Shiv Sanskruti Pratishthan Goa
Shiv Sanskruti Pratishthan Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Culture Special : गोमंतकीय ढोल-ताशा पथकाचं सीमोल्लंघन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Culture : ढोल-ताशे वादनाचे सादरीकरण एखाद्या स्पर्धेत करण्याचा अनुभव या पथकाला तसा नव्हताच. पण तशा एखाद्या स्पर्धेत भाग घ्यावे असे वाटण्याइतपत उत्साह त्यांच्यात नक्कीच होता. त्यांची तयारीही तशी बऱ्यापैकी होती. अशा प्रकारच्या स्पर्धा गोव्यात आयोजित होतही नाहीत. मग त्यांनी विचार केला की महाराष्ट्रात होणाऱ्या एखाद्या स्पर्धेत भाग घेऊन पहावे म्हणजे पथकातल्या सदस्यांना स्पर्धेचा अनुभव मिळेल व भविष्यात आपले सादरीकरण अधिक चांगले होण्यासाठी त्याचा उपयोगही होऊ शकेल. महाराष्ट्रात कागल या ठिकाणी होणाऱ्या ढोल-ताशे वादन स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. ही स्पर्धा नामांकित अशीच होती. स्पर्धेच्या परिक्षक मंडळामध्ये, रिएलिटी शोमध्ये तसेच सिनेमांच्या पार्श्‍वसंगीतामध्ये ढोलाचे योगदान देणारे शिवम साळुंके व प्रथमेश धुमाळ हे प्रसिध्द ढोलकवादक होते. या स्पर्धेत गोव्याच्या या पथकाने जेव्हा आपले ढोल-ताशे वादन सादर केले तेव्हा त्याला दर्शकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रातल्या दर्शकांसाठी हे ढोलवादन अगदी वेगळे होते. त्यातले ताल, सादर करण्याची पद्‍धत अनोखी होती. जेव्हा या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला तेव्हा परिक्षकांनी एकमुखाने विजेत्यांचे नाव जाहीर केले- शिवसंस्कृती प्रतिष्ठान, उसगांव गोवा!

तेव्हापासून गोव्यातल्या या ढोल-ताशे पथकाची विजेतेपदाची मोहीम सुरूच आहे. कागलनंतर जयसिंगपूर व हल्लीच बेळगाव इथे झालेल्या स्पर्धेतही त्यांनी आपला पहिला क्रमांक अबाधित राखला. महाराष्ट्र आणि कर्नाटकात सर्रास आयोजित होणाऱ्या ढोल-ताशे स्पर्धांमध्ये खुप चुरस असते. साधारण 20 ते 25 पथके स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सादर करत असतात. ढोल-ताशे वादनाची एक परंपराच त्या भागात आहे. मात्र अशी कोणतीही परंपरा आपल्या गोव्यात नसताना दिग्गज पथकांबरोबर स्पर्धा करून ढोल-ताशे सारख्या एका अनवट प्रकारात विजेतेपद मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. पण ‘शिवसंस्कृती प्रतिष्ठान’ ने ती साध्य करून दाखवली. जयसिंगपूर इथल्या स्पर्धेत तर मुंबईचे एक अजोड पथक भाग घेत होते. पण जेव्हा स्पर्धा संपली तेव्हा त्यांनीसुध्दा कबुल केले की ‘शिवसंस्‍कृती प्रतिष्ठान’ च्या रुपाने प्रथमच एक तुल्यबळ स्पर्धक संस्थेशी त्यांचा सामना झाला होता.

उसगांव येथे शिवजयंती उत्साहाने साजरी होते. 2018 वर्षाच्या शेवटच्या महिन्यात जेव्हा या उत्सवाची तयारी करण्यासाठी तिथली मंडळी एकत्र जमली तेव्हा त्यांनी त्या उत्सवासाठी परराज्यातून ढोल-ताशे पथक आणायचे ठरवले. चौकशी करता असे कळले की पथक आणण्यासाठी त्यांचे मानधन आणि इतर खर्च मिळून सव्वा लाखपर्यंत रक्कम लागणार होती. मंडळीनी तेव्हा विचार केला की बाहेरच्या पथकावर इतका खर्च करण्यापेक्षा आपण आपले स्वतःचेच ढोल-ताशे पथक का तयार करू नये? हा विचार पक्का झाल्यावर त्यांनी ढोल-ताशे वगैरे वाद्ये महाराष्ट्रातून विकत आणली. गोव्यातील म्‍हार्दोळ येथील प्रद्युम्न च्यारी हे त्यांचे प्रशिक्षक बनले आणि 1 जानेवारी 2019 रोजी तालीमींनी सुरुवात झाली. सुमारे 45 दिवस खडतर तालीम करून 19 फेब्रुवारी 2019 रोजी, शिवजयंतीच्या मुहुर्तावर त्यांनी आपले पहिले ढोल-ताशे वादनाचे सादरीकरण जल्लोषात केले. या त्यांच्या पहिल्या सादरीकरणात 250 कलाकार सहभागी झाले होते. 18 ढोल व 8 ताशे या सादरीकरणात वापरण्यात आले होते. 2019 साली झालेल्या या पहिल्या सादरीकरणानंतर आजवर सुमारे 100 ढोल-ताशे वादनाचे कार्यक्रम त्यांनी गोव्यात केले आहे. शिवजयंती, गणपती विसर्जन, धार्मिक सोहळे अशा अनेक निमित्ताने हे पथक आपले ढोल-ताशे वादनाचे सादरीकरण करते. स्पर्धांमध्ये मात्र त्यांनी यावर्षीच भाग घ्यायला सुरुवात केली आणि पहिल्याच वर्षी प्रत्येक स्पर्धेत विजेतेपद खेचून आणले.

‘शिवसंस्कृती प्रतिष्ठान’ च्या ढोल-ताशे पथकाला सुरुवातीपासून प्रद्युम्न च्यारी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. वादनाबरोबर सादरीकरणाच्या कोरिओग्राफीची बाजूही तेच सांभाळतात. या पथकाच्या सादरीकरणाची तडफदार शैली, वादनातला ताल, वादनात समाविष्ट केलेला मौखिक घोष या साऱ्यांमधून सादरीकरणाला विलक्षण उंची लाभते. या पथकात पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग अधिक आहे हे या पथकाचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. बेळगाव इथल्या स्पर्धेत या विजेतेपदाबरोबरच पथकातल्या उपासना देसाई आणि अन्नु धुरी यांना उत्कृष्ट ढोलवादक म्हणून पुरस्कारही लाभले. त्यांच्या सादरीकरणाचे व्हिडिओ युट्युबवर आहेत.

आपल्या पथकाने स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना प्रद्युम्न च्यारी सांगतात,‘ मी म्हार्दोळ या गांवचा असल्याने  पारंपरिक शिगमोत्सवातल्या ढोलवादनाची पार्श्‍वभूमी मला होतीच. गोव्यातल्या शिगमोत्सवात वाजवला जाणारा ताल, तबलावादनातली ‘परण,’ घोष या साऱ्यांमुळे  या सादरीकरणाला निश्चितच वेगळे स्वरुप प्राप्त झाले, जे महाराष्ट्र व कर्नाटकातल्या  दर्शकांसाठी  वेगळे व रोमांचकारी होते’. या पथकाला मार्गदर्शन करण्यापूर्वी प्रद्युम्न यांच्याकडे ढोल-ताशे स्पर्धेचा अनुभव नव्हता. त्यांनी युट्युबवरून अशा स्पर्धांमध्ये कशा प्रकारचे सादरीकरण होते याचा अभ्यास केला. त्यांच्या सादरीकरणापेक्षा आपल्या पथकाचे सादरीकरण वेगळे असायला हवे हे त्यांनी ठरवले व ते प्रत्यक्षातही आणून दाखवले.

कागल येथील स्पर्धेसाठी शिवम साळुंके व प्रथमेश धुमाळ हे सिनेमासृष्टीतील प्रसिध्द ढोलकवादक परिक्षक होते. धुमाळ हे ‘शिवसंस्कृती..’च्या सादरीकरणाने इतके प्रभावित झाले की सादरीकरण संपल्यानंतर त्याना आवडलेला ताशा वादनामधला एक विशिष्ट तुकडा त्यांनी या पथकाला पुन्हा वाजवायला सांगितला. सर्वात जास्त ‘तिहाया’,  सर्वात जास्त ‘रोल’ ‘शिवसंस्कृती..’च्या सादरीकरणात समाविष्ट  होते, सर्वात जास्त ‘चेंज ओव्हर’, ॲक्शन त्यांच्याच सादरीकरणातून दिसून आले. धुमाळ यांनी त्यासाठी पथकाचे खुलेपणाने अभिनंदन केले. या पथकाचे सादरीकरण ‘मावळ्यांनी गड राखल्याप्रमाणे’ केले असे त्यावेळी त्यांचे उद्गार होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT