चावडी: बडसरे-गावडोंगरी येथील घनदाट जंगलातील उंच टेकडीवर तिरंगा फडकविण्यासाठी बुधवारी ट्रेकिंगला गेलेला रोहित कुडाळकर हा सोलो ट्रेकर टेकडीवरून उतरत असताना पाय घसरल्याने खोल दरीत पडून अडकला.
संकटात सापडल्यानंतर त्याने मोबाईलवरून १०० क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांकडे मदत मागितली. त्यानंतर काणकोण पोलिसांनी वन विभाग, अग्निशमन दल व स्थानिकांच्या मदतीने तातडीने शोधमोहीम राबवून सुमारे सात तासांनंतर कुडाळकर याची सुखरूप सुटका केली.
कुडाळकर हा मूळ मास्तीमळ-गावडोंगरी येथील असून, सध्या त्याचे कुटुंब मडगाव येथे वास्तव्य करून आहे. बुधवारी सकाळी ७च्या सुमारास बडसरे येथील डोंगराच्या पायथ्याशी आपली स्कूटर ठेवून तो जंगलात ट्रेकिंगसाठी गेला होता. परतीच्या वाटेवर असताना ही घटना घडली. दुपारी १२ वाजता मडगाव नियंत्रण कक्षातून काणकोण पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस अधिकारी व कर्मचारी तातडीने बडसरे मंदिर परिसरात पोहोचले.
वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, काणकोण अग्निशमन दलाचे जवान व स्थानिकांना सोबत घेऊन जंगलात शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, त्याच्याजवळील मोबाईलची बॅटरी संपल्याने त्याचा शोध घेणे कठीण बनले.
घनदाट जंगल, उंच डोंगर परिसर आणि ट्रेकर नेमका कोणत्या ठिकाणी अडकला आहे, याची निश्चित माहिती नसल्याने बचाव पथकासमोर मोठे आव्हान होते. मात्र, पोलिस, वन विभाग, अग्निशमन दल आणि स्थानिकांनी समन्वयाने शोधमोहीम राबविली. अखेर बचाव पथकाला म्हड्डी (डोंगराचे शिखर) परिसरातील दरीत त्याचा ठावठिकाणा लागला.
जवानांनी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढून बडसरे येथे आणले. या घटनेत त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली.
सुखरूप बाहेर आल्यानंतर कुडाळकर यांनी काणकोण पोलिसांचे आभार मानले. संकटाच्या वेळी मदतीसाठी संपर्क साधताच पोलिसांनी तातडीने प्रतिसाद दिल्याने आपली सुखरूप सुटका होऊ शकली, असे रोहित कुडाळकर यांनी सांगितले.
पाय घसरून पडला खोल दरीत
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तो म्हड्डी (डोंगराचे शिखर) येथे सापडला. ही वाट खडतर असून, या वाटेने एकट्याने जाणे धोकादायक आहे. याच परिसरात सुमारे ४५ वर्षांपूर्वी नौदलाचे विमान कोसळून वैमानिकासह तीन जणांचा मृत्यू झाला होता. शिखरावर झेंडा फडकवण्याबरोबरच त्या जुन्या विमान दुर्घटनेच्या ठिकाणाला भेट देण्याच्या उद्देशानेही कुडाळकर त्या परिसरात गेला होता. मात्र, शिखरावरून परतत असताना निसरड्या वाटेवर पाय घसरल्याने तो खोल दरीत पडला. तेथून बाहेर पडणे त्याला शक्य झाले नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने मोबाईलवरून पोलिसांशी संपर्क साधला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.