खरी कुजबुज Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: वीरेश बोरकरांवर कार्यकर्ते नाराज!

Khari Kujbuj Political Satire: रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षातील (आरजी) अंतर्गत वाद चव्‍हाट्यावर आल्‍यानंतर मनोज परब यांनी अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वीरेश बोरकरांवर कार्यकर्ते नाराज!

रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षातील (आरजी) अंतर्गत वाद चव्‍हाट्यावर आल्‍यानंतर मनोज परब यांनी अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला. त्‍यानंतर अजूनही पक्षाला नवा अध्‍यक्ष मिळालेला नाही. परब यांनी पक्षाचा त्‍याग करीत असताना आमदार वीरेश बोरकर आणि त्‍यांच्‍या साथीदारांवर ज्‍या पद्धतीने सोशल मीडियावर हल्लाबोल चढवला, ते वाचून काही कार्यकर्त्यांना राग आलेला होता. त्‍यानंतर वीरेश पक्ष स्‍वत:च्‍या ताब्‍यात घेऊन विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाला बळकटी देतील, असेही त्‍यांना वाटत होते; परंतु बोरकर पक्ष बाजूला ठेवून स्‍वत:च्‍या विश्‍‍वात रमल्‍याने या कार्यकर्त्यांत त्‍यांच्‍याबाबत कमालीची निराशा पसरल्‍याची चर्चा पक्षात सुरू आहे. ∙∙∙

काय गोमंतकीय अनाडी?

जीभेला हाड नाही म्हणून काहीही बोलू नये, असे उगीच म्हटलेले नाही. वीजमंत्री सुदिन ढवळीकर स्मार्ट मीटरला ब्रेक लावल्यामुळे जनतेवर व मुख्यमंत्र्यांवर नाराज असणार, हे स्वाभाविक. स्मार्ट मीटर लावल्यावर जनतेला अतिरिक्त वीजबिलाची रक्कम आली होती, ती पुन्हा देण्याचे ढवळीकर यांना व वीज खात्याच्या ‘स्मार्ट बॉस’ला मान्य करावीच लागली. मात्र, याविषयावर बोलताना ढवळीकर यांची जीभ घसरली. गोमंतकीय वीज ग्राहक ‘अनाडी’ असल्याचे विधान त्यांनी केले. ढवळीकर साहेब गोवा शंभर टक्के साक्षर राज्य झाल्याचे आपल्याच सरकारने जाहीर केले आहे. आता मुख्यमंत्री खोटे बोलतात की आपण आपले अज्ञान व्यक्त करतात? असा प्रश्न वीज ग्राहक विचारायला लागले आहेत. ∙∙∙

अबोला की इशारा?

गिरीश चोडणकर यांच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीची पूर्वकल्पना आपल्याला देण्यात आली नसल्याची जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी जणू काँग्रेस हाऊसकडे पाठच फिरवली आहे. गेला महिनाभर राजधानीतील आंदोलने, पक्षप्रवेश, पत्रकार परिषदा अशा एकाही पक्षीय कार्यक्रमात त्यांची उपस्थिती दिसलेली नाही. त्यामुळे खासदारांचा हा केवळ रुसवा आहे, की पक्षश्रेष्ठींना दिलेला मूक इशारा, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राजकारणात नेते बोलले तर बातमी होते; पण बोलणेच बंद केले तर चर्चांना अधिक खतपाणी मिळते. त्यामुळे विरियातो फर्नांडिस यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, याचे उत्तर मिळेपर्यंत काँग्रेस हाऊसच्या कॉरिडॉरमध्ये तर्क-वितर्कांचे राजकारण मात्र असेच सुरू राहणार, हे निश्चित. ∙∙∙

व्‍हिडिओचे ‘यूके’ कनेक्‍शन

प्रतिमा कुतिन्‍हो या काँग्रेसमध्‍ये प्रवेश करणार, ही बातमी सोशल मीडियावरुन सगळीकडे पसरल्‍यानंतर लगेचच आणखी एक व्‍हिडिओ प्रसारित झाला. त्‍यात प्रतिमा कुतिन्‍हो यांनी वालंका आलेमाव यांच्‍याशी समझोता केला असून वालंकाला नावेलीची जागा सोडून आपण स्‍वत: नुवे मतदारसंघातून निवडणूक लढविणार, अशा आशयाचा हा व्‍हिडिओ होता. यासाठी प्रतिमा यांना चर्चिल आलेमाव यांच्‍याकडून घसघशीत धनराशी मिळणार, असेही त्‍यात म्‍हटले होते. यासंदर्भात प्रतिमा यांनी आता खुलासा करताना, आपल्‍यावर जे कोण जळतात त्‍यांनीच हा लोकांची दिशाभूल करणारा व्‍हिडिओ प्रसारित केला आहे, अशी टीका केली. असे म्‍हणतात, हा व्‍हिडिओ कुणीतरी ‘यूके’तून तयार करून गोव्‍यात पाठविला. यापूर्वी आणखी एक असाच व्‍हिडिओ ‘यूके’हूनच तयार झाला होता आणि त्‍यालाही अशीच राजकीय किनार होती. वास्‍तविक या दोन्‍ही व्‍हिडिओंशी एकाच कुटुंबाचा संबंध असल्‍याचेही आता सांगण्‍यात येत आहे. हे कुटुंब कोण, ते सर्वांनाच माहिती आहे. ∙∙∙

नाव चुकवण्‍याचे कारण काय?

चार महिने होण्‍यास अवघे तीन दिवस असताना सरकारने राज्‍य महिला आयोगाची स्‍थापना केली. आयोगाच्‍या अध्‍यक्षपदी माजी अध्‍यक्ष रंजिता पै यांचे नाव अगोदरच निश्‍चित झाले होते; परंतु महिला आणि बाल कल्‍याण खात्‍याच्‍या संचालक ज्‍योती देसाई यांनी जारी केलेल्‍या अधिसूचनेत मात्र ‘रंजिता पै काकोडे’ असा उल्लेख असल्‍याने ‘या’ नेमक्‍या कोण? असा प्रश्‍‍न अनेकांना पडला. आता खात्‍याने नव्‍याने अधिसूचना जारी करण्‍याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सरकारी खात्‍याच्या प्रमुखाने एका महत्त्‍वाच्‍या पदावर नियुक्त करीत असलेल्‍या व्‍यक्तीचे नाव चुकवल्‍याने यामागे नेमके काय कारण असेल? याचाही शोध अनेकजण घेत आहेत. ∙∙∙

खाडीच्या स्वच्छतेचे कवित्व

सांतिनेज खाडीची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता केली तरी पुन्हा त्यात कचरा टाकण्याचे कर्तव्य नागरिक अगदी बिनचूकपणे बजावतात, असे म्हणावे लागेल. खाडीत कचरा टाकणे हेच आपले कर्तव्य आहे, अशा तोऱ्यात गाडीवरून ये-जा करताना किंवा रात्रीच्यावेळी येऊन तो खाडीत फेकण्याचे काम हे पणजीकर नियमितपणे करतात, असेच म्हणावे लागेल. गुरुवारी खाडीची स्वच्छता करावी लागली. खाडीतील गाळ काढणारेही माणूसच आहेत, याचा विचार कोणीच करीत नाही. परंतु खाडीची स्वच्छता व पुनरुज्जीवनाचे काम महापालिका केव्हा करायचे ते करेल आणि पणजीकरांना खाडीतील तळ कधी दिसायचा तो दिसेल. मात्र, खाडीच्या स्वच्छतेवर दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात, ते कर भरणाऱ्या लोकांच्या पैशांतूनच, हे पणजीकर कधी लक्षात घेणार आहेत? ∙∙∙

खबरदार, उशिरा आलात तर!

हे जग विश्वासावर चालते. मात्र, काही लोक विश्वासास पात्र ठरत नाहीत, तेव्हा शासनाला कठोर नियम करावे लागतात. राज्यातील सरकारी व खासगी अनुदानीत शाळांतील शिक्षक व इतर कर्मचारी किती वाजता शाळेत येतात, किती वाजता घरी जातात, शाळेत असताना शाळेच्या आवराबाहेर कितीवेळा जातात यावर नजर ठेवण्यासाठी खास तरतूद केली आहे. ‘समर्थ एक्स’ नावाचे एक हजेरी ॲप तयार केले आहे. या नव्या योजनेनुसार सरकारला प्राथमिक स्तरापासून उच्च माध्यमिक स्तरापर्यंत सगळ्या शिक्षकांची व कर्मचाऱ्यांची हजेरी कार्यालयात बसून कळणार आहे. मात्र, नियमासुसार ही व्यवस्था शिक्षण खात्यातर्फे सुरू करायला हवी होती. ही योजना राबवली आहे, उच्च शिक्षण संचालनालयाने. आता प्राथमिक व माध्यमिक शाळा उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नसताना उच्च शिक्षण संचालनालयाला हा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न काही शिक्षक विचारायला लागले आहेत. शिवाय याबाबत शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेण्यात आलेले नाही. सध्या ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. एक मात्र खरे, सरकारचा तिसरा डोळा ‘लेट लतिफ’ शिक्षकांवर नजर ठेवणार आहे. ∙∙∙

शिरोड्यातील समीकरणे!

गोवा फॉरवर्ड पक्षाने राज्यातील संघटन विस्तार मोहिमेअंतर्गत शिरोडा गट समिती जाहीर केली आहे. काँग्रेसचे माजी कार्यकर्ते व शिरोड्यातील नेते अकबर मुल्ला यांनी नुकताच गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर शिरोड्यात पक्षबांधणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गटाध्यक्षपदी विशांत गावकर यांची निवड करण्यात आली. या नव्या संघटनात्मक बदलामुळे शिरोड्यातील राजकीय समीकरणांमध्ये हालचाल सुरू झाली असून आगामी काळात गोवा फॉरवर्डची ताकद किती वाढते आणि अकबर मुल्ला हे आमदार सुभाष शिरोडकर यांच्यासमोर प्रभावी आव्हान उभे करतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ∙∙∙

उल्‍हास तुयेकर यांच्‍या मनात खुशीचे लाडू...

नावेली मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्‍ला होता. या मतदारसंघात काँग्रेसने कुणालाही उभे केले तरी तो निवडून येणार, असे सांगितले जात होते; पण २०२२ साली काँग्रेस उमेदवाराच्‍या विरोधात काँग्रेसमधीलच आणखी दोन बंडखोर उभे राहिले आणि मतविभागणीचा फायदा घेत पहिल्‍यादाच उल्‍हास तुयेकर यांच्‍या रूपाने भाजपने नावेलीत आपले खाते उघडले. आता २०२७ सालीही नावेलीत पुन्‍हा एकदा काँग्रेसमध्‍ये बंडखोरी होणार, अशी शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. प्रतिमा कुतिन्‍हो यांच्‍यासह वालंका आलेमाव आणि सिप्रू कार्दोज अशा तिघांनी काँग्रेसच्‍या उमेदवारीवर दावा केला आहे. त्‍यामुळे या मतदारसंघात पुन्‍हा एकदा बंडखोरी होणार हे निश्‍चित. या पार्श्वभूमीवर उल्‍हास तुयेकर यांच्‍या मनात खुशीचे लाडू फुटले तर यात काय नवल? ∙∙∙

मॅडम, हे वागणे बरे नव्हे!

मॅडम केवळ चार पुस्तके शिकून महाविद्यालयाच्या प्राचार्य बनल्या म्हणून कोणी महान होत नाहीत, असे आता केपे तालुक्यातील गोवा मानव संसाधन संस्थेच्या अंतर्गत काम करणारे सुरक्षा रक्षक व सफाई कर्मचारी म्हणायला लागले आहेत. याला कारण एका सरकारी शिक्षण संस्थेच्या प्राचार्य मॅडम. या मॅडम सफाई कर्मचाऱ्यांना माळ्याचे काम करायला लावतात. मोठ-मोठे बाक डोक्यावर उचलायला लावतात. एवढेच नव्हे तर महाविद्यालयाच्या आवारात जर कुत्र्यांनी घाण केली तर ती तुम्ही आता गिळा, अशा प्रकाराच्या शब्दांनी उद्धार करतात. जर तक्रार केली तर मॅडम या कर्मचाऱ्यांवरच ओरडतात. मॅडम आम्ही जरी कमी शिकलो असलो तरी माणसे आहोत? असा त्या सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षकांचा प्रश्न आहे. मॅडम, माणसाने माणसाशी माणसां सम वागणे, हे मनात रुजवा जरा! ∙∙∙

पुरस्कार निवड काटेकोर असावी!

ज्येष्ठ नागरिक सन्मान योजनेसाठी समाजकल्याण खात्याने अर्ज मागवले आहेत. ७० वर्षांवरील नागरिकांसाठी. १४ जणांना प्रत्येकी फक्त ५ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल. ७० प्लस नागरिकांनी आपण काय समाजकार्य केले त्याची सविस्तर माहिती अर्जासोबत जोडावी लागेल. पुरस्कार देऊन सोपस्कार उरकून काढायचा हा बेत. मला द्या, मला द्या म्हणून हे वयस्क लोक का म्हणून पुरस्कार मागणार? असे अनेक समाजकार्यकर्ते आहेत, जे सेवेसाठी महान आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाचे, आदर, सन्मानाचे जर समाजकल्याण खात्याला खरोखर पडून गेले असेल तर त्यांनी कष्टपूर्वक पुरस्कारार्थींची माहिती गोळा करावी. त्यातून निवड करावी. अर्ज असावेच; पण ते शिफारस अर्ज व स्वयंअर्ज; पण ऑनलाईन. समाजकल्याणच होईल. ∙∙∙

ॲड. क्लिओफात, सत्येंद्र दिल्‍लीत!

सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाची देशभर चर्चा सुरू असताना दिल्लीतील ‘जंतर-मंतर’वर आंदोलनाला गोव्यातून कितीजणांनी हजेरी लावली, याची स्पष्ट माहिती नाही. मात्र, राजकीय विश्लेषक ॲड. क्लिओफात कुतिन्हो आणि सत्येंद्र सोनार यांनी आंदोलनस्थळी जाऊन वांगचुक यांची भेट घेतली, आंदोलकांशी संवाद साधला आणि पाठिंबा जाहीर केला. लोकशाही हक्क, जनआंदोलनांवर सातत्याने भाष्य करणारे अनेक चेहरे गोव्यात आहेत. सोशल मीडियावर पोस्ट, प्रतिक्रिया आणि भूमिका मांडण्यात ते आघाडीवर असतात. मात्र, ‘जंतर-मंतर’वर प्रत्यक्ष उपस्थितीचे चित्र काहीसे वेगळेच दिसले. त्यामुळे ‘आंदोलनाला पाठिंबा सर्वांचा; पण प्रवासाचे तिकीट मात्र दोघांनीच काढले’, असेच म्‍हणावे लागेल. ∙∙∙

कुंचल्याचा टोला!

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी गैरव्यवहाराची चर्चा अजून थांबलेली नाही. चौकशी, आरोप-प्रत्यारोप व स्पष्टीकरणांच्या गदारोळात प्रसिद्ध चित्रकार सुबोध केरकर यांनी रेखाटलेले एक व्यंगचित्र सध्या समाजमाध्यमांवर चांगलेच गाजत आहे. चित्रात स्वतः प्रभू रामच चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचतात; मात्र त्यांनाच ‘वरिष्ठांची परवानगी’ लागेल, असे उत्तर मिळते. या एका चित्रातून व्यवस्थेवरील अविश्वास, चौकशीतील विलंब आणि सत्तेच्या सावलीत उभे राहणारे प्रश्‍‍न अधोरेखित झाले आहेत. व्यंगचित्रात कुणाचे नाव नाही, आरोप नाहीत; पण प्रश्‍‍न थेट आहे. त्याचे उत्तर मात्र ज्‍याचे त्‍यानेच शोधावे. ∙∙∙

प्रतिमांच्या अंगात रक्त नाही...

प्रतिमा कुतिन्हो यांनी गुरुवारी काँग्रेस भवनात पुन्हा पक्षप्रेवश केला. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रतिमा यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पत्रकारांनाच उलट प्रश्न करत त्यांनी पत्रकारांना शिंगावर घेण्याचा प्रयत्न केला; पण तत्काळ आपली चूक मानून हात जोडत त्यांनी पत्रकारांची माफीही मागितली. पेशाने वकील, त्याशिवाय बोलण्यातही पटाईत; पण त्यांना चार पानांचे भाषण का लिहून आणावे लागले, ते कळले नाही. ‘आप’मध्ये प्रवेश केला ती आपली चूक होती, हेही प्रतिमाबाईंनी मान्य केले. त्यांनी आपल्या भाषणात शेवटी जाता-जाता भाजपला इशारा दिला, ‘माझा हात कापला तर त्यातून रक्त निघणार नाही, तर ॲसिडच निघेल, हे लक्षात घ्यावे.’ त्यामुळे आता काँग्रेसची आंदोलने किती जोमाने होतात, हे येत्या काळात दिसेलच. ∙∙∙

राजेश वेरेकरांची ‘तत्परता’

सध्या फोंड्यात डेंग्यूचे रुग्ण वाढायला लागले आहेत. त्यामुळे फोंड्याच्या उपजिल्हा इस्पितळात ‘रात्र थोडी आणि सोंगे फार’चा प्रकार दिसायला लागला आहे. काँग्रेसचे कुशावती जिल्हा प्रमुख राजेश वेरेकर यांनी नुकतीच आपल्या कार्यकर्त्यांसमवेत या इस्पितळाला भेट देऊन या गोष्टीवर प्रकाश टाकला. दीड-दीड तास रुग्णांना रांगेत उभे राहायला लावणारे हे कसले प्रशासन, असा सवालही त्यांनी यावेळी केला. यामुळे दिवंगत डॉ. केतन भाटीकर यांच्यानंतर या इस्पितळातील त्रुटींबाबत आवाज उठवणारा कोणीतरी आहे, असा दिलासा फोंडेकरांना मिळायला लागला आहे. आणि राजेश यांच्या या तत्परतेचे कौतुकही होताना दिसत आहे. आता या कौतुकाला राजकीय किनार मिळते की आणि काय? हे मात्र बघावे लागेल. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT