Pernem News पेडणे तालुक्यातील धारगळ येथे उभारल्या जाणाऱ्या नियोजित डेल्टिन सिटी प्रकल्पाला सरकारच्या राज्य तज्ज्ञ मूल्यमापन समितीने (गोवा - एसईएसी) काही सामान्य आणि विशिष्ट परिस्थितीनुसार पर्यावरण मंजुरी देण्याची शिफारस केली आहे.
राज्य तज्ज्ञ मूल्यमापन समितीच्या 180 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा प्रस्ताव आता गोवा राज्य पर्यावरण प्रभाव प्राधिकरण, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची स्थायी समिती इत्यादींकडून मंजुरी आणि परवानग्यांसाठी जाईल.
गोवा सरकारने यापूर्वीच ३ हजार कोटी रुपयांच्या बांधकामाला मंजुरी दिली होती. मोपा विमानतळाजवळ सुमारे ९० एकर जागेत पसरलेल्या या प्रकल्पात ३ भव्य आलिशान तारांकित हॉटेल्स, एक कन्व्हेन्शन सेंटर, एक मल्टिप्लेक्स, एक शॉपिंग एरिया, वॉटर पार्क, बँक्वेट सुविधा आणि मुलांसाठी खेळण्याचा परिसर असलेली धारगळ एकात्मिक रिसॉर्ट-कम-कॅसिनो टाऊनशिप उभारण्यात येणार आहे.
मोपा येथे उभारलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या या महाकाय प्रकल्पात स्थानिकांसह पर्यटकांकरिता विशेष साधन सुविधा उभारल्या जात आहेत.
या प्रकल्पासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे. त्यामुळे पर्यावरण परवाने देण्याबाबत सुरवातीपासून शंका निर्माण केल्या जात होत्या. हे परवाने देताना आता अनेक अटी घालण्यात आल्याची माहिती आहे.
शिर्डी स्टीललाही मंजुरी
या बैठकीत कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील शिर्डी स्टील अँड रोलर्स प्रायव्हेट लिमिटेडला उत्पादन क्षमता १ लाख टीपीएवरून १५ लाख टीपीएपर्यंत वाढविण्यासंदर्भात अटीसह ( टीओआर) देखील निर्दिष्ट केल्या आहेत. प्रकल्प प्रवर्तकाला प्रदूषणाच्या पैलूवर स्थानिक समुदायाकडून मंजुरी मिळणे आवश्यक आहे, असेही गोवा - एसईएसीने म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.