मडगाव : श्रीराम सेनेचे वादग्रस्त अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोव्यातील प्रवेश बंदी आणखी दोन महिन्यांनी वाढविली. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी 13 मे रोजी याबाबतचा आदेश जारी केला. त्यामुळे मुतालिक यांना गोव्यात प्रवेश करण्यास तुर्तास आणखी वाट पाहावी लागणार आहे.
2014 साली प्रमोद मुतालिक यांनी गोव्यात श्रीराम सेनेची शाखा गोव्यात उघडण्याची घोषणा केली होती. यानंतर लगेच गोवा सरकारने त्यांच्यावर प्रवेश बंदी लागू केली होती. ती बंदी आजपर्यंत तशीच लागू आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनीही तसा वेगळा आदेश जारी केला आहे. गोव्याच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेश जारी केल्यामुळे मुतालिक यांना गोव्यात प्रवेश करता येणार नाही.
प्रमोद मुतालिक हे श्रीराम सेना या कट्टर हिंदुत्त्ववादी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. प्रमोद मुतालिक वयाच्या तेराव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या शाखेत कार्यरत आहेत. आरएसएसमधील काही वरिष्ठांनी 1996 साली मुतालिक यांना बजरंग दलात सहभागी होण्याचा सल्ला दिला होता.
वर्षभरातच बजरंग दलाचे दक्षिण भारत संयोजक पदी मुतालिक यांची वर्णी लागली होती. आक्रमकता आणि जहाल भाषा यासाठी प्रमोद मुतालिक सर्वत्र ओळखले जातात. ठिकठिकाणी प्रक्षोभक वक्तव्ये करुन लोकभावना दुखावल्याप्रकरणी गेल्या 23 वर्षात त्यांच्यावर अनेक खटले दाखल आहेत. गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना केल्यामुळेही त्यांच्यावर टीका झाली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.