Rama Kankonkar Assault Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar: काणकोणकरांच्‍या प्रकृतीत सुधारणा! हल्लाप्रकरणी एकूण 18 जणांना अटक; ‘गोवा बंद’बाबत होणार बैठक

Rama Kankonkar Attack: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्‍यावर जीवघेणा हल्ला होऊन तीन दिवस उलटले, तरी अद्याप या हल्ल्यामागील ‘मास्‍टरमाईंड’पर्यंत पोहोचण्‍यात पोलिसांना यश आलेले नाही.

Sameer Panditrao

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्‍यावर जीवघेणा हल्ला होऊन तीन दिवस उलटले, तरी अद्याप या हल्ल्यामागील ‘मास्‍टरमाईंड’पर्यंत पोहोचण्‍यात पोलिसांना यश आलेले नाही. दुसरीकडे या प्रकरणावरून विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवण्‍यास सुरुवात केल्‍याने सरकारवरील दबावही वाढला आहे.

या प्रकरणातील सात संशयितांना अटक करण्‍यात आली असली, तरी ‘मास्‍टरमाईंड’ पोलिसांच्या हाती लागलेला नाही. संशयितांचे जबाब नोंदविल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे आज पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना स्‍पष्‍ट केले. या प्रकरणाचा विविध अंगाने तपास सुरू असल्‍याचेही त्यांनी सांगितले.

विविध प्रकारच्‍या आंदोलनांमध्‍ये सातत्‍याने सहभागी होत असलेले सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्‍यावर गुरुवारी करंझाळे–पणजी येथील एका हॉटेलबाहेर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला करण्‍यात आला होता. सात जणांच्‍या टोळक्‍याने काणकोणकर यांना केबल्‍स आणि बेल्‍टने जबर मारहाण केली. यात काणकोणकर गंभीर जखमी झाले आहेत.

दिवसाढवळ्या झालेल्‍या या हल्ल्‍याने संपूर्ण गोवा हादरला होता. पणजीतील आझाद मैदानात निषेध सभा घेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, व्‍हेंझी व्‍हिएगस, वीरेश बोरकर यांनी या घटनेवरून शुक्रवारी राज्‍य सरकारला धारेवर धरले होते. सामाजिक कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या झालेल्‍या भयानक हल्ल्‍यातून राज्‍यातील कायदा–सुव्‍यवस्‍था पूर्णपणे ढासळल्‍याचे, गुंड प्रवृत्तीच्‍या लोकांवर सरकारचे नियंत्रण नसल्‍याचा आरोप केला. या हल्ल्‍यामागील ‘मास्‍टरमाईंड’चा शोध घ्‍यावा, पोलिसांनी सोमवारपर्यंत ‘मास्‍टरमाईंड’ला अटक न केल्‍यास ‘गोवा बंद’चा इशाराही त्‍यांनी दिला होता. त्यामुळे आता सरकारवरही दबाव वाढला आहे.

बंदूक - पिस्तुलबाबत पडताळणी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांकडे बंदूक किंवा पिस्तूल होते की नाही याची पडताळणी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजची आज पोलिसांनी तीन - चार वेळा पाहणी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे पिस्तूल होते. त्यामुळे त्याची चौकशी पोलिसांनी केली आहे. न्यायालयात खटला दाखल झाल्यावर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून सादर केला जाणार आहे. पोलिसांनी पिस्तूल होते असे म्हटले, तर संशयितांकडून पिस्तूल नव्हते असे दाखवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर केले जाऊ शकते असे पोलिसांना वाटते.

सोमवारपर्यंत केबल ताब्यात घेणार

मारहाण प्रकरणात वापरण्यात आलेल्या केबल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेल्या नाहीत. तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केबल हाती लागतील. सोमवारपर्यंत मारहाण करण्यासाठी वापरलेल्या केबल आणि वाहने पोलिस ताब्यात घेतील. त्यासाठी पोलिसांनी आपला तपास सुरू ठेवला आहे.

‘गोवा बंद’बाबत बैठक

रामा काणकोणकर हल्ला प्रकरणातील ‘मास्‍टरमाईंड’ला शोधण्‍यासाठी विरोधकांनी पोलिसांना सोमवारपर्यंतचा ‘अल्‍टिमेटम’ दिला आहे. सोमवारपर्यंत पोलिसांना यात यश न आल्‍यास सर्वपक्षीय नेत्‍यांची बैठक बोलवून ‘गोवा बंद’बाबत निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.

‘भिवपाची गरज ना’ हे सिद्ध करून दाखवा!

रामा काणकोणकर हल्ला प्रकरणातील ‘मास्‍टरमाईंड’ला लवकरात लवकर अटक करून मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला दिलेली ‘भिवपाची गरज ना’ची ग्‍वाही सिद्ध करून दाखवावी, अशी मागणी भाजप आमदार मायकल लोबो यांनी केली. कुणाकडून तरी पैसे घेऊन संशयितांनी काणकोणकर यांच्‍यावर हल्ला चढवला. त्‍यामुळे पैसे देणाऱ्याला अटक झालीच पाहिजे, असेही त्‍यांनी नमूद केले.

दामू नाईक यांची विरोधकांवर टीका

विरोधी पक्षाच्‍या नेत्‍यांना भाजप कार्यालयात घुसण्‍याचा अधिकार कुणी दिला? यामागील ‘मास्‍टरमाईंड’ कोण? असे सवाल करीत विरोधकांच्‍या या कृत्‍याचा आपण निषेध करतो, असे भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक म्‍हणाले. रामा काणकोणकर हल्ला प्रकरण मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पोलिस योग्‍य पद्धतीने हाताळत आहेत, असेही त्‍यांनी नमूद केले.

आणखी ११ जणांना प्रतिबंधात्मक अटक

रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी गोवा पोलिसांनी एकूण १८ जणांना अटक केली आहे. गुरुवारी रात्री सहाजणांना, शुक्रवारी दोघांना आणि आज ११ जणांना प्रतिबंधात्मक अटक केली आहे. या सर्व ११ जणांना उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. या ११ जणांचा हल्ल्यात थेट सहभाग आढळून आलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले. शनिवारी प्रतिबंधात्मक अटक केलेल्यांत १. परशुराम लमाणी (२९, करमळी), २. श्रीधर लमाणी (२५, करमळी), ३. अँथनी गोन्साल्वीस (गोवा वेल्हा), ४. जोसेफ नाडर, ५. अनिल चव्हाण, ६. प्रसाद शर्मा, ७. विपुल फोलकर, ८. डेविड अराउजो, ९. लतीफ तवई, १०. सॅम्युअल सिद्धी, ११. आकाश वायंगणकर यांचा समावेश आहे.

दोघांना पाच दिवसांची कोठडी:

रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी शुक्रवारी अटक करण्‍यात आलेल्‍या फ्रांको डिकॉस्‍टा आणि साईराज गोवेकर यांना प्रथमवर्ग न्‍यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून यामागे नेमकी कोण व्यक्ती आहे, अटक केलेल्यांपैकी एकाने यापूर्वी काणकोणकर यांना मारहाण केली होती. आगशी पोलिसांनी त्याला पकडलेही होते. त्या घटनेचा व आत्ताच्या मारहाणीचा काही संबंध आहे का हेही पोलिस तपासत आहेत.

काणकोणकरांच्‍या प्रकृतीत सुधारणा

रामा काणकोणकर यांची प्रकृती सुधारत आहे. जेवणही घेत असून पुढील तीन ते चार दिवसांत त्‍यांना इस्‍पितळातून डिस्‍चार्ज देण्‍यात येईल, अशी माहिती गोमेकॉच्‍या सूत्रांनी दिली. काणकोणकर यांच्‍या संरक्षणासाठी त्‍यांच्‍या वॉर्डबाहेर दोन पोलिस तैनात करण्‍यात आल्‍याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आमदार विजय सरदेसाई यांनी आज रात्री उशीरा गोमेकॉत रामा काणकोणकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी त्यांच्यासमवेत अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tamil Yeoman Butterfly: गोव्यात बहुतांश देवरायांमध्ये आढळणारा 'खष्ट' वृक्ष, त्यावर दिसणारी 'तमिळ येओमन’ फुलपाखरे

Goa Roads: "रस्त्यावर खड्डा दिसला की फोन करा, 24 तासांत दुरुस्त करतो", मंत्री कामतांनी दिली गोवेकरांना Guarantee

Shivaji Maharaj: छ. शिवाजी महाराजांनी आधी टेकड्या जिंकल्या, तटबंदीवर तोफांचा मारा केला; वेल्लोर जिंकला! दक्षिण दिग्विजयाची कथा

Vasco: विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू! वॉटर हिटरचा शॉक बसल्याची शक्यता; मांगोरहिल येथील घटना

Horoscope: भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये, नवरात्रीचा काळा तुमच्यासाठी कसा असेल? वाचा सविस्तर राशीभविष्य

SCROLL FOR NEXT