Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज: रवी नाईक ‘आरामात’?

Khari Kujbuj Political Satire: जमीन हडप प्रकरणात क्राईम ब्रँचच्या ‘लॉकअप’मधून आयआरबी पोलिस कॉन्स्टेबलने मुख्य मास्टरमाईंड सुलेमानला पलायन करण्यास मदत केली. त्यामुळे पोलिसांची नाचक्की होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

रवी नाईक ‘आरामात’?

मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या बातम्या सध्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे काही विद्यमान मंत्री दबावाखाली वावरताना दिसत आहेत. मात्र, कृषिमंत्री रवी नाईक हे एकदम बिनधास्त असल्यासारखे वावरताहेत. नाहीतरी ‘राहू मस्त बिनधास्त’ असेच त्यांचे नेहमीच वागणे असते. पुढील परिस्थिती हेरून त्याला कसे तोंड द्यायचे याची तयारी आधीच करून ठेवायची ही त्यांची खासियत. म्हणूनच तर अनेक अडचणींवर मात करून ते राजकारणात टिकून आहेत याचा आता परत एकदा प्रत्यय यायला लागला आहे. आता त्यांनी काय हेरले आहे आणि काय तयारी करून ठेवली आहे हे सांगणे कठीण असले तरी ‘जो होगा सो देखा जायेगा’ ही वृत्ती बाळगणारे रवी एकदम आरामात असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत एवढे मात्र निश्चित. ∙∙∙

रोख नेमका कोणावर?

कळंगुटचे आमदार मायकल लोबो राज्यभरातील विषयांवर आपली मते व्यक्त करत असतात. गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीतून पळालेल्या सुलेमान महमद खान ऊर्फ सिद्दीकी याला पळून जाण्यासाठी तीन कोटी रुपयांचा सौदा झाला आहे आणि तो करण्यात कोणाचा सहभाग होता याचा तपास करावा असे लोबो यांनी म्हटले आहे. कोणाचा सहभाग या प्रकरणात असावा याचा संशय लोबो यांना का आला. त्यांनी याची चौकशी व्हावी असे का म्हटले आहे. यामागे लोबो यांचा काय विचार आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे. लोबो यांनी कोणाकडे अंगुलिनिर्देश केला असावा याचा अंदाज बांधला जात असावा. असे प्रकार सत्ताधारी गोटातून आशीर्वाद असल्याशिवाय होऊ शकत नाहीत. त्यामुळे लोबो यांना काय सुचवायचे आहे याचीही वेगळी चर्चा ऐकू येऊ लागली आहे. ∙∙∙

पोलिसांची काढली खरडपट्टी

जमीन हडप प्रकरणात क्राईम ब्रँचच्या ‘लॉकअप’मधून आयआरबी पोलिस कॉन्स्टेबलने मुख्य मास्टरमाईंड सुलेमानला पलायन करण्यास मदत केली. त्यामुळे पोलिसांची नाचक्की होत आहे. यातील पोलिस स्थानकातील आवारातील रॉ फुटेज सर्वत्र व्हायरल झाल्याने एकंदर पोलिसांच्या कामाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने क्राईम ब्रँचचे वरिष्ठ अधिकारी बरेच खवळले. त्यांनी स्थानकातील सर्व कर्मचाऱ्यांना धारेवर धरत, सगळ्यांची खरडपट्टी काढल्याचे समजते. कारण झालेल्या प्रकारामुळे आधीच क्राईम ब्रँचची बदनामी झाली होती, त्यात हे फुटेज व्हायरल झाल्याने या मानहानीत आणखीन भर पडली होती. त्यामुळेच अधिकारी कर्मचाऱ्यांवर गरजले अशी चर्चा पोलिसांत सुरू होती. ∙∙∙

जेलमधून दिली सुपारी?

बोर्डा येथील एका व्‍यक्‍तीच्‍या घरात शिरून त्‍याच्‍या मोटरसायकलच्‍या टाकीला आग लावण्‍याचा प्रयत्‍न करण्‍याच्‍या आरोपाखाली फाताेर्डा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तब्‍बल एका महिन्‍यानंतर ही अटक झाली आहे. या प्रकरणात आता नवीन माहिती पुढे येत आहे ती अशी की, एका अमलीपदार्थ प्रकरणात अटक होऊन सध्‍या कोलवाळ तुरूंगाची हवा खाणाऱ्या एका आरोपीनेच आपला पूर्वीचा राग काढण्‍यासाठी बाेर्डातील त्‍या व्‍यक्‍तीच्‍या घरी जाऊन असा घातपात करण्‍याची सुपारी त्‍या संशयिताला दिली होती. या संबंधीचा एक ऑडिओ सध्‍या व्‍हायरल झाला आहे. त्‍यात या संशयिताला तुरूंगातील तो आराेपी सूचना देत असल्‍याचे ऐकू येते. आता तुरूंगातूनही गेम होण्‍याचे प्रकार उघड होऊ लागले आहेते. असे प्रकार बंद हाेण्‍यासाठी गृहखाते काय उपाय करील का? ∙∙∙

पार्सेकरांच्या गुजगोष्टी

स्व. मनोहर पर्रीकर यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी मिरामार गाठले. अलीकडे सत्ताधाऱ्यांवर आपल्या खास शैलीत शाब्दिक प्रहार करण्यास पार्सेकर सर मागे राहत नाहीत. मिरामार येथे येऊन आदरांजली वाहून ते परत गेले असे झाले नाही. तेथे उपस्थित उत्पल पर्रीकर यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्याची छायाचित्रे आता समाज माध्यमांवर फिरू लागली आहेत. पार्सेकर व उत्पल तसे समदुःखी. दोघांनाही भाजपने उमेदवारी नाकारल्याने दोघांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. दिल्लीत भाजप दरबारी या दोन्ही नेत्यांचे आजही वजन आहे. त्यामुळे भाजपच्या संघटनात्मक निवडणुका सध्या सुरू असताना या दोन्ही माजी भाजप नेत्यांचे एकमेकांशी बोलणेही अनेकांचे लक्ष वेधणारे ठरले आहे. ∙∙∙

पैशांसाठी की आदेशावरून?

जमीन हडप घोटाळ्यातील मास्टरमाईंड सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याला चक्क क्राईम ब्रॅंचच्या कोठडीतून पळवून नेण्याचे शिवधनुष्य आयआरबी पोलिस कॉन्स्टेबलने उचलले. मात्र, पोलिस कर्मचारी असून देखील त्याने हे कृत्य केल्याने पोलिसांच्या होत्या नव्हत्या त्या अब्रूचे अमित नाईक याने धिंडवडे काढले. मुळात अमितने परिणामांचा विचार केला नव्हता का? हा कळीचा मुद्दा. पैशांसाठी आपले इमान अमितने विकले अन् आपल्यासोबत समस्त पोलिस दलाची नाचक्की केली. आता पैशांसाठी अमितने हे कृत्य केले की त्याचा बोलवता धनी कोण आहे? हा प्रश्न आता गोमंतकीय जनतेला पडला आहे. पोलिसांना सुलेमानला पकडण्यासाठी रक्त आटवावे लागले होते. मात्र, अमितने या मेहनतीचे वाटोळे करून टाकले. पलायनाची अंमलबजावणी केल्यानंतर अमितने कर्नाटकमध्ये स्वतःला पोलिसांसमोर आत्मसमर्पण कले. त्यामुळे पाणी कुठे तरी नक्कीच मुरते हेच यातून अधोरेखित होते. आता तपास यंत्रणा या प्रकरणाच्या किती खोलाशी जाते हे वेळप्रसंगी समजेल. अन्यथा हे प्रकरण देखील ‘नोकरी घोटाळ्या’सारखे किंवा जमीन हडपच्या निष्कर्षाविना राहू नये. अन्यथा लोकांचा पोलिसांवरील विश्वास उडून जाईल. ∙∙∙

मंत्रिमंडळ फेररचनेला मुहूर्त मिळेना

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीमुळे गोव्यातील मंत्रिमंडळ फेररचना सतत लांबणीवर पडत असून दिवसागणिक विविध वार्ता प्रसृत होत असून त्यामुळे अनेक इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. तरी नशीब इच्छुकांनी नवे पेहराव शिवून तयार ठेवल्याचे अजून तरी वृत्त नाही. ऐंशीच्या दशकांत ताईंचे सरकार कोसळल्यानंतर अनेकांनी नवे गळाबंद सुट शिवून तयार ठेवले होते, पण त्यावेळी मोरारजीभाईंनी विधानसभाच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला व त्यामुळे त्यांचा हिरमोड तर झालाच, पण नव्याने शिवलेले ते पेहराव वाया गेले होते. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असून त्याचा पंधरवडाच शिल्लक आहे. त्यामुळे फेररचना झाली तर याच पंधरवड्यात होईल अन्यथा ती महिनाभर लांबणीवर पडेल असे जाणकार सांगतात. कारण त्यानंतरचा महिना पौष आहे व तो शुभ मानला जात नाही. गोव्यातील अनेक इच्छुक देवाचे ‘मनीस’ मानले जातात. त्यामुळे ते या महिन्यात मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतील असे दिसत नाही. त्यामुळे फेररचना झाली तर ती या पंधरवड्यात होईल किंवा तिला महिनाभर विलंब लागेल असे मानले जाते. तसे झाले तर ही उत्कंठा आणखी महिनाभर ताणल्यासारखे होईल. मात्र, मंत्रिपदाची आस बाळगून असलेले तितका विलंब सहन करू शकतील का ते येत्या दिवसांत कळून येईल. ∙∙∙

म्हशीच्या शेणाची तपासणी!

राजधानी पणजीत शनिवारी एक घटना घडली आणि ती घटना दिवसभर चर्चेत राहिली. ताळगावात काही मोजकेच शेतकरी आता शेती करतात. एकेकाळी शेतीचे मळे ताळगावची शान होती आणि ती नष्ट झाली आहे. जे शेतकरी शेती करतात, ते वर्षातून काही मोजकीच पिके घेतात. अशाच एका शेतकऱ्याने केलेल्या शेतातील पीक व इतर साधनांची मोकाट सोडलेल्या म्हशीने नासधूस केली आणि त्या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मोकाट जनावरांबाबत मालकांविरुद्ध सरकारने कडक पावले उचलणार असल्याचे जाहीर केले, पण तसे झाले नाही. त्यामुळे नुकसान करणारी म्हैस शेतकऱ्याने पकडून तिला पोलिस स्थानकासमोर दाखल केली. नुकसान करणारी ती हीच म्हैस म्हणून हा पुरावा घ्या, असे त्यांचे म्हणणे. पोलिसांनीही ती म्हैस ताब्यात घेतली आणि डिचोलीतील पशुपालन केंद्रात पाठवली. आता त्या म्हशीने खरोखरच त्या शेतीतील पीक खाल्ले आहे काय, हे तपासण्यासाठी कदाचित पुढे पशुवैद्यकीय डॉक्टरांना म्हशीचे शेणही तपासावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होणार का नाही? 7 वर्षापासून GCA ची चालढकल; जमीन काढून घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

Digital Parenting: पालकच 'मोबाईलवेडे' झाले तर मुलांकडे लक्ष कोण देणार?

Goa Assembly Live: आमदार जित आरोलकर यांनी उपस्थित केला धारगळ वाहतुकीचा प्रश्न

Marcel: बालचमूंचा आनंदोत्सव! गोव्याची समृद्ध लोकनृत्याची परंपरा; माशेलमध्ये रंगल्या स्पर्धा

प्रेमासाठी खाकी वर्दीशी बेईमानी, कारवाईत जप्त केलेले 2 कोटी हडपले; गोवा - मनालीत उधळले, विवाहित पोलिस लव्ह बर्डचा धक्कादायक कांड

SCROLL FOR NEXT