Goa are crowded again) Dainik Gomantak
गोवा

Goa: असे वागून पुन्हा तेच दिवस दाखवणार का? वास्तवाचे भान विसरून लोकांची गर्दी

गोवा (Goa) ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांना विचारले असता, त्यांनी किनारी भागात पर्यटकांनी तोबा गर्दी केल्याच्या माहितीस दुजोरा दिला.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोविडविषयक नियम शिथिल करण्याचा अवकाश, राज्यात पुन्हा वास्तवाचे भान विसरून लोकांनी रस्ते, कार्यालये, किनाऱ्यांवर एकच गर्दी करणे सुरू केले आहे. पर्यटकांनीही नेहमीच्या गर्दीच्या ठिकाणी घोळके करण्यास सुरुवात केली असून, त्यांना कोणताही धरबंद राहिलेला नाही. (Roads, offices, shores in Goa are crowded again)

राज्य सरकारने दुकाने रात्रीपर्यंत उघडी ठेवण्याचा आदेश जारी केला आणि त्याचा अर्थ सारेकाही खुले झाले असा घेतला गेला. कोविड संचारबंदीमुळे वैतागलेले सारे घराबाहेर पडले होते. सरकारी कार्यालयात गेले महिनाभर कर्मचाऱ्यांची उपस्थिती असली तरी लोकांची ये-जा फारशी नव्हती. नेहमीप्रमाणे सरकारी कार्यालये गजबजलेली दिसली.

क्षमतेपेक्षा निम्म्या प्रमाणात ग्राहक घेऊन हॉटेल्स व रेस्टॉरंटस् सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी बहुतांश हॉटेल्समध्ये ग्राहकांना प्रवेश बंदी कायम होती. पणजीतील कॅफे भोसले बंद होते, तर सरोवर व संयोगमध्ये ग्राहकांना प्रवेशाचा मज्जाव होता. कॅफे शीतलमध्ये एका टेबलवर दोन ग्राहक या पद्धतीने प्रवेश दिला जात होता. पणजीचे आंतरराज्य बसस्थानकही सोमवारी गजबजलेले होते. खासगी बससेवा अद्याप म्हणावी तशी सुरू झाली नसली तरी कदंबच्या माध्यमातून पणजीत अनेक प्रवासी दाखल झाले. कर्नाटकातून एसटी बसेस राज्यात आल्या नाहीत. अद्याप कदंबने आंतरराज्य बससेवा सुरू केलेली नाही.

महाराष्ट्र एसटीबसही दिसली नाही

ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांना विचारले असता, त्यांनी किनारी भागात पर्यटकांनी तोबा गर्दी केल्याच्या माहितीस दुजोरा दिला. लोबो म्हणाले, की पर्यटक कोणतेही शारीरिक अंतर न पाळता, मास्क न परिधान न करता बिनधास्तपणे फिरतात. अर्थचक्र सुरू होण्यासाठी पर्यटनाशी संलग्न व्यवसाय सुरू झाले पाहिजेत, याविषयी दुमत नाही. यामुळे पर्यटकांना मुक्तपणे फिरण्याचा परवाना कोविड महामारीच्या काळात कोणी दिलेला नाही. व्यावसायिकांची कर्जे थकली आहेत, रोजंदारीवर काम करणारे बेरोजगार झाले आहेत. त्या सर्वांना काम मिळाले पाहिजे. त्यासाठी निर्बंधाची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. सरकार म्हणून आमची सर्वांची अशा बेशिस्त वागणाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी आहे.

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, आज गर्दी झाली ती सर्वांनाच दिसली. सरकारने निर्बंध शिथिल केले तर ते कडक करा, असे म्हणतात, आणि कडक केले तर अर्थचक्र फिरवण्यासाठी ते शिथिल करा, असे म्हणतात. सरकारने ऐकावे तरी कोणाचे. पर्यटन राज्य असल्याने पर्यटक येणे साहजिक आहे; पण कोविड काळातील सूचनांचे पालन करणे त्‍यांनाही लागू होते. एकीकडे व्यवसाय सुरू ठेवण्याचे आव्हान, तर दुसरीकडे पर्यटकांना आवर घालण्याचे आव्हान आहे. सगळ्यांनीच जबाबदारीने वागले पाहिजे.

उत्सव, मनोरंजन, मेळाव्यांवर मर्यादा

लवकरच श्रावण महिना, गणेशोत्सवाचे दिवस येणार आहेत. परंतु महामारी संपेपर्यंत मनोरंजनाचे कार्यक्रम, सभा, बैठका, मेळावे, उत्सव मर्यादित व्हावेत, संहितेच्या पालनाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला. कृती दलासमोर तशी शिफारस केली जाणार असून गणेशोत्सवावर यंदाही संक्रांत येण्याची शक्यता आहे. महामारीला पूर्णविराम मिळेपर्यंत उत्सव, कार्यक्रम, जाहीर बैठकांवर निर्बंध हवेत, अशी शिफारस कोवि़ड कृती दलाला करण्याचा निर्णय तज्ज्ञ समितीने घेतला आहे. अलीकडेच उच्च न्यायालयाने काही याचिका निकालात काढताना कोविडप्रश्नी निष्काळजीपणा होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याची मुख्य जबाबदारी सरकारनियुक्त डॉक्टरांच्या तज्ज्ञ समितीवर टाकली आहे. त्या अनुषंगाने औषधांचा साठा, खाटा, प्राणवायूची उपलब्धता इत्यादीसाठी तज्ज्ञ समितीला सतर्क राहावे लागणार आहे. तज्ज्ञ समितीच्या वारंवार बैठका घेण्याचे निर्देशही न्यायालयाने निवाड्यात दिल्यामुळे समिती कामाला लागली आहे.

गेल्या आठवड्यात 2 जुलै रोजी त्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ समितीची बैठक झाली. कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, तसेच प्रामुख्याने 18 वर्षांखालील मुलांना कोविड होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यावी, गंभीर नसल्यास मुलांना विलगीकरणात कसे ठेवावे व त्यांच्याशी, पालकांशी डॉक्टरांनी कसा संपर्क ठेवावा, यासाठी विशेष व्यवस्थापन आराखडा तयार झाला आहे. त्यासंबंधी खासगी इस्पितळे, तसेच आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मुलांशी संबंध येणाऱ्यांचे लसीकरण प्राधान्यक्रमाने

अंगणवाडी शिक्षक, मदतनीस, बालरथांचे वाहनचालक, शाळांतील अन्य कर्मचारीवर्ग, आया, सुरक्षा कर्मचारी इत्यादींना लसीकरणाविना 18 वर्षांखालील मुलांच्या संपर्कात येण्यास देऊ नये, याची दक्षता घेण्याचे आदेश जारी करावे लागतील, असे मत तज्ज्ञांच्या बैठकीत व्यक्त केले. तशी शिफारसही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील कृती दलाला केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यांतील लसीकरणाने गती घेतल्याबद्दल बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले. संचारबंदी उठवताना कोविड रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे सरकारने संचारबंदी शिथिल करण्यास हरकत नसावी. परंतु कोविड प्रतिबंधक संहितेचे कठोरपणे पालन व्हावे, गर्दीवर नियंत्रण राहावे यासाठी सरकारी यंत्रणेने केलेली उपाययोजना ढिली होता कामा नये, अशी शिफारसही सरकारला करण्यात येणार आहे.

काणकोणातही धिंगाणा

काणकोणात कुसके, बामणबुडो धबधब्यांच्या ठिकाणी शनिवार, रविवारी युवावर्ग धिंगाणा घालत असल्याचे दिसून येत आहे. या धिंगाण्यावर निर्बंध येणे आवश्‍यक आहे, असे स्थािनकांचे मत आहे.

"उद्योग व्यवसाय सुरू करा, ही जनतेचीच मागणी होती. सरकारने काही निर्बंध मागे घेतले आणि पर्यटकांनी गैरसमज करून घेतला, हे खरे आहे. कडक कारवाई केली, तरी सरकार सतावणूक करते, असा आरोप होतो. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून निर्बंधांची अंमलबजावणी करावीच लागेल."

- माविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री

"हॉटेल्‍स, रेस्टॉरंट व बार पन्नास टक्के क्षमतेने सुरू करा, ही मागणी मीच मुख्यमंत्र्यांकडे केली होती. पर्यटन नियमांचे पालन करत नाहीत, हे खरे आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मी पोलिसांना दूरध्वनी करून तशी सूचना केली आहे."

- मायकल लोबो, ग्रामीण विकासमंत्री.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT