South Goa Testing of candidates for Goa Lok Sabha elections begins Dainik Gomantak
गोवा

South Goa : दक्षिणेत भाजपची उमेदवारी कोणाला?

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa : फोंडा, लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्यामुळे सध्या राजकीय वातावरण तप्त व्हायला लागले असून उमेदवारी कोणाला यावर चर्वितचर्वण सुरू झाले आहे.

भाजपची दक्षिण गोव्याची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे अनेकांचे लक्ष आहे. तसेच दक्षिण गोव्याची उमेदवारी काँग्रेसला की आपला यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

फोंडा तालुक्यातील तीन विधानसभा मतदारसंघ दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात येत असल्यामुळे या घडामोडींवर फोंड्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

सध्या देशात विरोधी पक्षाच्या एकीचा नारा घुमत असून ‘इंडिया’ या शीर्षकाखाली विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचे पडसाद गोव्यात ही उमटत आहेत.

फोंडा मतदारसंघात काँग्रेस जास्त सक्रिय असून शिरोड्यात मात्र काँग्रेसपेक्षा आपचा जास्त बोलबाला ऐकू येत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत शिरोडा मतदारसंघातून माजी मंत्री महादेव नाईक यांनी सहा हजारहून अधिक मते प्राप्त केली होती.

पण सध्या ते ‘तटस्थ’ असल्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय याचे आकलन होत नाही. मात्र विधानसभेत मिळालेल्या मतांचा विचार केल्यास या मतदारसंघात आप काँग्रेसपेक्षा जास्त बलवान वाटतो एवढे खरे. मडकईत मात्र दोन्ही पक्ष मागच्या बाकावर बसलेले दिसत आहेत.

इंडिया आघाडी झाल्यास दक्षिण गोव्याची जागा आपला जाऊ शकते असा होरा राजकीय विश्‍लेषक व्यक्त करीत आहे. फोंडा तालुक्यात जरी आप तेवढा सक्रिय वाटत नसला तरी सासष्ठी तालुक्यात असलेले आपचे वर्चस्व दुर्लक्षित करता येत नाही.

या तालुक्यातील बाणावली व वेळ्ळी या दोन मतदारसंघात आपचे आमदार आहेत. त्यापैकी बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांना दक्षिण गोव्याची उमेदवारी मिळू शकते असे काहींना वाटते.

काँग्रेसच्या उमेदवारीवर सध्या एल्विस गोम्स, गिरीश चोडणकर व कॅप्टन विरियतो फर्नांडिस हेही डोळे ठेवून आहेत. या तिघांनीही मोर्चेबांधणी सुरू केली असून गोम्स व फर्नांडिस यांनी मागील काही दिवसात फोंडा मतदारसंघाला भेट दिली होती.

त्याचप्रमाणे दक्षिण गोव्याचे विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन हे ही परत एकदा निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागल्याचे दिसत आहेत. ही जागा आपकडे गेली तर या सर्वांच्या प्रयत्नांवर पाणी पडू शकते.

अशा वेळी हे इच्छुक उमेदवार तसेच कॉंग्रेसचे कार्यकर्ते आपच्या उमेदवारीला किती प्रतिसाद देतात ते बघावे लागेल. काँग्रेसच्या फोंड्यातील कार्यकर्त्यांकडे याबाबत बोलल्यावर सध्या ते ‘वेट ॲण्ड वॉच’ च्या भूमिकेत दिसत आहे. श्रेष्ठी काय निर्णय घेतात ते बघावे लागेल असे बरेच कार्यकर्त्यांचे म्हणणे पडले.

दक्षिण गोवा कब्जात घेण्याचा भाजपचा निर्धार

भाजपची उमेदवारी कोणाला हे अजूनही गुलदस्त्यात आहे. हल्लीच भाजप नेते राजीव चंद्रशेखर यांनी दक्षिण गोव्यातील काही मतदारसंघाना भेटी दिल्या असल्या तरी उमेदवार कोण यावर तेही मौन बाळगून होते. अनिश्‍चिततेचे वातावरण असले तरी भाजपने एक पक्ष म्हणून आपली रणनीती आखायला सुरवात केली आहे. कोणालाही उमेदवारी मिळाली तरी गेल्या वेळेला केवळ नऊ हजार मतांनी हुकलेला हा मतदारसंघ यावेळी कब्जात आणायचाच असा भाजपचा निर्धार आहे.

काँग्रेसचे १६ रोजी मडगावात शक्तिप्रदर्शन

काँग्रेस सध्या गोंधळात असल्याचे दिसत असले तरी १६ जानेवारीला ‘जनमत कौल’ दिनानिमित्त लोहिया मैदान, मडगाव येथे भव्य कार्यक्रम आयोजित करून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदारसंघातून कमीत कमी पन्नास कार्यकर्ते आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

फोंडा तालुक्यात याबाबत तयारी सुरू झाली असून फोंडा मतदारसंघातून जास्तीत जास्त कार्यकर्ते नेण्यात येतील असे काँग्रेस गटाध्यक्ष विलियम आगियार यांनी सांगितले. एकंदरीत लोकसभा निवडणुकीचे वातावरण तयार झाले असून अनेक समीकरणांची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

SCROLL FOR NEXT