पणजी : राज्यातील शाळा नियोजित वेळेत म्हणजेच ६ जून रोजी सुरू होतील, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शाळा सुरू होणार की नाही याविषयी संभ्रम होता. या पार्श्वभूमीवर झिंगडे यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की शाळा ठरलेल्या वेळेत सुरू होतील. सरकारने किंवा आरोग्य खात्याने काही सूचना केल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल.
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे शाळा नियमितपणे सुरू झाल्या नाहीत. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात आले. तर गेले शैक्षणिक वर्ष अर्धे ऑनलाईन तर अर्धे नियमितपणे सुरू झाले. काही महिन्यांपूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेतले. मात्र, जूनमध्ये राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून देशातील काही राज्यांसह गोव्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे यावर्षी तरी शाळा सुरू होतील की नाही याविषयी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांत उलटसुलट चर्चा सुरू होत्या.
कोरोना काळात ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेण्यात आले. मात्र, ते तितकेसे सुलभ नव्हते. विद्यार्थी, पालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागलाच. शिवाय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही समस्या झेलाव्या लागल्या. सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईल, टॅब, संगणक आदी सुविधा उपलब्ध करणे आर्थिकदृष्ट्या शक्य झाले नाही. सरकारने अनेक विद्यार्थ्यांना मोबाईल, टॅब, संगणक दिले. तरीही ग्रामीण आणि दुर्गम भागात इंटरनेट नेटवर्कची समस्या उग्र ठरली. तसेच ठरलेल्या वेळेत सर्व विद्यार्थी ऑनलाईन येतीलच याचीही खात्री नसते. यामुळे शिक्षकांना बऱ्याचदा एकच अभ्यासक्रम विद्यार्थ्याच्या वेळेनुसार वेगवेगळा शिकवावा लागला. तरीही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले काम इमानेइतबारे पार पाडले. तसेच विद्यार्थी आणि पालकांनीही सहकार्य केले, असे झिंगडे म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.