राज्यात रस्ता अपघातांमुळे जीव गमावणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाहतूक सुरळीत व सुरक्षितपणे चालण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यास सरकार अपयशी ठरल्याचे गोवा प्रदेश युथ काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष महेश नाडर यांनी म्हटले आहे.
सरकार व राज्य प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोपही गोवा प्रदेश युथ समितीने केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला सादर केले असून यावर तोडगा काढून भविष्यातील दुर्घटना टाळण्याचे आवाहन केले आहे.
आज गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विभागाला भेट देऊन सुधारणेची कामे होत नसल्याबद्दल अधिकाऱ्यांची जाब विचारला. लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्याने यावेळी दिले आहे.
यावेळी नाडर यांनी अधिकार्यांना सांगितले की, केवळ सामान्य नागरिकांनाच नव्हे तर गोवा पोलिसांनादेखील राज्य प्रशासनाच्या रस्ता सुरक्षेसंबंधीच्या संथ कारभाराचा फटका बसत चालला आहे.
क्रॅश बॅरियर्स, योग्य दिशादर्शक फलक, योग्य रस्ता आखणी व धोकादायक क्रॉसिंग बंद करण्याची प्रक्रिया करण्यात आलेली नाही. राजकीय दबावापोटी मुख्य हमरस्त्यांना जोडणारे अनेक लहान-मोठ्या रस्ते खुले करण्यात आल्याचे यावेळी नाडर यांनी दाखवून दिले. या वाढत्या अडथळ्यांमुळे वाहनचालक व पादचार्यांनादेखील जीव मुठीत धरावा लागत आहे.
जिल्हा प्रशासनाने निवेदनाची 15 दिवसांत दखल न घेतल्यास युथ काँग्रेस कायदेशीर व राजकीय मार्गाने ही अपघाताची वाढती प्रकरणे नजरेस आणून सरकारचे अपयश अधिक ठळकपणे जनतेला दाखवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी युवक काँग्रेसचे इतर सदस्यही उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.