Goa Temple Dispute Dainik Gomantak
गोवा

Goa Temples: देव उभा देव्‍हाऱ्यात वाद चाले गावकऱ्यांत! विशेष लेख

Goa Temple Dispute: गावागावांमध्‍ये सुरू असलेल्‍या देवस्‍थानांतील वादामुळे त्‍या-त्‍या गावाच्‍या विकासाला खीळ बसत आहे. खरे म्‍हणजे देवालासुद्धा हे आवडणार नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Temple Controversies In Goa

गावागावांमध्‍ये सुरू असलेल्‍या देवस्‍थानांतील वादामुळे त्‍या-त्‍या गावाच्‍या विकासाला खीळ बसत आहे. खरे म्‍हणजे देवालासुद्धा हे आवडणार नाही. त्‍याच्‍यासमोर सर्व समान आहेत. तो कोणताही भेदभाव करत नाही. परंतु आपणच भेदभाव करून एकप्रकारे त्‍या विधात्‍याला आव्‍हान देत आहोत. खचितच हे योग्‍य नव्‍हे. गावातील मंदिरे ही सर्वांची आहेत. ती कोणा एकाची मालमत्ता नव्‍हेे. त्‍यामुळे निदान तेथे तरी मानापमान बाजूला ठेवला पाहिजे. कारण सर्व काही ‘तो’ बघत आहे.

धार्मिकस्थळांवर मानापमानाची नाट्ये अलीकडे खूपच दिसू लागली आहेत. काही देवस्थाने या वादांमुळे बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येते. देवासमोर सारे समान असताना. असे वाद होऊ देणे कितपत शहाणपणाचे याचा विचार कधीतरी केला गेला पाहिजे. धार्मिकस्थळांवर मानापमानाच्या वादावरून समस्या निर्माण होणे ही अत्यंत खेदजनक बाब होय. ‘देव हा सर्वांचा आहे. त्याच्या दारी सर्व समान आहेत’ ही संतांची शिकवण आपल्याला दिशा दाखवते. अशा परिस्थितीत संत परंपरेतील वचने व शिकवण अधिक महत्त्वाची ठरते.

असे असले तरी पूजेचा मान मला की तुला? देवस्थानची अमूक मालमत्ता मी भोगणार की तू? आदी कारणास्तव सामाजिक तेढ निर्माण होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कोणाचा पहिला मान, कोणाचा दुसरा मान ही संकल्पनाच मोडीत काढली तर हा प्रश्न सुटू शकतो. देवस्थानांची मालकी गावाकडे सोपवूनही यावर तोडगा काढता येतो. सध्या राज्यात प्रचलित असलेल्या कायद्यानुसार तसे करता येणार नाही यासाठी काय करावे लागेल याची चर्चा आपण नंतर करू. मुळात

देव हा साऱ्यांचा आहे तर देवस्थानेही सर्वांची हा विचार समाजात रुजवला पाहिजे. खासगी देवस्थानांची संकल्पना मोडीत काढली गेली पाहिजे. खासगी देवस्थानांमुळे भेदभाव निर्माण होतो. देव हा कुठल्याही एका वर्गाचा नाही; तो सर्वांचा आहे.

वाद सोडवण्याचा मार्ग कोणता असा प्रश्न या संत वचनांचा आधार घेत निकाली काढता येऊ शकतो. धार्मिकस्थळांवरील वाद सोडवण्यासाठी संतांची शिकवण मार्गदर्शक ठरते. नामदेवांचे मानवतेचे तत्त्व...सगळे एक आहेत, ही भावना आत्मसात करणे. कबीरांचे सार्वत्रिकत्व...सर्वांना देवाने समान निर्माण केले आहे. ज्ञानेश्वरांचे संतुलन...भेदभाव संपवून समत्वाचा स्वीकार करणे. तुकारामांचे प्रेम...सर्वांवर प्रेम करा आणि देवाचा मार्ग अनुसरा. रामदासांचे सहकार्य...एकमेकांना मदत करून वाद मिटवणे. अशा सूत्रांतून यातून मार्ग काढणे सहज शक्य आहे.

‘‘देवासमोर सर्व समान आहेत’’ हा संदेश संतांच्या शिकवणुकीचा गाभा आहे. विशेषतः खासगी देवस्थानांची संकल्पना मोडीत काढून सर्वांसाठी खुले व भेदभावविरहित धार्मिकस्थळ उभारल्यास वाद कमी होतील. संतांनी सांगितलेल्या समतेच्या शिकवणीचे पालन केल्यास समाजात एकता व बंधुभाव वाढेल आणि सर्वांना एकत्र येऊन देवाची पूजा करता येईल.

हे सारे करण्यासाठी कायदेशीर पावले सरकारला उचलावी लागतील. गोव्याचा महाजनी कायदा (Devasthan Regulation Act) हा गोव्यातील धार्मिकस्थळांच्या आणि देवस्थानांच्या व्यवस्थापनासाठी लागू करण्यात आलेला विशेष कायदा आहे. या कायद्यात ‘खासगी देवस्थान’ ही संकल्पना अंतर्भूत आहे, जी काही विशिष्ट देवस्थाने खासगी स्वरूपाची असल्याचे मान्य करते. परंतु अशा प्रकारची संकल्पना धार्मिकस्थळांच्या सार्वत्रिक व समतावादी व्यवस्थापनाच्या विरोधात असल्याचे आजवर दिसून आले आहे.

सर्व देवस्थानांची सार्वजनिक स्वरूपाची पुनर्रचना, सार्वजनिक मालमत्तेची व्याख्या : खासगी देवस्थाने ही सार्वजनिक धर्मभावनेसाठी महत्त्वाची ठिकाणे मानली जावीत आणि त्यांचा सार्वजनिक ठेवा म्हणून विचार केला गेला पाहिजे. सर्व देवस्थानांसाठी समान प्रकारचे नियम लागू करून खासगी व सार्वजनिक देवस्थानांमधील भेदभाव मिटवला जाऊ शकतो. त्याही पुढे जात प्रत्येक देवस्थानासाठी सार्वत्रिक व्यवस्थापन मंडळ स्थापन करणे, जे देवस्थानांच्या संपत्तीचे योग्य व्यवस्थापन सुनिश्‍चित करेल, असाही विचार करता येतो.

देवस्थानांच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक ग्रामसभा किंवा समित्यांचा समावेश करावा. यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि समतोल होईल. धर्माच्या सर्व समतावादी तत्त्वांचा आदर ठेवून देवस्थानांच्या व्यवस्थापनासाठी धर्मगुरू व सामाजिक संघटनांचे सहकार्य घेता येईल. ‘खासगी देवस्थान’ ही संकल्पना भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष व समानतेच्या तत्त्वांना बाधा आणते का, याचे उत्तर कायदा जाणकारांनी दिलेपाहिजे. निदान तशी चर्चा तरी झाली पाहिजे.

महाजनी कायद्याची पुनर्रचना करून एक नवीन कायदा तयार करता येईल, जो सर्व देवस्थानांना सार्वजनिक स्वरूपाचे मान्य करेल. खासगी देवस्थानांची संपत्ती सार्वजनिक ठेवीत हस्तांतरित करणे आणि तिचा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र मंडळ नेमणे असाही उपाय यासाठी आहे. यासाठी कायदेशीर, सामाजिक आणि प्रशासनिक स्तरांवर एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. तेवढा विवेक समाजात जागृत आहे का? या प्रश्‍‍नाच्या उत्तरातच देवस्थानांचा वाद भविष्यात तरी मिटेल का? या प्रश्‍‍नाचे उत्तर दडलेले आहे.

- अवित बगळे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT