दक्षिण गोव्यात भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांचा पराभव झाला असून, काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस यांचा विजय झाला आहे. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या या लढतीत धेंपे यांचा 13,535 मतांनी पराभव झाला आहे.
देशातील एक श्रीमंत उमेदवार म्हणून गाजावाजा झालेल्या धेंपे यांचा थोडक्यात पराभव झाला असून, त्यांनी कॅप्टन विरियातो यांचे अभिनंदन करत जनादेश मान्य केला आहे.
'मी नम्रपणे दक्षिण गोव्यातील जनतेचा कौल मान्य करते आणि विरियातो फर्नांडिस यांचे अभिनंदन करते. यासह मी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपचे देखील अभिनंदन करते. दक्षिणेत थोडक्यात पराभव झाला असला तरी मी मागील दशकापासून करत असलेली जनसेवा सुरुच ठेवणार आहे,' असे पल्लवी धेंपे यांनी म्हटले आहे.
धेंपे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दक्षिण गोव्यातून उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानले आहेत. यासह त्यांनी गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी, नड्डा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे माजी आमदार, मंत्री, खासदार यांचेही आभार मानले आहेत.
भाजपने दक्षिण गोव्यात महिला उमेदवार देऊन ही लढत प्रतिष्ठेची केली होती. काँग्रेसने उशिराने उमेदवार जाहीर केला तोपर्यंत भाजप प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण देखील झाल्या होत्या.
भाजपच्या सभांना मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रतिसाद मिळत होता. पण, विरियातो यांनी उशिराने सुरुवात करुन देखील मतदारसंघात छाप सोडली. विरियातोंना सासष्टीतून सर्वाधिक मताधिक्य मिळाले आणि विजयच्या जवळ नेऊन ठेवले. भाजप दक्षिणेतील पराभव मान्य करत काही चुका झाल्याचे मान्य केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.