Narkasur In Goa: दीपावलीच्या पूर्वसंध्येला राज्यात मोठ्या प्रमाणात नरकासुर प्रतिमा उभ्या करून त्या पहाटे जाळल्या जातात. मात्र, त्या रात्री ‘डिजे’वर कर्णकर्कश संगीत वाजवले जाते. नियमानुसार मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 60 डेसिबल्स मर्यादेपर्यंत संगीत वाजवण्यास परवानगी आहे.
परंतु या नियमाचे पालन केले जात नसल्याने या काळात पोलिस गस्त ठेवण्यात येणार आहे. ठरावीक वेळेनंतर संगीत वाजल्यास किंवा आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास संगीत उपकरणेच जप्त करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
फटाक्यांच्या आतषबाजीवरही निर्बंध घातले आहेत. त्याचे पालनही गोव्यात केले जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. काही उत्सवांसाठी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संगीत वाजवण्यास मुभा दिली आहे. त्याची अधिसूचनाही काढली आहे. त्यामध्ये नरकासुर दहन कार्यक्रमाचाही समावेश आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नरकासुर प्रतिमा दहनाच्या आदल्या रात्री त्या परिसरातील रहिवाशांना कर्णकर्कश संगीताचा त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात पोलिस नियंत्रण कक्षाला तक्रार येताच पोलिस त्या ठिकाणी जाऊन प्रथम आयोजकांना ताकीद दिली जाते. त्यानंतरही पुन्हा गैरप्रकार घडल्यास ठोस कारवाई केली जाणार आहे.
दीपावलीच्या पूर्वसंध्येला ध्वनी प्रदूषणाबाबत लोकांना पोलिसांच्या कारवाईचा वाईट अनुभव आहे. पोलिस नियंत्रण कक्षाला तक्रार दिल्यावर पोलिस घटनास्थळी येण्यास उशीर होतो. या तक्रारीची माहिती अगोदरच नरकासुर प्रतिमा करणाऱ्या आयोजकांना मिळते.
पोलिस येतात तेव्हा संगीत कमी आवाजात असल्याने ते केवळ ताकीद देऊन निघून जातात. पण पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा ध्वनी प्रदूषण केले जाते. रात्र निघून गेल्यावर दिलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. त्यामुळे लोकही तक्रार करण्यास कंटाळले आहेत, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
पोलिसांकडे यंत्रणाच नाही : आवाज डेसिबल मीटरने मोजला जातो. काही पोलिस स्थानकांकडे ही यंत्रेच नाहीत. किनारपट्टी भागातील पोलिस स्थानकांकडे प्रत्येकी एक डेसिबल मीटर असल्याने कारवाईवर मर्यादा येत आहेत.
राजधानी पणजीत नरकासुर प्रतिमांजवळ मोठ्या आवाजात डिजे सुरू असतो. त्याच्या कर्कश आवाजामुळे वृद्ध, आजारी लोक तसेच लहान मुलांना त्याचा त्रास होतो. हृदयविकाराच्या रुग्णांना त्याचा मोठाच धोका असतो. त्यामुळे संगीताचा आवाज 60 डेसिबल्सपेक्षा अधिक आढळून आल्यास संगीत वाद्ये, उपकरणे जप्त करण्यात येतील.- सुदेश नाईक, पोलिस उपअधीक्षक.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.