Goa Latest Political News Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींना खरी श्रद्धांजली

Goa Latest Political News: सेलेब्रिटी मच्‍छीमार पेले फर्नांडिस हे परत एकदा चर्चेत आले आहेत, हे त्‍यांच्‍या कार्निव्‍हल फ्‍लोट परेडमध्‍ये सादर केलेल्‍या त्‍यांच्‍या पारंपरिक फ्‍लोटमुळे.

गोमन्तक डिजिटल टीम

रवींना खरी श्रद्धांजली!

फोंड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकार परिषद बोलावली. सर्वांना वाटले, दामू फोंडा पोटनिवडणुकीतील उमेदवार जाहीर करणार. पण कुठे काय? दामूंनी पत्रकार परिषदेत फोंड्याचे दिवंगत आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि फोंड्यात पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलले तर तीच रवींना खरी श्रद्धांजली असेल, असे ते म्हणाले. आता रवींचे कार्य सर्वांना माहीत आहे. राज्यातील एक बडा राजकारणी म्हणून रवींचे नाव आहे आणि केवळ फोंडाच नव्हे, तर राज्यभरातील लोकांना हे ठाऊक आहे, त्याचीच ‘री’ ओढण्याची का बरे पाळी आली भाजपवर? कदाचित उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच्या नाटकाची ही तयारी अर्थातच नांदी आहे, अशाच प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या. ∙∙∙

पेलेचा कौटुंबिक कार्निव्‍हल!

सेलेब्रिटी मच्‍छीमार पेले फर्नांडिस हे परत एकदा चर्चेत आले आहेत, हे त्‍यांच्‍या कार्निव्‍हल फ्‍लोट परेडमध्‍ये सादर केलेल्‍या त्‍यांच्‍या पारंपरिक फ्‍लोटमुळे. गोव्‍यातील मच्‍छीमारांचे जीवन दाखविणारा हा चित्ररथ बराच लोकप्रिय झाला असून पेले यांनी आपल्‍या सोशल मिडियावरुनही तो सगळीकडे शेअर केला आहे. या फ्‍लोटमध्‍ये पेलेबरोबर त्‍यांच्‍या मुलींनीही भाग घेतला आहे. आणि त्‍यामुळे हा चित्ररथ खराखुरा कौटुंबिक फ्‍लोट बनला आहे. सध्‍या या फ्‍लोटची चर्चा सगळीकडे चालू आहे. ∙∙∙

...म्हणून संकल्प लोकांसोबत!

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर कोळसा विषयावरून बरेच आक्रमक झाले आहेत. आमोणकर काँग्रेसमध्ये असताना कोळशाचा विषय हिरिरीने हाताळत होते. रस्त्यावर उतरत होते. त्यानंतर ते सत्ताधारी तंबूत आले. त्यामुळे त्यांच्या विरोधाची धार बोथट होईल, असे सर्वांना वाटत होते. विशेषतः ते असे काही करतील, अशी सरकारला सुतराम कल्पना नव्हती. सत्ताधारी आमदार असूनही कोळशाच्या विरोधातील एल्गार त्यांनी सोडलेला नाही. लोकांसोबत ते रस्त्यावर उतरत आहेत. त्यांना मुरगावातील राजकारणाची नस समजलेली आहे. लोकांसोबत न राहिल्यास त्याची किंमत विधानसभा निवडणुकीत चुकवावी लागेल, याची खुणगाठ त्यांच्या मनाने मारली आहे. आक्रमणामागे अशी राजकीय अपरिहार्यता असल्याचे वास्कोत बोलले जात आहे. ∙∙∙

माणिकराव-उत्पल भेट

येत्या ११ मार्चला होणाऱ्या पणजी मनपा निवडणुकीत स्वत:चे पॅनल उभे करून भाजपचा पराभव करण्याचा ठाम निर्णय माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकरांनी घेतला असून, तशी रणनीती आखण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे. मनपात भाजपला हरवण्यासाठी प्रसंगी काँग्रेसची साथ घेण्यासही उत्पल तयार असल्याच्या चर्चा झडत असतानाच, यासंदर्भात उत्पलनी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची गुप्त भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्य‍ामुळे भाजपपासून दुरावलेले उत्पल काँग्रेसच्या ‘हाता’त हा घालून ही निवडणूक लढवणार का? याकडे पणजीवासीयांचे लक्ष आहे. ∙∙∙

फोंड्यात रितेश की विश्‍वनाथ?

फोंड्यात सध्या रितेश की विश्‍वनाथ अशी जोरदार चर्चा सुरू आहे. फोंड्याच्या पोटनिवडणुकीत रवींच्या जागी रितेश नाईक की विश्‍वनाथ दळवी याबाबत चर्चा होत असून भाजप नेते कुणाला पसंती देतात, ते पहावे लागेल. सध्या तरी रितेश आणि विश्‍वनाथ यांच्यातच चढाओढ आहे. येनकेनप्रकारणे तिकीट मिळावे म्हणून हा आटापीटा आहे. सध्या तरी रितेशना पहिली पसंती आहे, असे विचारत दामूंना यासंबंधी एकाने छेडले असता ते पक्ष ठरवेल, असे ‘टिपिकल'' उत्तर त्यांनी दिले. ∙∙∙

कॅसिनोचा खेळ; कोणाचा ‘जॅकपॉट’?

पणजीत पुन्हा एकदा ‘कॅसिनो हटवा’चा बिगुल वाजला आहे म्हणे! पणजीकरांनी आता थेट मैदानात उतरण्याचा निर्धार केलाय. “आता पुरे!” असं म्हणत काही जणांनी आवाज चढवला, तर काही जणांनी पोस्टरही छापले. पण गंमत अशी की, ही मोहीम काही पहिल्यांदाच सुरू झालेली नाही. याआधीही अनेकांनी “कॅसिनो हटवू”चा नारा दिला होता. काहींनी तर निवडणूक सभेत हात वर करून “आम्ही हटवणारच!” अशी ग्वाहीही दिली. पण सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर तीच खुर्ची एवढी आरामदायी वाटली की कॅसिनोचा विषय जणू एसीत ठेवलेल्या फाईलसारखा थंड पडला! लोकांचे मात्र वेगळेच गणित आहे. “महसूल सरकारला, पण परिणाम आम्हाला!” असा त्यांचा सवाल. काही जण म्हणतात, “कॅसिनो हटवणे सोपे असते तर आतापर्यंत हटले नसते का?” तर काहींना खात्री आहे की, निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आश्वासनांचा पाऊस पडणार. ∙∙∙

खरेच सरकारकडून दिशाभूल?

मोपा विमानतळ कार्यान्वित झाल्यापासून दाबोळी विमानतळ बंद करण्याचा डाव केंद्राने आखल्याचा दावा करीत विरोधी सातही आमदार सातत्याने विधानसभा सभागृह आणि सभागृहाबाहेरही ‘डबल इंजिन’ सरकारवर तुटून पडत आहेत. काहीच दिवसांपूर्वी काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी हा विषय संसदेत ताणल्यानंतर विरोधक पुन्हा जागे झाले आहेत. त्यातच आता गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी ‘दाबोळी विमानतळ सुरूच ठेवा’ अशी मागणी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे करणारे मंत्री माविन गुदिन्हो यांचे याच महिन्‍यातील पत्र जाहीर केल्याने राज्य सरकार आपल्याशी खोटे बोलतेय? की दिशाभूल करतेय? असा प्रश्न दक्षिण गोव्यातील जनतेला पडला आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT