पणजी: शरद पोंक्षे अभिनय करत असलेल्या ‘पुरुष’ या व्यावसायिक नाट्यप्रयोगादरम्यान कला अकादमीच्या नाट्यगृहात प्रकाश योजनेचा घोळ होऊन नाटक तात्पुरते बंद पडण्याची जी घटना घडली, त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना माझे नाव शरद पोंक्षे यांनी ज्याप्रकारे गोवले, त्यातून त्यांनी माझ्या विरोधकांकडून सुपारी घेतली आहे हेच सिद्ध होते, असे खळबळजनक विधान कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
त्या नाट्य प्रयोगादरम्यान प्रकाश योजनेसंदर्भात नेमका कुठला तांत्रिक बिघाड झाला होता, याचा खुलासा करण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती.
नाट्य प्रयोगादरम्यान जो तांत्रिक बिघाड झाला, त्यासंदर्भात कला अकादमीतील कर्मचाऱ्यांकडून तयार केला गेलेला अहवाल या पत्रकार परिषदेत गोविंद गावडे यांनी सादर केला. हा संपूर्णपणे तांत्रिक बिघाड होता, असे त्यांनी या अहवालाच्या आधारे सांगितले. या नाट्यगृहात बसविलेल्या एलईडी लाईट या एका विशिष्ट साखळीच्या भाग असतात. त्या साखळीतील एका जरी लाईटमध्ये बिघाड झाला, तर साऱ्या प्रणालीवर त्याचा परिणाम होतो, हा त्या अहवालाचा गोषवारा होता. या प्रकाश योजनेच्या प्रणालीतील त्रुटी सार्वजनिक बांधकाम खात्याला कळविल्या आहेत. त्यांना पर्याय म्हणून ‘टंग्स्टन लाईटस्’ बसविण्यासंबंधी निवेदन देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
मुळात जी समिती नेमलेली नाही, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी टास्क फोर्सच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना सांगितले होते, त्या समितीचाच अहवाल स्वीकारून शेवटी कला अकादमीतील प्रकाश योजना प्रणाली बदलण्यात येणार आहे. या समितीचा अहवाल स्वीकारण्यास आणि त्यांनी सुचवलेले बदल घडवून आणण्यास इतके महिने का उशीर झाला, याबद्दलही मंत्री गावडे यांनी खुलासा केला नाही आणि नवीन प्रकाशयोजना प्रणाली बसविण्याचा खर्च किती असेल आणि तो कोणाकडून वसूल केला जाईल, याबद्दलही ते या पत्रकार परिषदेत बोलले नाहीत.
कला अकादमीत ‘पुरुष’ नाटकावेळी प्रकाश व्यवस्थेचा केवळ दोनच मिनिटांचा घोळ झाला. ही गोष्ट काही फार मोठी नाही, असे सांगत मंत्री गावडे यांनी कला अकादमीतील गोंधळाचे समर्थनच केले. ‘आदरणीय शरद पोंक्षेसाहेब, तुम्ही गैर बोललात. गैर बोललात, त्यापेक्षा तुम्ही गैर लोकांच्या नादात फसलात’, अशा शब्दांत मंत्री गावडे यांनी शरद पोंक्षे यांच्यावर शरसंधान साधले.
जे लोक कला अकादमीला आपली आई मानतात, त्यांनी कला अकादमीचे नाव खराब करण्याचा विडा उचलला आहे, असा आरोपही त्यांनी या पत्रकार परिषदेत केला.
नाट्यगृहात प्रकाश योजनेसाठी ज्या प्रकारची प्रणाली बसविली आहे, त्यातील त्रुटी मान्य करून गेल्या जुलै महिन्यात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नेमलेल्या समितीने जे उपाय सुचविले आहेत, त्यानुसार पावले उचलण्याचे ठरविले आहे. पुढील साधारण एका महिन्यात प्रकाशयोजना प्रणालीची पुनर्रचना होईल, असे या पत्रकार परिषदेत मंत्री गावडे यांनी सांगितले.
शरद पोंक्षे यांनी या नाट्यप्रयोगादरम्यान स्वतःची ध्वनियंत्रणा वापरण्यासंबंधीचे विधान केले होते, ते गोविंद गावडे यांनी खोडून काढले. त्यांच्या संस्थेने वापरलेली ध्वनिसाधने नाट्यगृहाच्या मुख्य यंत्रणेला (पीए सिस्टम) जोडली गेली होती. त्यामुळे शरद पोंक्षे यांनी केलेले विधान खोटे आहे, असेच त्यांचे म्हणणे होते.
कला अकादमीने आयोजित केलेली मराठी राज्य नाट्य स्पर्धा व तियात्र स्पर्धा सुरळीतपणे पार पडली, हे देखील या पत्रकार परिषदेत गोविंद गावडे यांनी सांगितले; परंतु राज्य नाट्य स्पर्धेसाठी कला अकादमीने वेगळ्या प्रकाश योजनेची तात्पुरती व्यवस्था केली होती, हे सांगायचे मात्र त्यांनी टाळले.
सध्या बसविलेली दोषपूर्ण प्रकाश योजनाप्रणाली मुळातच नूतनीकरणावेळी कशी व का बसविली, याचा खुलासा मात्र त्यांनी यावेळी केला नाही. त्याशिवाय शरद पोंक्षे यांनी नाट्यगृहातील वातानुकूलन व्यवस्था, त्यातून ठिबकणारे पाणी याविषयी केलेल्या तक्रारींबद्दल मंत्र्यांनी चकारही शब्द उच्चारला नाही.
नव्यानेच नूतनीकरण झालेल्या इमारतीच्या वातानुकूलन व्यवस्थेला गळती कशी लागू शकते, याविषयी पत्रकारांनी जेव्हा प्रश्न केला, तेव्हा काही वर्षे जुन्या झालेल्या वातानुकूलन यंत्रणेत असे होणे शक्य आहे, असा त्यांचा खुलासा होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.