आदित्य सूर्यवंशी याच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर साळगावकर क्रिकेट क्लबने बांदोडकर करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात त्यांनी जीनो स्पोर्टस क्लबला 63 धावांनी हरविले.
पणजी जिमखान्याच्या या स्पर्धेतील अंतिम सामना गुरुवारी कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या आदित्यने नाबाद 84 धावा केल्या. त्याने 43 चेंडूंचा सामना करताना तब्बल 10 षटकार मारले. याव्यतिरिक्त त्याने एका चौकाराचीही नोंद केली.
नंतर कर्णधार दीपराज गावकर यानेही 44 धावांची चमकदार खेळी केली. त्यामुळे प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर साळगावकर क्लबला 8 बाद 191 धावा करणे शक्य झाले. नंतर लकमेश पावणे याने सुरवातीलाच धक्के दिल्यामुळे जीनो क्लबला आव्हान पेलवले नाही व त्यांचा डाव 128 धावांत संपुष्टात आला.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर यांचे नातू समीर काकोडकर, पणजी जिमखान्याचे सचिव राजेश खंवटे, खजिनदार सुरेश कारापूरकर, सदस्य प्रशांत काकोडे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.
विजेत्यांना 75 हजार रुपये
विजेतेपदामुळे साळगावकर क्लबला 75 हजार रुपये व शानदार करंडकाचा मान मिळाला. उपविजेत्या जीनो क्लबला 40 हजार रुपये व करंडक देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक
साळगावकर क्रिकेट क्लब : 20 षटकांत 8 बाद 191 (आदित्य सूर्यवंशी नाबाद 84, दीपराज गावकर 44, सुबोध भट्टी 19, आर्यन मिश्रा 4-30, मानस 1-42, हर्षद गडेकर 1-29, अमित यादव 1-38) विजयी विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब : 19.1 षटकांत सर्वबाद 128 (ईशान गडेकर 25, योगेश कवठणकर 16, सनथ नेवगी 25, शिवेंद्र भुजबळ 21, सुबोध भट्टी 1-26, लकमेश पावणे 4-22, अथर्व अंकोलेकर 2-24, दीपराज गावकर 2-32, श्रीनिवास फडते 1-0).
वैयक्तिक बक्षिसे
स्पर्धेचा मानकरी व फलंदाज : दीपराज गावकर (साळगावकर)
उत्कृष्ट गोलंदाज : आर्यन मिश्रा (जीनो)
अंतिम सामन्याचा मानकरी : आदित्य सूर्यवंशी (साळगावकर).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.