Samuel Braganza Mapusa death Dainik Gomantak
गोवा

सॅम्युअलच्या बहीण, कुटुंबीयांचा टाहो... म्हापशात मूक मेणबत्ती मोर्चा; मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Samuel Braganza Mapusa death: सॅम्युअलला न्याय मिळावा यासाठी रविवारी सायंकाळी म्हापसा चर्च ते पोलिस स्थानकापर्यंत मूक मेणबत्ती फेरी काढण्यात आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: अवघ्या २२ वर्षांच्या सॅम्युअल ब्रागांझा या तरुणाच्या मृत्यूने संपूर्ण म्हापसा शहर सुन्न झाले आहे. ‘माझा भाऊ, आता या जगात परत येऊ शकत नाही, पण त्याला न्याय तरी मिळायला हवा’ हा त्याची बहीण आणि कुटुंबीयांचा टाहो ऐकून रविवारी म्हापशात उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले.

सॅम्युअलला न्याय मिळावा यासाठी रविवारी सायंकाळी म्हापसा चर्च ते पोलिस स्थानकापर्यंत मूक मेणबत्ती फेरी काढण्यात आली. रिमझिम पावसाच्या सरींनाही न जुमानता, सॅम्युअलच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी मोठ्या संख्येने तरुण आणि स्थानिक नागरिक या फेरीत अत्यंत भावूक वातावरणात सहभागी झाले होते.

सॅम्युअलच्या शवविच्छेदन अहवालातून एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही जखम त्याला कशी झाली? आत्महत्येपूर्वी त्याच्यासोबत नक्की काय घडले होते? याचा निष्पक्ष तपास होण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

जोपर्यंत संबंधित पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांना या प्रकरणाच्या तपासातून बाजूला करून निलंबित केले जात नाही, तोपर्यंत या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊच शकत नाही, असा ठाम विश्वास कुटुंबीयांनी व्यक्त केला.

सॅम्युअलचा मृतदेह ताब्यात घेण्याबाबत वकिलांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचेही बहिणीने स्पष्ट केले. तसेच केवळ सॅम्युअल जिवंत असतानाच नाही, तर त्याच्या मृत्यूनंतरही शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी पोलिसांनी कुटुंबीयांना मानसिक त्रास दिला, असा आरोपही यावेळी सॅम्युअलच्या बहिणीने केला.

‘त्या’ बंदुकीचे गूढ कायम

सॅम्युअलने एका देशी कट्ट्याने (बंदुक) स्वतःचे आयुष्य संपवले, परंतु एका २२ वर्षांच्या मुलाकडे ही बंदूक आली कुठून असा प्रश्न विचारला असता बहिणीने सांगितले की, आम्हाला या बंदुकीबद्दल कोणतीही माहिती नाही. मात्र, ती बंदूक कुठून आली यापेक्षाही, ज्या व्हिडिओमुळे आणि पोलिसांच्या संवेदनशीलतेअभावी सॅम्युअलने हे टोकाचे पाऊल उचलले, त्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई होणे जास्त गरजेचे आहे.

पोलिसांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह

सॅम्युअलच्या कुटुंबीयांनी म्हापसा पोलिस, व्हिडिओ बनवणारी व्यक्ती आणि संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सॅम्युअलच्या बहिणीने अत्यंत जड अंतःकरणाने पोलिसांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ती म्हणाली, ‘पोलिसांनी सॅम्युअलला चौकशीच्या नावाखाली तासनतास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. त्याला काही बंद केबिनमध्येही नेण्यात आले होते, जिथे आम्ही सोबत नव्हतो. त्या बंद खोलीत पोलिसांनी त्याला कशी वागणूक दिली, हे देवालाच ठाऊक! आधी चौकशीच्या नावाखाली त्याचा छळ केला आणि नंतर सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल करून त्याचे चारित्र्यहनन करण्यात आले. या अमानुष ट्रोलिंगमुळे सॅम्युअल पूर्णपणे खचून गेला होता.’

‘लढा सुरूच ठेवणार’

या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते जितेश कामत म्हणाले, ‘एरवी पोलिस कोणत्याही गुन्ह्याचा तपास करताना एवढी तत्परता दाखवत नाहीत, मग सॅम्युअलच्या बाबतीत पोलिसांनी इतकी तत्परता दाखवून तातडीने गुन्हा का नोंदवला? पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेचा अभाव ठेवून हाताळले आहे. ज्या अधिकाऱ्यांनी सॅम्युअलला आत्महत्येस प्रवृत्त केले, त्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ केले पाहिजे.’

या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आपण लवकरच पोलिस महासंचालकांची भेट घेणार असल्याचे विजय भिके आणि नौशाद चौधरी यांनी सांगितले.

३ जोपर्यंत सॅम्युअलला पूर्ण न्याय मिळत नाही आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा जनलढा थांबणार नाही, असा इशारा मूक मेणबत्ती मोर्चातील उपस्थितांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

Europe Heatwave: युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर! फ्रान्समध्ये 1000 हून अधिक मृत्यू; 'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे परिस्थिती गंभीर

Mann Ki Baat: 'मन की बात' की 'मनातील गुपित'? ज्वलंत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून 'मोदी सरकार'ला काय साध्य करायचंय?

SCROLL FOR NEXT