Sao Joao Festival Goa: राज्यातील पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्सवांमध्ये एक आगळं-वेगळं स्थान असलेला ‘सांजाव’ हा सण दरवर्षी 24 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सेंट जॉन द बॅप्टिस्ट (St. John the Baptist) या ख्रिश्चन संताच्या सन्मानार्थ साजऱ्या होणाऱ्या या सणाला खास करुन कॅथलिक समुदायात महत्त्वाचे स्थान आहे. गोव्याच्या विविध भागांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात हा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि जल्लोषात साजरा केला जातो.
दरम्यान, या सणाची एक खास ओळख म्हणजे स्थानिक तरुण मद्यपान करुन, पारंपरिक टोपी (झाटे) घालून, ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करत विहिरीत उड्या मारतात. या सणादरम्यान मॉन्सूनचे स्वागत, निसर्गाचे आभार आणि सेंट जॉन यांच्या स्मरणार्थ उत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी घराच्या अंगणात सजावट केली जाते, पारंपरिक पदार्थ बनवले जातात आणि घरातील विहिरीला फुलांनी सजवले जाते.
गोव्यातील (Goa) या उत्सवाचे पर्यटनदृष्ट्याही महत्त्व वाढत आहे. यंदाही गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी खास सहभाग घेत सांजाव सण साजरा केला. त्यांनी स्थानिक तरुणांबरोबर संवाद साधत, या पारंपरिक सणाचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. खवंटे यांनी सांगितले की, “सांजाव हा फक्त सण नाहीतर गोव्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक आहे. अशा सणांद्वारे गोव्याच्या खऱ्या परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचतात.”
सांजाव सणाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक लोकसंगीत, नृत्य, आणि गोमंतकीय खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी. स्थानिक आणि पर्यटक यांच्यासाठी हा एक अनोखा अनुभव ठरतो. गोव्यातील खेड्यांमधील विहिरी, तलाव आणि नाले हे या सणाचे केंद्रबिंदू असतात. या वर्षीही विविध गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने आणि जल्लोषात ‘सांजाव’ साजरा करण्यात आला. पावसाच्या सरी, निसर्गसौंदर्य, आणि लोकसंस्कृती यांचा संगम असलेला हा सण गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अनमोल ठेवा मानला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.