पणजी: गोवा स्वतंत्र करण्यासाठी रशियाने (सोव्हिएत युनियन) देखील महत्वाची भूमिका बजावली होती. गोवा मुद्यावरुन जागतिक पातळीवर भारताला घेरले जात असताना रशिया भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण देश स्वतंत्र झाला तरी गोवा हे देशातील महत्त्वाचे राज्य त्या वेळी भारतात समाविष्ट झाले नव्हते. गोव्याला तब्बल १४ वर्षे उशीरा स्वातंत्र्य मिळाले. भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन विजयनंतर गोवा ४५० वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतून स्वतंत्र झाला होता.
भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ राबवून १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त केला. भारतीय लष्कर आणि गोव्यातील जनतेच्या प्रयत्नानंतरही पोर्तुगालला वसाहत सोडावी लागली. पोर्तुगालने भारताच्या कारवाईला संयुक्त राष्ट्रात आव्हान दिले. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी पोर्तुगालला पाठिंबा दिल्यावर सोव्हिएत युनियन भारताच्या मदतीसाठी मैदानात उतरला.
गोव्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात राजकीय लढाई बनला होता. पोर्तुगालच्या प्रस्तावाला अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स सारखे शक्तिशाली देश उघडपणे समर्थन देत होते ज्यात भारताला गोव्यातून आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले जात होते. पोर्तुगालला चीन, इक्वेडोर, चिली आणि ब्राझीलचाही पाठिंबा मिळाला.
संयुक्त राष्ट्र संघात झालेल्या कूटनितीच्या डावपेचात भारत अडकला होता. या कठीण काळात सोव्हिएत युनियनने आपला व्हेटो पॉवर वापरून भारताचा बचाव केला होता. लायबेरिया, संयुक्त अरब प्रजासत्ताक आणि श्रीलंका या देशांकडूनही भारताला मदत मिळाली होती.
थेट क्युबावर हल्ला करणाऱ्या अमेरिकेला भारताला योग्य-अयोग्याचे ज्ञान देण्याचा अधिकार नाही असे, सोव्हिएत युनियनचे प्रतिनिधी व्हॅलेरियन झोरिन यांनी UN मध्ये म्हटले होते. गोव्याचे भारताशी भूगोल, इतिहास, संस्कृती, भाषा आणि परंपरांवर आधारित अतूट नाते आहे, असेही झोरिन म्हणाले होते.
अमेरिका, ब्रिटन आणि चीनसारख्या शक्तींना तोंड देत सोव्हिएत युनियनने पोर्तुगालच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघात व्हेटो पॉवरचा वापर करत विरोध केला. भारत आणि रशियाचे संबंध पूर्वीपासूनच मजबूत होते, जे या घटनेमुळे आणखी सुधारले.
यानंतर 1962 मध्ये चीनसोबतच्या युद्धात आणि 1965 मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धातही रशियाने भारताला मदत केली होती. अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवून मजबूत केले, तेव्हा रशियाने भारताला महत्त्वाची शस्त्रे पुरवली. भारत आणि रशिया आजही एकमेकांचे जवळचे मित्र आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.