पर्वरी: उत्तर ते दक्षिण गोव्याला जोडून ठेवणाऱ्या या प्रकल्पाला स्थानिकांनी थोडीशी कळ सोसून मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. विनाकारण कोर्टाच्या पायऱ्या चढून या प्रकल्पात अडचणी निर्माण करू नये आणि वर्ष २०२६ पर्यंत नक्कीच या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
या प्रकल्पासाठी जवळपास साडेसहाशे कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले गेल्याने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. आरआर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीने गेल्या चार महिन्यात सत्तर टाके काम पूर्ण केलं आहे.
फक्त चार महिन्यात एवढ्या मोठ्या प्रकल्पाचं अर्ध्यापेक्षा अधिक काम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी बांधकाम कंपनीचे कौतुक केले, कारण वर्दळीच्या भागात एखादा नवीन प्रकल्प हाती घेणं ही कठीण गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री सावंत म्हणाले. खरतर ऑक्टोबर २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण केला जाऊ शकतो, या प्रकल्पाला तेवढी वेळेची मर्यादा आहे, मात्र तरीही बांधकाम कंपनी हा प्रकल्प ऑगस्ट २०२६ पर्यंतच बांधून पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे.
एखाद्या प्रकल्पाचे काम सुरु आहे म्हणजे काहीशी कळ ही सोसावी लागणारच, पण म्हणून त्यासाठी वेळोवेळी कोर्टात जाऊन प्रकल्पाच्या बांधणीत अडथळा निर्माण करू नये असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी गोमंतकीयांना केलं आहे. येणारे तीन महिने फक्त स्थानिकांना त्रास सहन करावा लागेल कारण पाऊस सुरु झाल्यानंतर धुळीचा त्रास होणार नाही.
राज्याचे पर्यटनमंत्री आणि पर्वरीचे आमदार रोहन खवंटे यांनी राज्यातील पहिला-वहिला ५ किलोमीटरचा उड्डाणपूल पर्वरीत उभारण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. एवढा मोठा प्रकल्प पूर्ण व्हायचा म्हणजे काहीसा वेळ जाणं साहजिक आहे, मात्र यात वाहनचालकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जातेय असं रोहन खवंटे म्हणाले. आज आपण थोडासा त्रास सहन करू मात्र या सहापदरी उड्डाणपुलाच्या फायदा संपूर्ण गोव्याला होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.