पणजी: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत राजधानी पणजीतील कला व संस्कृती खात्याच्या मागील ''रुअं दी ओरेम'' खाडीतील खारफुटीमध्ये २.२७ दोन कोटी रुपये खर्च करून बनविलेल्या ‘बोर्ड वॉक’ या लाकडी पदपथाची दयनीय अवस्था झाली आहे. धोकादायक बनलेल्या बोर्डवॉकमध्ये जाण्यास बंदी असतानाही प्रेमीयुगल या ठिकाणी जात असून ते अपघातालाच निमंत्रण देत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून एकदा दुरुस्ती झालेल्या पदपथाची पुन्हा अवस्था दयनीय झाली आहे.
खारफुटीद्वारे पर्यावरण रक्षणाचे प्रदर्शन करण्यासाठी दीड किलोमीटरचा बोर्डवॉक २०१८ मध्ये लोकार्पण करण्यात आला. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत सुशोभीकरणाच्या कामांमध्ये बोर्डवॉक तयार केला गेला. इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे तत्कालीन सीईओ स्वयंदीप्तापाल चौधरी यांच्या काळात हे काम पूर्ण झाले आणि तत्कालीन माजी नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी या बोर्डवॉकचे उद्घाटन केले होते.
पर्यटकांना खारफुटीच्या महत्त्वाबद्दल शिक्षित करण्यासाठी आणि मनोरंजनासाठी हा भाग डिझाइन केलेला आहे. शहरी पायाभूत सुविधा आणि जीवनमान वाढवण्याच्या हा एक प्रयत्न राहिला आहे. हा पदपथ प्रामुख्याने लाकडापासून बनवलेला आहे, त्यासाठी पाण्यामध्ये जांबा लाकडाचा वापर करण्यात आला आहे. तर सागवान लाकडाचा तुळयांचा आणि डेकिंगसाठी वापर केला आहे.
सध्या या पदपुलाची स्थिती अत्यंत बिकट झाली असून काही ठिकाणी डेकवरील लाकडी फळ्या मोडल्या आहेत. त्यामुळे तो भाग धोकादायक बनला असूनही प्रेमीयुगल येथे वेळ घालवण्यासाठी धोका पत्करून येत असल्याचे दिसते. पदपथावर जाण्यासाठी बंदी आहे. त्यासाठी येथील मार्गावर पत्रा आडवा लावला गेला आहे. तरीही प्रेमीयुगल त्याकडे कानाडोळा करून पदपथावर सुरक्षीत ठिकाण शोधतात.
या लाकडी पदपथाची निर्मितीसाठी २.२७ कोटी रुपये खर्च आला होता. त्याशिवाय मागील काळात या पदपथाची एकदा दुरुस्तीही करण्यात आली होती. परंतु पुन्हा पदपथाची दुरुस्ती गरजेची आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.