Monsoon 2025
पणजी: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसानंतर अखेर गोव्यात आज नैऋत्य मान्सून दाखल झाला. ५ जूनच्या त्याच्या वास्तविक तारखेपासून १२ दिवस आधीच तो गोव्यात पोहचला आहे. राज्यात २९ मेपर्यंत ऑरेंज, तर ३० व ३१ मे रोजी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
त्यामुळे गोव्यात पुढील काही दिवसांत अधिकांश भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची तसेच प्रतिताशी ४० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात पूरक वातावरण तयार झाल्याने मान्सूनची गती वाढली आणि यावर्षी मान्सून निर्धारित वेळेपूर्वी गोव्यात पोचला. २००९ नंतर पहिल्यांदाच केरळमध्ये तो २४ मे रोजी दाखल झाला. कर्नाटक व तामिळनाडू राज्यातील काही भागांत तो पोचला होता.
गोव्यात तो २५ रोजी दाखल झाल्याचे हवामान खात्याने घोषित केले. २० मे पासून राज्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. मोठ्या प्रमाणात पडझडही झाली.
अनेक ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचण्याबरोबरच वाहनेही पाण्याबरोबर वाहून जाण्याच्या घटना घडल्या. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. सरकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज होण्यापूर्वीच यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने धडक दिल्याने संबंधित अधिकाऱ्यांची बरीच धावपळ उडाली. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होण्याच्या कामांनाही या पावसामुळे अडथळा निर्माण झाला. राज्यात काही ठिकाणी पूरसदृश घटना घडल्या. त्यामुळे एकप्रकारे मान्सूनपूर्व पावसाने सरकारी यंत्रणेला इशाराच दिला आहे.
राज्यात आज मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात आज पावसाने उसंत घेतल्याचे दिसून आले. काही ठिकाणी तुरळक सरी पडल्या, तसेच घरांवर, विजेच्या तारांवर झाडे पडण्याच्या ४ - ५ घटना घडल्या. पाले - बस्तोडा तसेच आसगाव येथे वीज तारांवर झाड पडले. गिरी - तसेच तांबोसे येथे घरांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले.
संपूर्ण गोव्यासह नैऋत्य मान्सून आज, २५ मे रोजी पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, कर्नाटक, महाराष्ट्राचा काही भाग, पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालचा उपसागर आणि मिझोराम, भा मणिपूर आणि नागालँडच्या काही भागांत पुढे सरकला आहे.
पुढील ३ दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्र, मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांत, कर्नाटकसह बंगळुरू, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि उत्तर बंगाल उपसागर आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांत पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकच्या लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. पुढील २४ तासांत तो हळूहळू पूर्वेकडे सरकण्याची आणि हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता आहे.
२५ ते २६ मे दरम्यान केरळमध्ये; २५ ते २७ मे दरम्यान कर्नाटकातील किनारी आणि घाट भागात; २५ आणि २६ मे रोजी तामिळनाडूतील घाट भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांची गेले काही दिवस बरीच दमछाक झाली. कालपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आज संध्याकाळपर्यंत राज्यातील पडझडीच्या सुमारे १५ कॉल्सची नोंद झाली. २१ ते २३ मे या तीन दिवसांच्या काळात २८६ कॉल्सची नोंद झाली होती.
मान्सूनने रविवारी संपूर्ण गोवा व्यापत कोकणातील देवगडपर्यंत मजल मारली. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मान्सूनचे गोव्यासह कोकणात आगमन झाले. मान्सून प्रगतीची उत्तरसीमा देवगड, बेळगाव, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, ऐझावल, कोहिमा येथून जात आहे. पुढील तीन दिवसांत मान्सून मुंबईसह महाराष्ट्राच्या आणि बंगळुरूसह कर्नाटकच्या काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे. याच काळात ईशान्येकडील राज्यांतही मान्सूनची प्रगती अपेक्षित आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.