फोंडा
वाचाल तर वाचाल, अशी एक म्हण आहे. आणि या म्हणीप्रमाणे वाचनाची सवय आणि गोडी जर लहान मुलांत लावली तर भविष्यात ही मुले वाचन समृद्ध होतील, अशी अपेक्षा असते. मात्र दुर्दैवाने वाचन संस्कृती वाढत नसल्याचे समोर आले असून अवघी मुले सोडली तर बहुतांश मुले फक्त मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांमध्येच गुंतून पडत असल्याने वाचनालयाच्या कपाटातील पुस्तके जास्त करून वयस्क लोकांच्या हातात दिसतात. फोंडा तालुका अर्थातच अंत्रुज महाल ही राज्याची सांस्कृतिक राजधानी असल्याचे मानले जाते, मात्र या सांस्कृतिक राजधानीत गावागावात वाचनालये मात्र अभावानेच आढळतात. फोंडा पालिका क्षेत्रात तर दोनच वाचनालये आहेत. फोंडा पालिकेचे वाचनालय हे सर्वांत जुने वाचनालय आहे.
फोंडा शहरात पालिकेचे आणि दुसरे सरकारी तालुका वाचनालय आहे. या दोन्ही वाचनालयात वर्तमानपत्रांसहीत इतर पुस्तकेही आहेत. विशेष म्हणजे वर्तमानपत्रे वाचण्यासाठी एक मोठा गट सकाळी या दोन्ही वाचनालयात उपस्थित असतो. तालुका वाचनालय हे पालिकेच्या उद्यानाजवळ मध्यवर्ती ठिकाणी आहे, त्यामुळे या वाचनालयात सकाळी वर्तमानपत्रे वाचणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय असते. फोंडा पालिकेचे वाचनालय दोन वर्षांपूर्वी वरचा बाजार येथील मार्केट संकुलात हलवण्यात आले आहे. पूर्वी हे वाचनालय जुन्या बसस्थानक परिसरात फोंडा पोलिस स्थानकाच्या मागे असलेल्या इमारतीत होते. मात्र ही जुनी इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीतील हे वाचनालय पालिकेच्या मालकीच्या मार्केट संकुल इमारतीत हलवण्यात आले. वरचा बाजार बुधवारपेठ मार्केटमधील मार्केट संकूल हे तसे पाहिले तर भर शहरात आहे, मात्र या ठिकाणी बाजारहाटासाठी येणाऱ्या लोकांची वर्दळ असते. त्यातच वाचनालयात जाण्यासाठी पायऱ्या चढून जाव्या लागत असल्याने वयस्क लोक अभावानेच तेथे आलेले दिसतात. फोंड्यातील शास्त्री सभागृहाच्या खाली असलेल्या पहिल्या मजल्यावर जेव्हा हे वाचनालय कार्यरत होते, त्यावेळेला वाचकांची मोठी उपस्थिती असायची. वर्तमानपत्र वाचण्यासाठी वाचकांना ताटकळत रहावे लागायचे, पण वरचा बाजार मार्केट संकुलात वाचकांची संख्या रोडावल्याने गर्दी कुठे दिसत नाही.
वाचनामुळे माणसाच्या ज्ञानात भर पडते, असे सांगितले जाते. पण विद्यालये सोडल्यास इतर ठिकाणी मात्र वाचनालये अभावानेच दिसतात. सरकारने गावागावात वाचनालये सुरू करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी फोंडावासीयांकडून करण्यात येत आहे.
.........
पालिकेला इमारतीची प्रतीक्षा
फोंड्यातील पालिकेच्या वाचनालयाची जुनी इमारत वापरण्यास धोकादायक ठरल्याने या ठिकाणी कार्यरत असलेले वाचनालय मार्केट संकुलात हलवण्यात आले. शास्त्री सभागृह असलेल्या ही जुनी इमारत पाडून त्याजागी मोठे संकूल उभारण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यातच या इमारतीसमोरील जागेत अन्य एक भव्य इमारत बांधली जात आहे. या इमारतीत हे वाचनालय स्थलांतरित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले, मात्र निधीअभावी हा प्रकल्प रखडला आहे.
वर्तमानपत्रांमुळे दिसतात वाचक
राज्यातील सर्व वर्तमानपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने वाचनालयात सकाळी वाचकांची गर्दी दिसते. सगळी वर्तमानपत्रे वाचायला मिळत असल्याने रोज वर्तमानपत्र वाचणारा वाचक हमखास वाचनालयात येतो. फोंड्यातील पालिका व तालुका वाचनालयातही तोच प्रकार आहे. सकाळी या दोन्ही वाचनालयात जास्त वाचक दिसतात.
.........
वाचकांचे मत...
राज्यात वाचनसंस्कृती वाढणे आवश्यक आहे. आज मुले फक्त मोबाईलच्या अधीन गेली आहेत, त्यामुळे वाचनसंस्कृती वाढण्यासाठी शाळातूनच गोडी लावली गेली पाहिजे.
- चरणजीत सप्रे, फोंडा.
फोंड्यातील पालिकेचे वाचनालय हे सर्वांत जुने वाचनालय आहे. या वाचनालयात पूर्वी मोठी गर्दी व्हायची. आता हे वाचनालय वरचा बाजार भागात नेल्यामुळे गर्दी ओसरली आहे, त्यामुळे हे वाचनालय आता बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत बांधकाम पूर्ण झाल्यावर लगेच सुरू करणे आवश्यक आहे.
- प्रकाश नाईक, फोंडा.
editing sanjay ghugretkar
|