नवी दिल्ली स्थित नव्या संसद भवनासाठी गोवा राज्यातील माती दिल्लीला पाठवण्याचे नियोजीत होते. त्याप्रमाणे आता ही माती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय संस्कृती आणि पर्यटनमंत्री किशन रेड्डी यांच्याकडे नवी दिल्ली येथे सुपुर्द केली.
(Soil from Goa reached New Delhi for new parliament building)
देशाला 75 वर्षे पुर्ण होत असल्याने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम राबवले जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानुसार आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारतच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उत्सव कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, गोव्यातील माती नवी दिल्ली येथील सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पासाठी नवीन संसद भवनासाठी पाठवण्यात आली आहे.
या उपक्रमाबाबत राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया
या उपक्रमाबाबत गोवा राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या उपक्रमाचे गोव्यात भाजप नेत्यांनी तोंड भरुन कौतुक केले आहे. तर काही राजकिय पक्षांनी शेलक्या शब्दात या उपक्रमाला विरोध दर्शवत समाचार घेतला आहे.
याबाबत बोलताना काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर म्हणाले आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार नवीन संसद भवनासाठी माती संकलन या देशव्यापी कार्यक्रमाद्वारे भोळ्याभाबड्या जनतेच्या भावनांशी खेळत आहे.
गोळा केलेली माती शेवटी कुठेतरी फेकली जाईल किंवा भाजपसाठी निधी तयार करण्यासाठी विकली जाईल, असा आरोप ही पणजीकर यांनी ट्विटद्वारे केला आहे. तसेच अनेक नेत्यांनी ही याला असमर्थता दर्शवली होती. असे असले तरी गोव्याची माती आज नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय संस्कृती आणि पर्यटनमंत्री किशन रेड्डी यांच्याकडे सुपुर्द केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.