Khari Kujbuj  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; रजनीकांतचे चाहते दुखावले

Khari Kujbuj: गोव्यातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाण पूल हाच एकमेव उपाय आहे. पण असे प्रकल्प आखले की त्याला विरोध ठरलेला असतो.

गोमन्तक डिजिटल टीम

रजनीकांतचे चाहते दुखावले

भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक रजनीकांत यांचा ५६ व्या ‘इफ्फी’त सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या गौरवाची रक्कम मोठी आहे. परंतु या गौरवास साजेशे ना स्मृतिचिन्ह देण्यात आले, ना यथोचित सन्मान करण्यात आला. ‘इफ्फी’त सहभागी होणाऱ्या अभिनेत्यांना जे स्मृतिचिन्ह देण्यात येत होते तेच आणि एक शाल देण्यात आली. खरे तर ज्यांच्या नावाने हा सन्मान दिला जातोय आणि ज्या अभिनेत्याला दिला जातोय त्याला कशा पद्धतीने स्मृतिचिन्ह असायला हवे होते, याची जाणीवही आयोजकांना झाली नसेल का? असा प्रश्‍न प्रतिनिधींकडून केला जात होता. इफ्फीचे सूप वाजले अन् झाले गेले गंगेला मिळाले, परंतु येत्या काळात अशा गोष्टी घडू देऊ नयेत, याचे भान राखावे, अशीही चर्चा सिनेप्रेमी प्रतिनिधींकडून होत आहे. ∙∙∙

उड्डाण पुलांना विरोध

गोव्यातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाण पूल हाच एकमेव उपाय आहे. पण असे प्रकल्प आखले की त्याला विरोध ठरलेला असतो, त्यामुळे अनेक प्रकल्प सोडून द्यावे लागले आहेत. पण वाढते अपघात व त्यात मृत्यू होऊ लागल्यावर तेथे उड्डाणपूल हाती घेणे भाग झाले आहे. मात्र, त्यामुळे दुप्पट खर्च तर होतोच पण विनाकारण मानवी बळी जातात. असे आम्ही म्हणत नाहीत तर मुख्यमंत्री डॅा.प्रमोद सावंत म्हणतात. धारगळ येथे अशा पुलाच्या कामाचा शुभारंभ करताना त्यांनी हे प्रतिपादन केले व कोणत्याही प्रकल्पांना राजकीय हेतूने विरोध करू नका, असे म्हटले. काहीना त्यांनी भोम येथे तसेच दांडीवाडो येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला होत असलेल्या विरोधाकडे त्यांनी केलेला हा अंगुली निर्देश असल्याचे वाटले. दोतोरांना कोणते प्रकल्प अभिप्रेत होते, ते मात्र उघड झाले नाही. ∙∙∙

दरोड्याचे केले ‘नाटक’

दक्षिण गोव्यात एका विचित्र प्रकाराने लोकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. चोरी-दरोड्याच्या घटना वाढत आहेत, अशी जनतेची भावना आहे, तिथे एका व्यक्तीने दरोडा पडल्याची खोटी कथा रचून पोलिसांना तात्काळ सतर्क केले. पोलिसांनी तातडीने पथके रवाना केली, चौकशी केली; पण काही वेळातच संपूर्ण प्रकार ‘नाटक’ असल्याचे उघड झाले. हा प्रकार लांडगा आला रे आला सारखा होता, ‘आज खोटा दरोडा दाखल केला, उद्या खरी घटना घडली तर?’ अशा बनावट तक्रारींमुळे पोलिसांना भविष्यात प्रत्येक माहितीवर संशय घ्यावा लागू शकतो आणि खऱ्या घटनेत प्रतिसाद उशिरा मिळाला, तर ती मोठी दुर्घटना ठरू शकते ही भीती आता लोक मोकळेपणाने व्यक्त करत आहेत. यामुळे पोलिसांचा वेळ, मनुष्यबळ आणि तपास क्षमता वाया घालवणाऱ्याला कडक शिक्षा व्हायलाच हवी, अशी चर्चा सुरू झाली आहे. असल्या फसव्या तक्रारींना लगाम घातला नाही तर खरी घटना घडली तरी पोलिसांच्या मनात शंका निर्माण होईल… आणि त्याचा फटका सामान्य नागरिकालाच बसणार! नाही का?, असे लोक बोलू लागलेत. ∙∙∙

मंत्र्यांविना ‘इफ्फी’ सुना?

यंदा ‘इफ्फी’ला जवळजवळ सर्व मंत्र्यांनी पाठ दाखविल्याचे दिसले. समारोपावेळी तर मुख्यमंत्री सोडता एकही मंत्री दिसला नाही. काही मंत्र्यांना तर गोव्यात ‘इफ्फी’ सुरू आहे हेही माहीत नव्हते वा माहीत असूनही त्याची दखल घेण्याएवढा तो महत्त्वाचा आहे, असे त्यांना वाटत नव्हते. एका मंत्र्याने तर कसला, कोणाचा ‘इफ्फी’ अशी प्रतिक्रिया दिली. पूर्वी उद्‍घाटन व समारोपाला अर्धे मंत्रिमंडळ उपस्थित असायचे, अशी आठवण श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये झालेल्या समारोप सोहळ्याच्या वेळी अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे मंत्र्याविना ‘इफ्फी’ सुना सुना वाटत होता. नाही म्हटलं तरी, दर महोत्सवागणिक ‘इफ्फी’ ची शोकांतिका विस्तारित होत चालली आहे,एवढे मात्र निश्चित. हे आम्ही नाही बोलत या महोत्सवातील प्रतिनिधीच असे बोलताना दिसत होते. ∙∙∙

केपेतील संकल्पना तिरुपतीला !

‘तुम मुझे खून दो , हम तुम्हे लॉटरी देंगे’ ही केपे गणपती मंडळाची संकल्पना आता तिरुपती बालाजी मंदिराने स्वीकारली आहे. केपे गणपती मंडळाने गणेश चतुर्थी निमित्त काढलेली देणगी कूपन थेट मिळविण्यासाठी रक्तदान करण्याची योजना आखली होती. बालाजी मंदिरात थेट प्रवेश मिळविण्यासाठी मंदिर समितीने अशीच योजना आखली आहे. ‘तुम मुझे खून दो हम तुम्हे मंदिर एन्ट्री पास देंगे’ अशी योजना बालाजी मंदिराने सुरू केलीय. जे रक्तदान करतात, त्यांना थेट मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. केपे गणेश मंडळाचे इच्छित फळ देसाई यांची योजना राज्याची सीमा ओलांडून अन्य राज्यात पोहचली आहे. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांचा दरबार जनतेला आधार !

‘जो राजा प्रजेचे ऐकतो व प्रजेच्या समस्या जाणून सोडविण्याचा प्रयत्न करतो तोच खरा राजा’. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत दर शनिवारी आपल्या जनतेच्या समस्या ऐकून घेतात व त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतात, म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आता पेडण्यापासून काणकोणपर्यंतचे लोक उपस्थिती लावतात. मुख्यमंत्र्यांच्या दरबारी बेरोजगारांपासून म्हातारे, युवक,सगळेच उपस्थिती लावतात.आता अशा प्रकारचे दरबार इतर मंत्र्यांनी आपापल्या भागात भरविल्यास जनतेला आपल्या समस्यांचे समाधान मिळणे सोपे होईल हे निश्चित. अशी पद्धत सगळ्यांनीच स्वीकारल्यास सरकारला ‘सरकार आपल्या दरबारी’ उपक्रम राबविण्याची गरज राहणार नाही. ∙∙∙

तवडकरांचा विश्‍‍वास सार्थ ठरेल?

ऐन जिल्‍हा पंचायत निवडणुकीच्‍या तोंडावरच भाजपचे इजिदोर फर्नांडिस गोवा फॉरवर्डमध्‍ये गेल्‍यामुळे आणि इजिदोर यांच्‍याकडे हक्‍काची सहा हजार मते असल्‍याचे फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई म्‍हणत असल्‍याने त्‍याचा फटका कोणकोणात मंत्री रमेश तवडकरांना बसणार का? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. पण, तवडकर यांनी मात्र शनिवारी पत्रकारांशी बोलताना इजिदोर यांच्‍या गोवा फॉरवर्ड प्रवेशाचा काडीमात्र फरक पडणार नसल्‍याचे सांगितले. आपले काम जनता बघत आहे. आपले ‘स्‍टार’ही चांगले आहेत. जनता आपल्‍यावरच विश्‍‍वास ठेवेल असेही त्‍यांनी नमूद केले. गत विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढलेल्‍या तवडकरांना ९,०६३ मते मिळाली होती. तर, अपक्ष म्‍हणून लढलेल्‍या इजिदोर फर्नांडिस आणि काँग्रेसच्‍या उमेदवारीवर लढलेल्‍या जनार्दन भंडारी या दोघांना ११,३६३ मते पडली होती आणि इजिदोर आणि भंडारी आता सोबत असल्‍याने तवडकरांचा विश्‍‍वास सार्थ ठरेल का? असा प्रश्‍‍न अनेकांना पडला आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT