South Goa District Hospital|Patient Problems  Dainik Gomantak
गोवा

Margao Hospital: एक डॉक्‍टर आणि तीन परिचारिका हाताळतात वॉर्ड, मोजके प्रशिक्षित कामगार; व्यथा हाॅस्पिसियोची

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: दक्षिण गोव्‍यातील रुग्‍णांसाठी अत्‍याधुनिक सोयी उपलब्‍ध असलेले इस्‍पितळ उभारावे, हे उद्दिष्‍ट ठेवून पाच मजली इस्‍पितळ उभारण्‍यात आले. मात्र, यातील दोन मजले सध्‍या विनावापर पडून आहेत. दुसऱ्या बाजूने रुग्‍णांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत असल्‍यामुळे आणि या वाढत्‍या रुग्‍णांसाठी पुरेशा खाटा उपलब्‍ध नसल्‍याने त्‍यांना फरशीवर झोपवून त्‍यांच्‍यावर उपचार केले जातात. दक्षिण गाेव्‍यातील प्रमुख इस्‍पितळ असलेल्‍या हॉस्‍पिसियो इस्‍पितळाची ही अशी विदारक स्‍थिती आहे.

या इस्‍पितळातील मेडिसीन विभाग नेहमीच रुग्‍णांनी भरलेला असतो. त्‍यामुळे मेडिसीन वॉर्डात जमिनीवर झोपलेले रुग्‍ण हे नेहमीचे चित्र बनले आहे. खाटा उपलब्‍ध नसल्‍यामुळे कित्‍येकांना व्‍हील चेअरवर बसवून उपचार केले जातात. तर काहीजणांना खाटा नसल्‍यामुळे रात्रीच्‍यावेळी स्‍ट्रेचरवर झोपविले जाते.

या इस्‍पितळाचे दोन मजले रिकामे असतानाही रुग्‍णांवर अशी पाळी का यावी यासंदर्भात काही हॉस्‍पिसियोतील डॉक्‍टरांना विचारले असता, या तीन मजल्‍यावर येणार्‍या रुग्‍णांना हाताळण्‍याइतपत या इस्‍पितळात डॉक्‍टर आणि कर्मचारी नाहीत. अशा परिस्‍थितीत आणखी वॉर्ड वाढवले तर त्‍या रुग्‍णांकडे पहाणार कोण? असा सवाल त्‍यांनी केला.

एका डॉक्‍टराने दिलेल्‍या माहितीप्रमाणे, पूर्वीचे जुने हॉस्पिसयो इस्‍पितळ २०० रुग्‍णांना हाताळण्‍याच्‍या क्षमतेचे होते. आता या नव्‍या इस्‍पितळात जवळपास ३५० रुग्‍णांना हाताळले जाते. मात्र पूर्वीच्‍या कर्मचाऱ्यांच्‍या संख्‍येत अजूनही वाढ केलेली नाही. उलट जे कर्मचारी निवृत्त झाले त्‍यांच्‍या जागी अजून नव्‍या कर्मचाऱ्यांची भरती करण्‍यात आलेली नाही.

या इस्‍पितळाच्‍या क्षमतेच्‍या तुलनेत डॉक्‍टरांची संख्‍या सुमारे ८० टक्‍क्‍यांपर्यंत भरलेली असली तरी परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्‍या अगदीच कमी आहे. एकूण इस्‍पितळाच्‍या क्षमतेच्‍या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्‍या फक्‍त ५० टक्‍केच असून त्‍यामुळे रात्रीच्‍यावेळी एक डॉक्‍टर आणि तीन परिचारिका अशा तुटपुंजा कर्मचाऱ्यांच्‍या आधारे वॉर्ड हातातळे जातात.

रात्रीच्‍यावेळी हे सगळे वॉर्ड रुग्‍णांनी व्यापले गेल्‍यामुळे १०८ रुग्‍णवाहिकेतून जर कुठलाही नवा रुग्‍ण आला तर त्‍याला फरशीवर झोपवण्‍याव्‍यतिरिक्‍त आमच्‍याकडे दुसरा पर्याय नसतो, अशी व्‍यथा काही कर्मचाऱ्यांनी मांडली.

कित्‍येक लोक हॉस्‍पिसियोची तुलना ‘गोमेकॉ’ शी करतात. मात्र ‘गोमेकॉ’त एक वॉर्ड हाताळण्‍यासाठी किमान पाच डॉक्‍टर अाणि दहा परिचारिका एका ड्यूटीसाठी उपलब्‍ध असतात.

मात्र हॉस्‍पिसियोत एक डॉक्‍टर आणि तीन परिचारिका यांना पूर्ण वॉर्ड हाताळावा लागतो. शिवाय अन्‍य कामे करण्‍यासाठीही जे कर्मचारी आहेत, त्‍यांची संख्‍याही कमी आहे त्‍यामुळे खासगी एजन्‍सीकडून पुरविल्‍या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊन वार्ड सांभाळावे लागतात.

मात्र, हे कर्मचारी अप्रशिक्षित वर्गात मोडणारे असून हाताच्‍या बोटावर मोजण्‍याइतपत प्रशिक्षित कामगार आहेत. त्‍यांच्‍यावर येणारा ताण एवढा असतो की त्‍याचा परिणाम आपोआप रुग्‍णांवरील सेवावरही झाल्‍याशिवाय रहात नाही.

वाळपईहून येतात; लगेच बदली करून घेतात!

आराेग्‍यमंत्री विश्र्‍वजीत राणे हे वाळपईचे आमदार असल्‍याने इतर सरकारी इस्‍पितळाप्रमाणेच हॉस्‍पिसियोतही होणाऱ्या बहुतेक कर्मचाऱ्यांची भरती वाळपईतूनच होते. मात्र, हॉस्‍पिसियोत नियुक्‍त केलेले हे वाळपईचे कर्मचारी वाळपईत किंवा आपल्‍या घराच्‍या जवळपास उत्तर गोव्‍यात कुठेतरी बदली करुन घेतात. पण त्‍यांच्‍याजागी दुसर्‍या कुणालाही बदली करुन मडगावात पाठवत नाहीत. त्‍यामुळे कागदावर कर्मचारी दिसत असले तरी प्रत्‍यक्षात कर्मचारी कमीच असतात अशी माहिती एका कर्मचार्‍याने दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar Case: सुभाष वेलिंगकरांना मोठा झटका! कोर्टाने फेटाळला सशर्त अटकपूर्व जामीन

Goa Rain: गोव्याला परतीच्या पावसाचा दणका; सत्तरी, डिचोलीत बत्ती गुल!

St. Francis Xavier DNA Test Row: ''वेलिंगकरांना अटक केल्यास...''; हिंदू संघटनांचा इशारा

Mount Kailash Mystery: '...पण माणूस रहस्यमयी कैलास पर्वतावर चढाई करु शकला नाही'!

Israel-Iran War Impact: तणाव इराण-इस्त्रायलमध्ये, झळ भारताला; तेलाच्या सर्वात मोठ्या आयातदाराची वाढली चिंता!

SCROLL FOR NEXT