Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; तवडकरांची मासेमारी

Khari Kujbuj Political Satire: पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश निघून महिना उलटून गेला. मात्र, अजूनही काही निरीक्षकांनी आपला ताबा सोडलेला नाही.

Sameer Panditrao

तवडकरांची मासेमारी

मध्यंतरी घोडेस्वारीवरून सभापती रमेश तवडकर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांनी आता आपल्या ‘श्रमधाम’ या सामाजिक कामाच्या सीमा आता थेट केरळपर्यंत नेऊन भिडवल्या आहेत. ते कोणतेही काम करण्यास मागे राहत नाहीत. पाग पद्धतीने मासेमारी करणे हे एक कसब आहे. जाळे पाण्यात कसे फेकले जाते, त्यावरच मासे मिळणार की नाही हे ठरते. अशा ‘पागीर मार नुस्ते काढ’ स्पर्धेला तवडकर पोचले. त्यांनी पाग मारून मासे पकडण्याचाही प्रयत्न केला. ते राजकारणी असल्याने ते आता मंत्रिपद आपल्या जाळ्यात पकडतील का, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. आपणाला मंत्रिपदात स्वारस्य नाही, असे त्‍यांनी जाहीरपणे सांगितले असले तरी त्यांच्या समर्थकांना ते थोडेच पटणार आहे?∙∙∙

तेरेखोल निरीक्षकाला खुर्चीचा मोह!

पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश निघून महिना उलटून गेला. मात्र, अजूनही काही निरीक्षकांनी आपला ताबा सोडलेला नाही. एका पोलिस निरीक्षकांमुळे इतरांच्या बदल्या अडकून राहिलेल्या आहेत. तेरेखोल किनारपट्टी पोलिस स्थानकाच्या निरीक्षकाची बदली होऊनही ते त्याच ठिकाणी दिवस काढत आहेत. त्यांना तेथून मुक्त करण्यास वरिष्ठ अधिकारी इच्छुक नाही की निरीक्षकच तेथून जाण्यास तयार नाही हा चर्चेचा विषय बनला आहे. हा निरीक्षक खुर्ची सोडण्यास तयार नसल्याने साळगावच्या निरीक्षकाला त्या जागी जाता येत नाही. साळगाव येथे बदली झालेल्या निरीक्षकालाही ही जागा कधी रिक्त होते याची वाट पाहावी लागत आहे. बदल्यांचा हा घोळ नेहमीच राजकीय हस्तक्षेपामुळे सुरूच असतो. क्राईम ब्रँचमधीलही काही निरीक्षकांना बदली होऊनही मुक्त करण्यात आलेले नाही. पोलिस खात्याचे मुख्यालय अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी ज्या कॉन्स्टेबल्सनी बदलीच्या ठिकाणी वर्णी लावली नाही त्यांच्याबाबतीत कठोर भूमिका घेतली होती तीच निरीक्षकांच्या बाबतीत का घेतली जात नाही. हा दुजाभाव का? अशी चर्चा काही कॉन्स्टेबल्समध्येच सुरू आहे. ∙∙∙

आधी लगीन टॉवरचे!

चिखली पंचायत हॉलमध्ये झुवारी पुलावरील नियोजित ग्रीन टॉवर्सचे काल शुक्रवारी भूमिपूजन झाले. त्या हॉलमध्ये दुपारी बाराच्या मुहूर्तावर लग्न सोहळा होणार होता व त्यांनी हे पंचायत हॉल पाच महिने अगोदर म्हणजे डिसेंबर २०२४ मध्ये बुक केले होते. त्यानुसार वधू-वराकडील मंडळींनी लग्नपत्रिका छापून वाटल्या होत्या. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ग्रीन टॉवर्सचे भूमिपूजन होणार असल्याने पंचायतीतून लग्नासाठीच्या हॉलचे बुकिंग रद्द करून अन्यत्र लग्न सोहळा आयोजित करण्यास सांगण्यात आले. परिणामी वधू-वरांसह त्यांच्या पालकांची भंबेरी उडाली. ऐनवेळी काय करावे, हा पेचही त्यांच्यापुढे होता. शेवटी त्यांना १५ किमी दूरवरचा कासावली येथील लहान हॉल बुक करावा लागला. हॉल बदलल्याची पूर्वकल्पना लग्न सोहळ्याला येणाऱ्यांना नसल्याने काहींनी पंचायत हॉल गाठले. पण, तिथे त्यांना वेगळाच नजारा दिसला. शेवटी काहींनी नव्या ठरलेल्या लग्नाच्या हॉलकडे जाणे पसंत केले. काहींनी घरी जाणे पसंत केले. काय करणार ‘आले मंत्र्यांच्या मना तिथे कुणाचे चालेना’, आधी लगीन टॉवरचे!∙∙∙

म्हणूनच ‘एफडीए’ सक्रिय का?

गोव्यातील ‘एफडीए’ या दिवसात भलतीच सक्रिय झालेली दिसत आहे, विविध भागात एफडीएचे पडत असलेले छापे व होत असलेली कारवाई त्याची साक्ष देत आहे. याच्याशी तुलना केली तर अन्य विविध खात्यांची वा यंत्रणांची निष्क्रियता स्पष्ट होत आहे. ‘एफडीए’ आरोग्य खात्याच्या कक्षेत येते व त्या खात्याचे मंत्री विश्वजित यांनी आपल्या खात्यांच्या सक्रियतेबाबत घेतलेला पुढाकार तर त्या मागील कारण नसावे ना, अशी चर्चा आता जनमानसांत सुरू झालेली आहे. राणे हे विविध इस्पितळांत अचानक भेट देऊन तेथील अव्यवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेऊ लागलेत त्यामुळे ‘एफडीए’ सक्रिय झालेली असावी, असे काहींना वाटते तर आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेवरूनच तिने उत्तर गोव्यात छापे सुरू केल्याचे काहींचे म्हणणे आहे. काही का असेना ‘एफडीए’च्या कारवाईमुळे खाद्यपदार्थांच्या गैरप्रकारांना आळा बसू लागला आहे. छापे दक्षिण गोव्यातही सुरु करावेत, अशी मागणीही म्हणे होऊ लागलेली आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire

गोविंद यांची फेरारी

राज्यात रेसिंग ट्रॅकचा अद्याप पत्ता नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आणखीन एक आकर्षण केंद्र तयार करण्यासाठी रेसिंगचे आयोजन राज्यात केले जाऊ शकते. गोवा मोटर स्पोर्टस् असोसिएशनला अत्याधुनिक रेसर कार गुरुवारी प्रदान करण्यात आली. बांबोळीच्या ॲथलेटिक्स स्टेडियममध्ये कारचे इंजिन सूर मारू लागले आणि क्षणार्धातच क्रीडामंत्र्यांना ट्रॅकवर उतरण्याचा मोह अनावर झाला. गतिमान गोव्याच्या मनातली स्पीडची धडपड चेहऱ्यावर जाणवत असतानाच त्यांनी कारचे स्टेअरींग हातात घेतले. गियर टाकला आणि घेतली भन्नाट फेरी ∙∙∙

मडगावचा विकास

गोव्याच्या अन्य भागात नव्हे पण मडगावात कॉंग्रेस बळकट झाल्याचा दावा त्या पक्षाचे नेते करू लागले आहेत. कदाचित परवा युवा उद्योजकाने जो दणक्यात कॉंग्रेस प्रवेश केला हेही त्या मागील कारण असावे. पण मुद्दा तो नाही, या प्रवेश कार्यक्रमप्रसंगी बोलताना अनेकांनी गेल्या पस्तीस वर्षांत मडगाव विकासात मागे पडल्याची टीका केली. ती दिगंबर कामत यांना अनुलक्षून असावी, पण त्या काळातील पाच वर्षांत दिगंबर हे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री होते. त्याचा त्यांना विसर पडलेला असावा. तेवढ्याने भागत नाही, तर ते मुख्यमंत्री झाल्यावर मडगावातील आदर्श सभागृहात कामत यांचा जाहीर सत्कार केला गेला होता व त्यासाठी एका उद्योजकाने व एका निवृत्त प्राचार्याने पुढाकार घेतला होता. असे असतानाही मडगाव मागे का पडले बरे? याचा शोध आता अनेकजण घेताहेत खरे. ∙∙∙

गडकरींचा साधेपणा

पायाभूत सुविधांसाठी हजार कोटी रुपये गोव्यासारख्या छोट्या राज्याला उपलब्ध करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गोव्यावर प्रेम आहे. भाजपच्या सुरवातीच्या काळात संघटनात्मक कामासाठी ते गोव्यात येत. आताही येतात. ते कधी आले आणि कधी गेले हे कोणालाच समजत नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी राजशिष्टाचाराला दिलेला फाटा. त्यांच्या स्वागतासाठी किंवा त्यांना निरोप देण्यासाठी कोणीही विमानतळावर यायचे नाही हा त्यांचा दंडक. त्यामुळे त्यांचे स्वागत केले हे दर्शवणारी छायाचित्रे अनेकांना टिपता येत नाहीत. नेहमीच मोठ्या घोषणा करून त्या प्रत्यक्षात आणणारे गडकरी इतके साधे वागतात आजच्या युगात सांगूनही न पटणारेच आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT