Mavin Gudinho
Mavin Gudinho  Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: दाबोळीवरील विमाने मोपाकडे वळविण्यासाठी केंद्रावर दबाव

दैनिक गोमन्तक

Mopa Airport In Goa:

सुशांत कुंकळयेकर

कतार एअरवेज या विमान कंपनीने 20 जूनपासून दाबोळी विमानतळाला रामराम ठोकण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो दाबोळी विमानतळासाठी धोक्याची घंटा मानली जात असून मागच्या वर्षभरात दाबोळीला रामराम ठोकून मोपा विमानतळाला मिठी मारणारी ही तिसरी आंतरराष्ट्रीय विमान कंपनी ठरणार आहे.

मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळीवरील चार्टर विमानांनाही गळती लागली असून क्यूई या ब्रिटिश कंपनीची 90 विमाने मोपावर वळविण्यात आली आहेत.

दरम्‍यान, मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्यवसायवृद्धीसाठी जीएमआर कंपनी दाबोळीवरील विमाने मोपाकडे वळविण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणत असल्याचा आरोप वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केला आहे.

सर्वांत आधी दाबोळीहून गॅटविक या ब्रिटिश विमानतळावर जाणारी विमाने एअर इंडिया या कंपनीने बंद करून ती मोपाला वळविली होती. त्यानंतर ओमान एअरवेज या कंपनीची दररोज दाबोळीवर उतरणारी दोन विमाने मोपाला वळविण्यात आली. त्यातच कतार एअरवेजने दाबोळीऐवजी मोपा विमानतळाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

हळूहळू दाबोळी विमानतळावरील सर्व नागरी उड्डाणे बंद करण्याचे हे हेतूपुरस्सर कारस्थान असून जीएमआर या खासगी कंपनीला भाजप सरकारने घातलेली ही पायघडी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी व्यक्त केली. ज्यावेळी एअर इंडिया कंपनीने मोपाला स्थलांतर केले होते, त्यावेळीच मी सरकारचे लक्ष या गंभीर आशा बाबीकडे वेधले होते, असे ते म्हणाले.

सध्या मोपा विमानतळावर दरदिवशी 100 विमाने उतरत असून दरदिवशी 10 हजार प्रवासी हा विमानतळ हाताळतो. या तुलनेत दाबोळी विमानतळावर सरासरी 60 विमाने उतरत असून पूर्वीच्या तुलनेत या विमानतळावरील प्रवासी 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाला आहे.

दक्षिण गोव्यातील हॉटेल व्यावसायिक जे चार्टर व्यवसायाशी संलग्न आहेत, त्या सेराफिन कोता यांनी सांगितले की, क्युई या ब्रिटिश चार्टर विमान कंपनीची दरवर्षी ९० विमाने दाबोळीवर उतरत होती, आता ती सर्व मोपाला वळविण्यात आली आहेत. सध्या दाबोळीवर फक्त गल्फ एअर आणि एअर अरेबिया याच कंपनीची विमाने उतरत आहेत.

रशियामधून दररोज एक विमान दाबोळीवर उतरत आहे. पण ते चार्टर विमान नसल्याने हे प्रवासी आपल्याला कुठे हवे असेल, तिथे वास्तव्य करतात. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना त्याचा कोणताही फायदा होत नाही, असे ते म्हणाले.

गोव्यासारख्या लहान राज्यात दोन विमानतळ परवडणार नाही, हे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो. पण आमचे त्यावेळी ऐकले नाही. आता त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत आहे. मोपा विमानतळामुळे दक्षिण गोव्यातील पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम आताच दिसू लागले आहेत. यापुढे दक्षिण गोव्याची स्थिती अधिकच गंभीर असेल, असे कोता म्हणाले.

नौदलाचा वावर वाढणार

कारवार येथे आशियातील सर्वांत मोठा नौदल तळ ‘प्रकल्प सीबर्ड’ नावाने उभारण्यात येत आहे. सध्या दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. तिसऱ्या टप्प्यात आपत्कालीन स्थितीत लढाऊ विमाने उतरविण्यास धावपट्टी बांधण्याचा प्रस्ताव आहे. कारवारमधील नौदलाच्या हालचाली जेवढ्या वाढतील, तेवढ्याच हंस तळावर वाढणार आहेत. विशेषतः विमानांची ये-जा वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात नौदलाला दाबोळी विमानतळाची पूर्णतः गरज भासेल, असे दिसते.

जो पैसा खर्च करणारा आंतरराष्ट्रीय पर्यटक गोंगाट असलेल्या उत्तर गोव्यापेक्षा दक्षिणेला जास्त पसंती देत असे, त्यामुळे दक्षिण गोव्यात तारांकित हॉटेल्सही जास्त होती. मात्र, आता विमान कंपन्या मोपाला जास्त पसंती देऊ लागल्यास दक्षिण गोव्याकडे पर्यटक पाठ फिरवतील.
- विजय सरदेसाई, अामदार.
कतार एअरवेज कंपनी दक्षिणेतील प्रवाशांना अमेरिका आणि इतर युरोपियन देशांत जाण्यासाठी एक उत्तम पर्याय होता. मात्र, आता ही कंपनी दाबोळी विमानतळावरील आपली सेवा बंद करणार असल्याने दक्षिण गोव्यातील प्रवाशांना असलेली ही सुवर्णसंधी संपुष्टात येणार आहे.
- एल्विस गोम्स, काँग्रेस नेते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT