पावसाळ्यात पणजीतील नूतनीकरण केलेल्या कला अकादमी सभागृहात पाणी गळते, हे यापूर्वी दिसून आले होते. काल मान्सूनपूर्व पावसात काणकाेणच्या रवींद्र भवनातही जलधारा बरसू लागल्या. त्यामुळे समाज माध्यमांवर तो चर्चेचा विषय बनला होता. गोव्यात आणखी एक ताजमहाल बांधला गेला आहे का? असा सवाल नेटकरी करत होते. आता येत्या महिन्यात मडगावच्या रवींद्र भवनचीही दुरुस्ती हाती घेतली जाणार आहे. मडगावच्या रवींद्र भवनचीही स्थिती अशीच होणार नाही ना, या शंकेनेही कित्येकांना आता ग्रासले आहे. गोव्यातील या प्रतिष्ठेच्या सभागृहाची आणि प्रकल्पांची झालेली ही अवनती पाहता गोव्यात आणखी किती ताजमहाल उभे रहातील बरे? असे आता लोक विचारू लागलेत. ∙∙∙
स्मार्ट सिटी प्रकल्पात बस घेण्यात आल्या, पण पावसात त्या बस गळू लागल्या तर आता प्रश्न असा पडतो की, गळतीची जबाबदारी कोण घेणार? स्मार्ट सिटी म्हणते आम्ही बसेस घेतल्या आणि चालवायला कदंब महामंडळाला दिल्या. कदंब महामंडळ तर प्रवाशांचा विचारच करत नाही, असे लोक म्हणतात. मग या गळक्या बसेस दुरुस्त करणार कोण? असा प्रश्न प्रवाशांसमोर आहे. प्रवासी मात्र बसच्या गळत्या छताखाली बसून हे ‘स्मार्ट’ कुठे आहे? याचाच विचार करतात. थोडक्यात, ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘कदंब’ यांच्यात जबाबदारीची ''पिंग पॉंग'' मॅच सुरू आहे, आणि प्रवासी मात्र गळतीमुळे भिजताहेत! ∙∙∙
सध्या फोंड्यात कुठल्याही गोष्टीवर जर कोण तत्परतेने आवाज उठवत असतील तर ते फोंड्यातील युवा राजकारणी डॉ. केतन भाटीकर हे. काल भाटीकर यांनी भर पाऊस पडत असताना फोंड्यात खडपाबांध या भागात डांबरीकरण चालू असल्याचा व्हिडिओ व्हायरल करून सध्या गोव्यात जनतेच्या पैशांची कशी विल्हेवाट लावली जाते याचे दर्शन घडविले. भाटीकर म्हणतात, १५ मे नंतर डांबरीकरणाची सर्व कामे बंद केली जातील, असे यापूर्वी जाहीर केलेले असतानाही २० मे रोजी हे डांबरीकरण हाती घेतलेच कसे? ज्या भागात हे डांबरीकरणाचे काम चालू होते, त्या ठिकाणापासून मंत्री रवी नाईक यांचे घर अवघ्या काही मीटरवर आहे. मंत्री राहतात तेथेच जर असे प्रकार तर दुसरीकडे काय चालले असेल बरे? जनतेचा पैसा असा पाण्यात का घालवता, असा सवाल करणारा भाटीकर यांचा व्हिडिओ सध्या सगळीकडे फिरत आहे. ∙∙∙
मान्सूनपूर्व सरींनी झोडपलं अन् मतदारसंघातील रस्ते जलमय झाले. स्थानिकांनी लगेच आमदारांच्या ‘पीएं’ना फोन करून समस्यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. पाणी साचलंय, रस्ते खड्डेमय झालेत, काहीतरी करा, अशी साधीशी अपेक्षा. पण त्यांना उत्तर काय मिळालं? ‘आम्ही पाहतो’, ‘आमदार बिझी आहेत’,‘तो विषय आमच्या हातात नाही’... आणि काही पीए तर थेट आमदारच असल्यासारखे सल्ले देऊ लागलेत! स्थानिक म्हणतात, आमदार कुठे आहेत माहीत नाही, पण त्यांचे पीए मात्र ‘आमदारपद’ अनुभवताहेत! आमदार कार्यालयात बसलेल्यांना आता खुर्चीवर बसण्याचा एवढा सराव झाला आहे, की मतदारांची तक्रार त्यांना ‘डिस्टर्बन्स’ वाटतेय, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. ∙∙∙
ताळगावात शेतजमिनीत भराव टाकण्याचे प्रकार हे काही नवे नाहीत. यापूर्वी असे प्रकार घडले आहेत. मंत्र्यांकडून पदाचा बेकायदेशीरपणे अधिकार वापरून हे प्रकार बिनदिक्कतपणे सुरू होते व जो कोणी आवाज उठविल त्यालाच आमिष दाखवून तोंड बंद करण्यात येत असल्याच्या चर्चा यापूर्वी ऐकू येत होत्या. सांपॉल चर्चच्या मागे असलेल्या शेतीत भराव टाकून बिनदिक्कतपणे काम सुरू होते. ताळगावातील दक्ष नागरिकांनी आवाज उठविला तरी सरकारी अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. उच्च न्यायालयाने निवाड्यात दिलेल्या आदेशाचा हा अवमान असल्याने सरकारी अधिकाऱ्यांचे तळ्यात मळ्यात होऊ लागले आहे. या अधिकाऱ्यांनी ‘देर आये दुरुस्त आये’ याप्रमाणे अखेर धाडस करून कारवाई केली व हे काम बंद पाडून मातीचा भराव काढण्याचा फतवा काढला. ∙∙∙
पणजी मनपाच्या मार्केटमध्ये विक्रेत्यांनी ग्राहकांच्या ये-जा करण्याच्या वाटेवर आपले साहित्य ठेवण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. अनेक विक्रेते दुकानातील साहित्य दुकानाबाहेर ठेवून ये-जा करण्याची वाट अडवतात. महत्त्वाची बाब म्हणजे अशा गोष्टी घडू नयेत, ये-जा करण्याच्या वाटेवर विक्रेत्यांनी साहित्य ठेवू नये, विक्रेत्यांवर वचक रहावा, त्यांना शिस्त लागावी म्हणून मनपाने येथे सुपरवायझर ठेवला आहे. या सुपरवायझरच्या हाताखाली पाच ते सहा कर्मचारी आहेत. पण हे सर्व काय करतात, तेच कळत नाही. मार्केटमध्ये गेल्यानंतर ओंगळ रूप दिसते. ये-जा करताना दोन लोक नीट जाऊ शकत नाहीत, एवढी जागा विक्रेत्यांनी व्यापलेली असते. जिथे सोपो आहेत, तेथेही अर्धा फूट बाहेर विक्रेत्यांचे साहित्य आलेले आहे. महापालिकेने नेमलेले कर्मचारी नक्की कशासाठी आहेत, हेच समजत नाही. काहीवेळा एखादी कारवाई होते आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या‘ हा प्रकार सुरू असतो. त्यामुळे मार्केट चेअरमन बेंटो लॉरेन यांनी यात लक्ष घातल्यास बरे होईल. ∙∙∙
राज्यात मंगळवारी मान्सूनपूर्व पावसाने कहर केला. पणजीसह म्हापशातही पावसाने दाणादाण उडवली, बाजारपेठेतील दुकानेही जलमय झाली, अनेकांच्या घरांतही पाणी घुसले. याशिवाय खोर्लीत एकाची दुचाकीही वाहून जातानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला. या व्हिडिओत अनेकांची तारांबळ उडाल्याचे दिसले. म्हापसा बाजारातील स्थिती अन् रस्त्याला आलेलं नदीचं स्वरूप पाहून अनेक नेटकऱ्यांनी ‘ आमदार तथा उपसभापती डिसोझांनी म्हापशाचा विकास केला आहे, आम्हाला आता बाजारात फिरायला नौका त्यांनीच पुरवावी’, अशी मागणी केली आहे. ∙∙∙
शहाजहानने आपल्या लाडक्या मुमताजसाठी एकच ताजमहाल बांधला. जो आजही मजबूत उभा आहे. मात्र, आपल्या कला व संस्कृती खात्याने पणजीच्या कला अकादमीला कोट्यवधी रुपये खर्चून ‘ताजमहाल’ करण्याचा विडा उचलला अन् झाले भलतेच. कला अकादमी बनली पुरानी हवेली. त्यात भर पडली ती काणकोणच्या नव्या करकरीत रवींद्र भवनाची. रवींद्र भवनचे उद्घाटन होऊन काही महिनेच झालेत, मान्सूनपूर्व पावसातच रवींद्र भवनचा स्विमिंग पूल झाला. आपले मुख्यमंत्री म्हणतात, या अशा बेभरवशाच्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार. संबंधित अधिकाऱ्यांना व मंत्र्यालाही काळ्या यादीत टाकायला नको का? आणि सरकारला टोपी घालणाऱ्या त्या कंत्राटदारांना फक्त काळी यादीच. हे कोट्यवधी रुपये वसूल कुणाकडून करायचे? सांगा ना! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.