Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कोठडीतील मृत्यूचे धागेदोरे थेट गोव्यात; रहस्यमय मोबाईलसह प्रशिक्षकाचा गुप्त प्रवास, एसआयटीच्या तपासात धक्कादायक खुलासा

Sai Krishna Custody Death Case: आंध्र प्रदेशातील साई कृष्णा या हिस्ट्रीशीटरच्या कथित कोठडीतील मृत्यू प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले असून, तपासाची सुई थेट गोव्यापर्यंत पोहोचली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: आंध्र प्रदेशातील साई कृष्णा या हिस्ट्रीशीटरच्या कथित कोठडीतील मृत्यू प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले असून, तपासाची सुई थेट गोव्यापर्यंत पोहोचली आहे. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीत निलंबित पोलिस हवालदाराने आपल्या परिचयातील एका व्यायाम प्रशिक्षकाला रहस्यमय मोबाईल फोनसह गोव्यात पाठविल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या गूढ प्रवासामागे पुरावे नष्ट करण्याचा कट होता की आणखी काही मोठे रहस्य दडले आहे, याचा तपास सुरू आहे. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, आरोपी हवालदाराचे विजयवाड्यातील एका व्यायामशाळेत नियमित येणे-जाणे होते. तेथील प्रशिक्षक सुशांत याच्याशी त्याचे घनिष्ठ संबंध होते. साई कृष्णाला ८ मेच्या रात्री पोलिस ठाण्यातून बाहेर नेल्यानंतर काही दिवसांनी आरोपीने सुशांतला गुप्तपणे भेटून एक मोबाईल फोन दिला.

प्रथम बसने हैदराबाद आणि त्यानंतर गोव्यात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. संपूर्ण प्रवासाचा खर्चही आरोपीनेच उचलल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे. गोव्यात पोहोचेपर्यंत मोबाईल सुरू करू नये, अशी सक्त ताकीद सुशांतला देण्यात आली होती. गोव्यात पोहोचल्यानंतर त्याने आरोपीशी संपर्क साधला. त्यानंतर मोबाईलवरील ''फ्लाइट मोड'' बंद करून तो सुरू करण्यास सांगण्यात आले.

एका विशिष्ट क्रमांकावर फोन करून दोन ते तीन मिनिटे संभाषण झाल्यानंतर मोबाईल पुन्हा बंद करण्यात आला. त्यानंतर सुशांत विजयवाड्याला परतला आणि मोबाईल आरोपीकडे सुपूर्द केल्याचे चौकशीत समोर आले आहे. एसआयटीला या मोबाईलसोबत आधार कार्ड आणि काही कागदपत्रे सापडल्याची माहिती आहे. ही कागदपत्रे नेमकी कोणाची आहेत, त्यांचा मृत साई कृष्णाशी किंवा या प्रकरणातील अन्य कोणाशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, सुशांतने हा प्रवास आपल्या मोठ्या भावाला सांगितला होता. भावाने या प्रकरणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता; मात्र पोलिस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरूनच आपण हे काम करत असल्याचे सुशांतने त्याला सांगितल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. गोव्यातील हा गुप्त प्रवास संपूर्ण कटातील महत्त्वाचा दुवा ठरतो का, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता का, की या प्रकरणात आणखी काही व्यक्ती सहभागी आहेत, याचा उलगडा आता एसआयटीच्या पुढील तपासातून होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गोव्यासह देशभरातील तपास यंत्रणांचे लक्ष लागले आहे.

तपासातील महत्त्वाचे मुद्दे

कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे गोव्यापर्यंत.

निलंबित पोलिस हवालदाराने व्यायाम प्रशिक्षकाला गोव्यात पाठवल्याचा संशय.

रहस्यमय मोबाईल गोव्यातच प्रथम सुरू करण्याच्या सूचना.

विशिष्ट क्रमांकावर दोन-तीन मिनिटांचे संभाषण.

मोबाईलसोबत आधार कार्ड व इतर कागदपत्रे असल्याचा तपास.

पुरावे नष्ट करण्याचा कट की मोठ्या षडयंत्राचा भाग, याचा शोध सुरू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Art Exhibition: 'स्टिल/गोवा'मधून दिसणार गोव्याची अनोखी कहाणी; 1994 ते 2004 चा काळ छायाचित्रांतून जिवंत

Surya Gochar 2026: प्रेमसंबंधात गोडवा अन् करिअरसह व्यवसायात भरभराट! सूर्याचं धमाकेदार गोचर; 5 राशींचं उजळणार नशीब

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

SCROLL FOR NEXT