Pravin Arlekar resignation Delhi trip
पणजी: गोव्यात नेतृत्वबदल घडवून आणण्यासाठी एका आमदाराला राजीनामा द्यायला लावून एक जबरदस्त राजकीय नाट्य निर्माण करण्याचा चाललेला प्रयत्न चहाच्या कपातील वादळ ठरले असून साखळीतील भागवत सप्ताहानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आसन आणखी भक्कम बनले आहे. या सप्ताहाला प्रवीण आर्लेकरांसह ख्रिस्ती आमदारांनीही उपस्थिती लावली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या प्रयत्नांना काटशह देत गेला आठवडाभर साखळीत राहून भागवत सप्ताहानिमित्ताने ईश्वर पारायणात दिवस घालविले. त्यानिमित्ताने त्यांचे राजकीय स्थान बळकट झाले व साखळीतील हजारो लोकांसमवेत दिवस घालविता आले. प्रतिदिनी या भक्ती कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित राहिले आणि मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक त्यांचे आदरातिथ्य केले.
भाजपचे बहुसंख्य आमदारही मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन आले. त्यात विशेष उल्लेखनीय उपस्थिती वादग्रस्त आमदार प्रवीण आर्लेकर यांची होती. यानिमित्ताने आर्लेकरांचा मुख्यमंत्र्यांच्या गटात समावेश झाला.
गेल्या आठवड्यात या राजकीय नाट्याची सुरुवात झाली ती एका बातमीने; जी एका मराठी वृत्तपत्रात पेटली गेली - ज्यात म्हटले होते की, पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर दिल्लीत जाऊन आमदारकीचा राजीनामा देऊ शकतात. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहारचे तत्कालीन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे गोव्यात येऊन मुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारू शकतात. त्यांना नंतर पेडण्यातून जिंकून आणण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधी गटातील नेते तयार झाले आहेत.
‘गोमन्तक’ने या कथित उलाढालींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधला असता, असे काही घडत नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. पक्षश्रेष्ठींकडे हा विषय पोहोचलेला नाही; राजेंद्र आर्लेकरांशी कोणी बोललेले नाही आणि आर्लेकर स्वत:हून असे प्रयत्न करणाऱ्यांपैकी नाहीत, अशी माहिती उघड झाली.
जरी प्रवीण आर्लेकरांना दिल्लीत जाण्यास ‘तयार’ करण्यात आले असले तरी पेडण्याचे आमदार त्यासाठी मनाने कधी तयार झालेच नाहीत. कोणी कितीही ‘ऑफर’ दिली तरी आपण आमदारकी सोडणार नाही, असे त्यांच्या मनाने घेतले व ते दिल्लीला गेलेच नाहीत. बातमी प्रसिद्ध होताच मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांची भेट घेऊन एकदा पणजी व त्यानंतर साखळीत आर्लेकर-प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्यात अनेक प्रश्नांवर समझोते झाले; त्यात ‘सनबर्न’चाही विषय निकाली निघाला.
‘‘आपण कधीही राजीनामा देण्याची तयारी दर्शविली नाही की, दिल्लीहून आपल्याला बोलावणे आले’’, अशी ‘मन की बात’ प्रवीण आर्लेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली, असे सूत्रांनी या प्रतिनिधीला सांगितले.
गोव्यातील चहाच्या कपातील वादळ शमते न शमते तोच बिहारचे राज्यपाल - ज्यांचा या नाट्यासाठी वापर केला जात होता, त्यांचीही बदली केरळला झाली व या वादावर संपूर्णत: पडदा पडला. बिहारमध्ये जानेवारी महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तेथील मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मुस्लिमांचे समाधान करणारा राज्यपाल हवा होता. त्यांची ती मनोकामना पक्षश्रेष्ठींनी पुरी केली.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुका व बिहार निवडणूक यांमुळे पक्षश्रेष्ठींना गोव्याच्या मंत्रिमंडळ बदलाकडे लक्ष द्यायला अवधी मिळत नाही. त्यामुळे गेले तीन महिने अडून राहिलेली पुनर्रचना आणखी पुढे गेली आहे. त्यात किमान तीन मंत्र्यांची गच्छंती अटळ आहे. मुख्यमंत्र्यांनाही हा बदल पुढे जात असल्याचे समाधान आहे. त्यांना लागलीच बदल करून भाजप सदस्यांमध्ये नवी खदखद निर्माण करायची नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे सार्वजनिक बांधकाम खात्यासह महत्त्वपूर्ण खाती असून ती त्यांना लागलीच सोडायची नाहीत.
१. मुख्यमंत्री बनण्याच्या अनेकांच्या सुप्त इच्छा आहेत; परंतु आपल्याला ते स्थान मिळत नसल्यास बिहारहून राजेंद्र आर्लेकरांना गोव्यात आणण्याचा ‘तो’ बेत होता.
२. त्यासाठी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकरांनी राजीनामा द्यावा व ती जागा रिकामी करावी, असा राजकीय कट शिजला होता.
३. प्रवीण आर्लेकरांना या कटात भागीदार करून घेताना काही सौदा ठरला होता का, याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू असून आर्लेकरांनी त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.
४. आर्लेकरांनी राजीनामा द्यायला नकार तर दिलाच, शिवाय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कृपाशीर्वाद घेतले. ते संपूर्ण वेळ भागवत कथा ऐकण्यात रमले.
५. भागवत सप्ताहानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी भाजप आमदारांची एकच रिघ लागली व त्या सर्वांनी प्रमोद सावंतांना आपला पाठिंबा जाहीर केला. या सप्ताहानिमित्ताने डिचोली तालुक्यातही मुख्यमंत्र्यांचे वजन वाढले.
६. सर्वांत महत्त्वाचा विषय आहे ‘सनबर्न’चा. आर्लेकर इतके दिवस या महोत्सवाला विरोध करीत होते; परंतु मुख्यमंत्र्यांची ‘भेट’ होताच त्यांचा विरोध मावळला व आर्लेकर गायब झाले, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.