सासष्टी तालुक्यात काळ्या तांदळाचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन घेण्यात आले आहे. आरोग्यासाठी लाभदायक मानल्या जाणाऱ्या या तांदळाचे उत्पादन कमी मिळत असले, तरीही किलोमागे मिळणारा दर पाचपट जास्त आहे. पर्यटकांकडूनही या तांदळाच्या पदार्थांची मागणी होत असल्याने याचे उत्पादन भविष्यात आणखी वाढेल, अशी माहिती विभागीय कृषी अधिकारी शेरीफ फुर्तादो यांनी दिली.
(Production of black rice will increase in Goa)
राय येथील प्रयोगशील शेतकरी वालेंतिनो रॉड्रिग्ज यांनी ‘काळा तांदूळ’या नव्या प्रजातीचे उत्पादन घेतलेले आहे. याची पाहणी विभागीय कृषी अधिकारी फुर्तादो, एमसीओ विराज देसाई यांनी केली. यावेळी अधिकारी फुर्तादो यांनी सांगितले की, सासष्टीत प्रथमच अॅग्रीकल्चर टेक्नोलॉजी मॅनेजमेंट एजन्सी म्हणजेच ‘आत्मा’अंतर्गत प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. काळा तांदूळ हा आरोग्यासाठी गुणकारक आहे.
या तांदळातील ग्लायसामिक इंडेक्स खूप कमी असून तो जवळपास 42 आहे. पांढऱ्या तांदळातील ग्लायसामिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे शरीरातील शर्करेचे प्रमाण लवकर वाढते. काळ्या तांदळाप्रमाणेच ‘ज्योती’ ही आणखी एक प्रजाती आहे, जिचा ग्लायसामिक इंडेक्स कमी आहे. या शिवाय दृष्टी चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन मिळते, आणखीही अँटीऑक्सिडंट या तांदळात आढळून येतात, असे त्यांनी सांगितले.
फुर्तादो पुढे म्हणाले, चांगल्या प्रतीचा तांदूळ व औषधी उद्देशाने हा तांदूळ खूप चांगले परिणाम देतो. या शिवाय काळ्या तांदळाचे उत्पादन एकरी कमी प्रमाणात मिळते. इतर तांदळाच्या प्रतींचे उत्पादन हे सरासरी एका एकराला 20 क्विंटल मिळते, तर काळ्या तांदळाचे उत्पादन एक एकराला 10 क्विंटल मिळते. मात्र, या तांदळाचा दर जास्त असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत नाही.
सध्या काळा तांदूळ बाजारात 400 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे, तर जया, ज्योती आदी तांदळाचा दर 70 ते 80 रुपये किलो इतका आहे. काळ्या तांदळाचे फायदे स्थानिक शेतकऱ्यांना व नागरिकांनी अजूनही माहीत नाहीत. मात्र, गोवा हे पर्यटन राज्य असून या ठिकाणी येणाऱ्या अनेक पर्यटकांना काळ्या तांदळाचे फायदे माहीत असल्याने या तांदळाला मागणी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याबाबतची माहिती देण्याचे व प्रायोगिक तत्त्वावर तांदळाचे उत्पादन घेण्याचा उपक्रम कृषी विभागाकडून सुरू आहे.
यांत्रिक पद्धतीने मशागत शक्य : देसाई
या तांदळाचे उत्पादन घेतल्यानंतर इतर भातकापणी यंत्रांनीही या तांदळाची मशागत केली जाऊ शकते. ड्रोनद्वारे फवारणी केली जाऊ शकते, भातलावणी व कापणीही यांत्रिक पद्धतीने केली जाऊ शकते. मात्र, या तांदळाची उंची खूप जास्त असल्याने याची काळजी घेण्याची गरज असते, असे कृषीचे एमसीओ विराज देसाई यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.