रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर ते चर्चेत तर होतेच परंतु आता तर त्यांनी स्वतः डिस्चार्ज मिळाल्यानंतर जे काही वक्तव्य केले त्यावरून त्याचा प्रकरणाला एक वेगळाच ट्वीस्ट आला आहे. आता हा ट्वीस्ट कितपत आणि कुणासाठी फायद्याचा ठरेल, हे मात्र पाहावे लागेल. रामाने वक्तव्य केल्यावर लगेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रामाला अप्रत्यक्ष पाठिंबा आपल्या मागण्यांतून दाखवला खरा. पण त्यामागे त्यांचे राजकारण तर नाही ना? हे शोधण्यात सध्या भाजपवाले सरसावले आहेत. ∙∙∙
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गोव्यात प्रवेश केला आहे. अजूनही मोठा मेळावा घेत शक्तिप्रदर्शन न केलेल्या या पक्षाने चक्क माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना प्रस्ताव देण्याचे धाडस केले आहे. शिवसेनेचे प्रदेश पातळीवरील पदाधिकारी आणि उत्पल यांची शनिवारी बैठक झाली. त्या बैठकीत उत्पल यांनी शिवसेनेकडून हव्या त्या मतदारसंघातून लढावे, असे सुचवण्यात आले आहे. उत्पल यांनी हे फारसे गांभीर्याने न घेता आणखी तीन जणांची नावे सुचवत त्यांच्याशी संपर्क साधा, असा सल्ला देत काढता पाय घेतल्याची चर्चा आहे.∙∙∙
हरवळे येथील श्री देव रुद्रेश्वर प्रांगणात रुद्रेश्वर देवस्थान समिती आणि रथोत्सव समिती यांनी भंडारी समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा रविवारी आयोजित केला होता. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना तेथे निमंत्रित करण्यात आले होते. सर्वजण तेथे पोचलेही आणि कार्यक्रम उत्साहात झाला. सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक येथे न गेल्याची चर्चा कार्यक्रम संपल्यानंतर सुरू झाली. सारेजण समाज म्हणून एकत्र आले तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री देव रुद्रेश्वराचे दर्शन घेण्यासाठी सर्वप्रथम पोहोचणारे दामू या कार्यक्रमापासून अंतर का राखून राहिले, याचे कारण राजकीय चष्म्यातून शोधले जात होते. ∙∙∙
विधानसभा निवडणुकीला अजूनही अवकाश असला तरी सर्व राजकीय पक्ष आतापासूनच त्यासाठी तयारीला लागले आहेत. डिसेंबरमध्ये ‘झेडपी’ निवडणूक आहे. त्यानंतर पालिका निवडणुका होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांसाठी या दोन निवडणुका विधानसभेची ‘सेमीफाइनल’ आहे. शुक्रवारी मडगावात खोतीगावचे माजी सरपंच राजेश गावकर यांनी समर्थसकांसमवेत ‘आप’मध्ये प्रवेश केला. यावेळी ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी भाजप ढोंगी असल्याचा आरोप केला. तर कॉंग्रेस भाजपला पराभूत करण्यासाठी गंभीर नसल्याचे म्हटले. ‘फॉरवर्ड’चे विजय सर व ‘रेव्हल्यूशनरी’चे मनोज परब यांच्याविषयी मात्र त्यांनी सहमती दर्शविली. अमितबाब हे पेशाने वकील आहेत. वकिली कौशल्य असल्याने त्यांची आगामी काळात काहीतरी वेगळीच ‘स्ट्रॅटेजी’ असू शकते. ती काय असेल यासाठी तूर्त ‘वेट अॅण्ड वॉच’. ∙∙∙
साकोर्डा पंचायतीच्या ग्रामसभेत एका पोलिसाचा हस्तक्षेप झाल्यामुळे यासंबंधीची तक्रार कुळे पोलिसांत करण्यात आली आहे. लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या एका नागरिकाला या पोलिसाने अडवण्याचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सत्ताधाऱ्यांचे हस्तक बनून ग्रामसभांत वातावरण बदलण्याचा प्रयत्न अशा लोकांकडून होत असल्याचा आरोपही साकोर्ड्यातील काही नागरिकांकडून केला जात आहे. मात्र असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही या नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे आता कारवाई करायची की हे प्रकरण हलक्यात घ्यायचे, हे सर्वस्वी आता पोलिसांवरच निर्भर आहे.∙∙∙
विविध विषयांवरून सरकार आणि मंत्र्यांवर हल्लाबोल करणारे सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर १८ सप्टेंबरला जीवघेणा हल्ला झाला, त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली. २३ दिवस गोमेकॉत उपचार घेऊन तेथून बाहेर पडल्यानंतर रामांनी पुन्हा लक्ष्य केले, ते थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटेंना. या दोन मंत्र्यांचा हल्ल्यात हात असल्याचा आपला संशय असल्याचा दावा त्यांनी केल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांसह पोलिस आणि प्रदेश भाजपनेही त्यांच्यावर सडकून टीका केली. रामा यांचा ‘बोलवता धनी’ वेगळाच असल्याचा दावाही त्यांच्याकडून केला जात आहे. परंतु, त्या बोलवत्या धन्याचे नाव मात्र त्यांच्या तोंडातून का बाहेर येत नाही? कोण असेल तो? असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे. ∙∙∙
दिव्यांगजनांच्या हितासाठी त्यांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सुविधा, योजनांची माहिती मिळावी, यासाठी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाईंच्या नेतृत्त्वात पर्पल फेस्त आयोजण्यात आला आहे. उत्तम आयोजनाचा नमुना म्हणता यावा, असे वाखाणण्याजोगं आयोजनही झालं आहे. या महोत्सवाच्या पूर्वतयारी वेळी ‘तारे जमींपर’ फेम परफेक्शनिस्ट आमिर खान यालाही पर्पल फेस्तचे आमंत्रण देण्यात आले होते, पण तारे काही जमींपर दिसलेच नाहीत. त्यामुळे फेस्तात तारे जमींपर उतरतील अन् भेटतील या अपेक्षेत असलेल्या फेस्तच्या प्रतिनिधींचा हिरमोड मात्र झाला. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.