सासष्टी : दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरण सध्या सोपो गोळा करण्याच्या निविदेवरून अडचणीत येण्याची शक्यता आहे. सोपो गोळा करण्यासाठी निविदा जारी करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ‘एसजीपीडीए’ला आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागणार नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
फातोर्डा येथील काही नागरिकांनी यासंदर्भात आवाज उठविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एसजीपीडीएला सोपो गोळा कंत्राटदार नसला तरी भरपूर महसूल मिळत आहे. पण तो अधिकृतपणे दाखविला जात नसल्याने ‘एसजीपीडीए’ला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
सोपो गोळा करणारा माजी कंत्राटदार मिलाग्रेस फर्नांडिस यांनी सांगितले, की माझ्या काळात दररोज १२.५ लाख रुपये सोपो शुल्क मिळत असे. मात्र, सध्या केवळ दीड ते दोन लाख रुपयेच जमा होत असल्याचे दाखविण्यात येत आहे. ‘आरटीआय’द्वारे जी माहिती मिळाली, ती उघड करताना त्यांनी सांगितले, की जानेवारी २०२५ मध्ये १२.०३ लाख रुपये महसूल मिळाला; पण १.८३ लाख रुपयेच जमा करण्यात आले.
फेब्रुवारीत १०.७७ लाख मिळाले. पण १.६४ लाख रुपये जमा करण्यात आले. मार्चमध्ये १२ लाख रुपये मिळाले; पण १.८३ लाख रुपये जमा केले. एप्रिलमध्ये ११.७९ लाख रुपये मिळाले; परंतु १.८० लाख रुपये जमा करण्यात आले. मे महिन्यात ११.६५ लाख रुपये जमवले; पण प्रत्यक्षात १.७८ लाख रुपये जमा केले, असे फर्नांडिस यांचे म्हणणे आहे. ‘एसजीपीडीए’चे चेअरमन वास्कोचे आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर यांनी निविदा काही दिवसांत काढली जाईल, असे सांगितले. ‘एसजीपीडीए’ने पाच महिन्यांसाठी सोपो शुल्क गोळा करण्यासाठी तात्पुरती २० लाख रुपयांची निविदा काढावी, अशी सूचना फर्नांडिस यांनी केली आहे.
मिलाग्रेस फर्नांडिस यांच्या म्हणण्यानुसार, ‘एसजीपीडीए’ला सोपो गोळा शुल्कातून मिळकत आहे; पण ती काही मोजक्याच लोकांच्या खिशात जात आहे. जो महसूल ‘एसजीपीडीए’ला मिळायला हवा होता, तो मिळत नाही. सोपो शुल्क मिळकत आणि प्रत्यक्ष ‘एसजीपीडीए’त जमा झालेली रक्कम यांमध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याचेही फर्नांडिस यांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.