मडगाव: बाणावलीचे आप आमदार वेंझी व्हिएगस यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कौतुक करत राज्यात सुरु असलेल्या विकासकामांची स्तूती केली. यावेळी त्यांनी सावंत यांची तुलना राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याशी केली. यावरुन विजय सरदेसाईंनी वेंझी आणि सावंत यांच्यावर टीका केली. या टीकेला वेंझीने देखील उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भाऊसाहेब बांदोडकर यांच्यासोबत केलेली तुलना मजेशीर आहे. वेंझी व्हिएगस यांनी केलेली ही तुलना अत्यंत वरवरची आहे. मला या दोघांमध्ये एकच समानता दिसते ती म्हणजे गोव्याची ओळख नष्ट करण्याची त्यांची अस्पष्ट इच्छा आणि गोव्याला महाराष्ट्राचाच एक भाग म्हणून चालवण्याची त्यांची इच्छा.
'भाऊसाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून अनेक शाळा सुरू केल्या, पण सध्याचे मुख्यमंत्री त्या बंद करत आहेत. आमच्याकडे १००० पेक्षा जास्त सरकारी प्राथमिक शाळा होत्या; आता आमच्याकडे ६०० शाळा उरल्यात, त्यात ५७ टक्के शाळांत ५ पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. भाजप सरकार शिक्षणाबाबत किती उदासीन आहे हे मला सांगण्याची गरज नाही; मुख्यमंत्र्यांनी स्वत: एक मजबूत शैक्षणिक धोरण विकसित करण्यात अक्षमता मान्य केली होती', अशा शब्दात सरदेसाईंनी टीका केली आहे.
'विजय सरदेसाई यांच्या या टीकेला वेंझी व्हिएगस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करण्याची विजयची सवय आहे. पण, त्यांनी केलेल्या कृत्यांमुळे २०१७ आणि २०१९ मध्ये गोव्यात भाजप सत्तेत आली आणि सरकारी प्राथमिक शाळा बंद करणे, जमीन घोटाळे आणि जमिनीचे रूपांतरण करून गोव्याच्या पतनात त्यांचे योगदान होते.'
'विजय सरदेसाईंचा अजेंडा गोवा सुधारण्याऐवजी स्व-प्रमोशनवर अधिक केंद्रित असल्याचे दिसते. विरोधी पक्षांना बदनाम करण्यासह त्यांचे डावपेच गोव्याच्या हिताची खरी काळजी करण्याऐवजी सत्ता आणि नियंत्रणाच्या इच्छेने चाललेले दिसतात', असा पलटवार व्हिएगस यांनी सरदेसाईंवर केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.