पणजी: ‘‘माजी मंत्री मिलिंद नाईक यांना २०२१ मध्ये एका प्रकरणात काँग्रेसनेच उघडे पाडलेले होते. त्यासंदर्भातील पुरावेही माझ्याकडे आहेत. काँग्रेसने येत्या विधानसभा निवडणुकीत मिलिंद नाईक यांना उमेदवारी दिल्यास ते पुरावे मी जनतेसमोर सादर करेन’’, असा अप्रत्यक्ष इशारा मंत्री तथा मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.
‘‘२०२१ मध्ये मिलिंद नाईक यांना एका प्रकरणात उघडे पाडण्याचा सूत्रधार मीच होतो. परंतु, त्यामागे काँग्रेसचा हात होता. त्याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी नाईक प्रयत्नशील आहेत. परंतु, त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय अजून झालेला नाही. काँग्रेसने नाईक यांना पक्षात घेऊन निवडणुकीची उमेदवारी त्यांना दिल्यास माझ्याकडील सर्व पुरावे मी सादर करेन’’, असे मंत्री आमोणकर म्हणाले.
‘‘पक्षांतरावरून काँग्रेस माझ्यावर अनेक आरोप करीत आहे. परंतु, काँग्रेसनेच पक्षांतरास थारा दिल्याचा इतिहास आहे. मगो पक्षाच्या अनेक आमदारांना फोडून त्यातील काहीजणांना मुख्यमंत्रिपद देण्याची उदाहरणेही काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात घडलेली आहेत. त्यामुळे काँग्रेसला पक्षांतरावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही’’, असे आमोणकर म्हणाले.
‘‘काँग्रेसमध्ये मी अनेक वर्षे काम केले, परंतु कधी दिल्लीतून आलेल्या नेत्यांना भेटता आले नाही. सध्या त्या पदांवरील नेत्यांचीही तीच परिस्थिती आहे. भाजपची स्थिती त्याविरोधात आहेे’’, असेही त्यांनी नमूद केले.
चार वर्षांत गिरीशशी बोलणे, भेट नाही!
‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी माझे दृढ नाते होते. काँग्रेसमधून भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची माहिती मी १४ सप्टेंबर २०२२ रोजी चोडणकर यांना दिली होती. त्यानंतर मात्र माझा त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. किंबहुना आम्ही कधी भेटलोही नाही’, असेही संकल्प आमोणकर यांनी स्पष्ट केले.
तीन महिन्यांत खात्यांना न्याय देईन!
‘भाजपात जाण्याचा निर्णय मी विनाशर्त घेतला होता. त्यानंतर पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मंत्रिपद लवकर मिळावे ही अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही. निवडणुकीस तीन महिने असताना मला मंत्रिपद मिळाले असले, तरी या तीन महिन्यांत मिळालेल्या सर्व खात्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन’, असेही मंत्री आमोणकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.