाजपा कार्यकर्त्यांनीच पाडले असे आता भाजपावाले मुक्तकंठाने सांगत आहेत. भाजपासाठी रक्त सांडायला तयार आहेत असे म्हणणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांनीच बाबूंना पाडले हे आता उघड झाले आहे. महेंद्र गोवासी हा हार्ड कोअर भाजपा कार्यकर्ता. मात्र, यावेळी गोसावीने भाजपाचे कमळ सोडून एल्टनचा हात धरला. जो गोसावी कार सेवकांचे गुणगान करायचा व हिंदूसाठी आवाज उठवायचा. त्याने एल्टनचा सारथी बनून बाबूंच्या विरोधात काम करायचे म्हणल्यावर बाबूंवरचा राग किती कठोर होता हे स्पष्ट होते. ∙∙∙

भाजप कार्यकर्ते रडारवर

फोंडा मतदारसंघात भाजपचा उमेदवार पहिल्यांदाच निवडून आला आहे. रवी नाईक यांनी फोंड्यात भाजपचे कमळ फुलवले हे खरे असले तरी किती भाजपच्या कार्यकर्त्यांनी रवी नाईक यांना पाठिंबा दिला, याबद्दल चर्चा सुरूच आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तर पदे भूषवत असतानाही मगो पक्षाच्या प्रचाराच्या व्यासपीठावर बसणे पसंत केले आणि रवी नाईक यांच्याविरुद्ध भाषणही केले. त्यामुळे फोंड्यातील भाजपचे कार्यकर्ते केवळ रवी नाईकच नव्हे; तर भाजपच्या श्रेष्ठींच्या रडारवर आहेत. त्यामुळे येत्या काळात फोंडा पालिकेत सत्तापालट झाला तर आश्‍चर्य वाटायला नको. शेवटी हे प्रकरण कितपत ‘सिरियस'' घ्यायचे हे जो तो ठरवणार... ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com