Public hearing with police presence for Shirgaon mine Objection on EIA Report Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: शिरगाव खाणीसाठी पोलिस बंदोबस्तात जनसुनावणी; ‘ईआयए’ अहवालावरील आक्षेपाला हरकत

Goa Mining: खाणीला समर्थन असले तरी नियमांचे पालन करत, गावातील प्रश्न सोडवून आणि गाव सांभाळूनच खाण सुरू करा अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mining: शिरगाव पंचायतीसह बहुतांश लोकांचे साळगावकर कंपनीच्या खाणीला समर्थन असले, तरी खाणविषयक नियमांचे पालन करतानाच, गावातील प्रश्न सोडवून आणि गाव सांभाळूनच खाण सुरू करा, अशी प्रमुख मागणी आज जनसुनावणीवेळी पुढे आली. शिरगाव पंचायतीसह काही स्थानिकांनी खाण व्यवसायाला समर्थन दिल्याने शिरगाव-मये खाण ब्लॉकअंतर्गत येणाऱ्या साळगावकर शिपिंग कंपनीच्या खाणीला ‘ईसी’ (पर्यावरणीय दाखला) मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

दुसऱ्या बाजूने मोजक्याच लोकांनी ‘ईआयए’ अहवालावर बोट ठेवताना तो चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे मत व्यक्त केले. तथापि, मत मांडण्यास अधिकाऱ्यांनी हरकत घेतल्याने पर्यावरणप्रेमी रमेश गावस यांनी या घटनेचा निषेध केला आहे. जनसुनावणी म्हणजे जनतेची निव्वळ थट्टा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिरगाव-मये खाण ब्लॉक-२ अंतर्गत शिरगावची पूर्वाश्रमीची चौगुले खाण आता साळगावकर कंपनीने मिळविली आहे. या खाणीसाठी आज (बुधवारी) डिचोलीत झांट्ये महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात जनसुनावणी घेण्यात आली. किरकोळ अपवाद वगळता ही जनसुनावणी शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली जनसुनावणी दुपारी दीड वाजेपर्यंत आटोपली.

शिरगावची खाण १७१.२४७२ हेक्टर क्षेत्रफळात व्यापली आहे. प्रतिवर्ष १.० मिलीयन टन खनिज उत्पादन करण्यासाठी या खाणीला पर्यावरणीय दाखला आवश्यक आहे. त्यासाठी ही जनसुनावणी घेण्यात आली. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. शमिला मोंतेरो आणि उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक बांदेकर यांच्या निरीक्षणाखाली वाठादेव-डिचोली येथील नारायण झांट्ये बहुउद्देशीय सभागृहात ही जनसुनावणी झाली.

पर्यावरण आघात मूल्यांकन (ईआयए) अहवाल सादरीकरण केल्यानंतर जनसुनावणीस प्रारंभ झाला. यावेळी शिरगावच्या सरपंच करिष्मा गावकर, माजी सरपंच दीनानाथ गावकर, विश्वंभर गावकर, भगवंत गावकर, तुळशीदास चोडणकर, सखाराम पेडणेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

पंचायत मायनिंगच्या बाजूने

गावच्या हितासाठी खाण व्यवसाय सुरू होणे गरजेचे आहे, असे मत शिरगावचे उपसरपंच आणि इतरांनी मांडले. खाण व्यवसाय सुरू झाला तर ट्रकवाले तसेच बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले. ‘ईआयए’ अहवाल अभ्यासपूर्ण नसल्याचे मत काहींनी व्यक्त केले. शिरगावला जोडून असलेल्या पैरा गावचा ‘ईआयए’ अहवालात उल्लेख नसल्याचे काहींनी निदर्शनास आणून दिले. ‘ईआयए’ अहवाल तयार करताना खाण क्षेत्र येणारी जमीन कोणाची, याचा अभ्यास केला आहे काय, असा प्रश्न माजी सरपंच बाबूसो गावकर यांनी उपस्थित केला.

स्थानिकांनी फिरविली पाठ

या जनसुनावणीस म्हणावी तशी गर्दी झाली नाही. उपस्थितांमध्ये शिरगावमधील लोकांचा अधिक भरणा होता. मात्र, पर्यावरणप्रेमी मिळून जेमतेम शंभरच्या आसपास लोक उपस्थित होते. जनसुनावणीसाठी ४६ जणांनी मत मांडण्यासाठी नावनोंदणी केली होती. उपस्थितांपेक्षा पोलिसच अधिक संख्येने होते, याचीही चर्चा घटनास्थळी सुरू होती.

रमेश गावस यांना मज्जाव

जनसुनावणीच्या अखेरीस पर्यावरणप्रेमी रमेश गावस मत मांडण्यास उभे राहिले. ‘ईआयए’ अहवाल तयार केलेल्या सल्लागार कंपनीचा प्रतिनिधी उपस्थित आहे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र, मत मांडण्यासाठी नावनोंदणी केली नसल्याचे कारण पुढे करून त्यांना बोलण्यास अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत जनसुनावणीत मत मांडण्याची वेळ संपल्याचे जाहीर केले. या प्रकाराचा गावस यांनी निषेध केला.

रमेश गावस, पर्यावरणप्रेमी

जनसुनावणी ही निव्वळ दिशाभूल आणि थट्टा आहे. ‘ईआयए’ अहवाल हा ‘कॉपी पेस्ट’ असल्याची टीकाही रमेश गावस यांनी केली. जनसुनावणीवेळी ‘ईआयए’ अहवाल तयार करणाऱ्या सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. ‘ईआयए’ अहवाल खोटा आणि गाव उद्ध्वस्त करणारा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

SCROLL FOR NEXT