Portuguese Era Goa Dainik Gomantak
गोवा

Portuguese Era Goa : अठराव्या शतकातील नव्या काबिजादीतील राजकारण

विशाल मराठा साम्राज्याचा धाक सर्वच विदेशी सत्तांवर बसला होता. त्यात गोव्याच्या पोर्तुगिजांचाही समावेश होता. अठराव्या शतकात पोर्तुगिजांचे राजकीय महत्त्व कमी होऊ लागले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Portuguese Era Goa : सतराव्या शतकामध्ये सन 1663 ते 75 या काळात नवी काबिजादीचा ताबा आदिलशहाकडून छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला. पुढे नव्या काबिजादीवर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांच्याकडे वारसा हक्काने राजा म्हणून ताबा राहिला. कोकणपट्टीत मोडणाऱ्या गोव्यातील नव्या काबिजादीचा भागही छत्रपतींच्या राज्यात समाविष्ट होता. छत्रपती राजाराम महाराजांना तामिळनाडू येथील जिंजी येथे आश्रय घ्यावा लागला. हिंदवी स्वराज्य वाचावे, टिकावे म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनीसुद्धा आपल्या सरदारांना व वतनदारांना जहांगिरी द्यायला सुरुवात केली.

छत्रपती राजाराम आणि मोगल बादशहा औरंगजेब यांचे जहागिरी द्यायच्या धोरणाचा व्यवस्थित फायदा कोणी घेतला असेल तर सावंतवाडीच्या लखम सावंतांनी व सौंध्याच्या सदाशिव सौंधेकरांनी. त्याकाळातील मराठा-मोगल सत्तासंघर्षात सावंतवाडकर व सौंधेकरांनी दोघांकडे करार करत जहागिरी मिळविल्या. मोगल-मराठा संघर्षात औरंगजेबाच्या मृत्यूने दक्षिण भारतातील मोगल शासकांचा अंमल दूर होऊन छत्रपतींचा अंमल सुरू झाला. त्यामुळे, वरील दोन्ही वतनदारांनी छत्रपती शाहू महाराजांकडे निष्ठा व्यक्त करत छत्रपतींचे जहागीरदार म्हणून गोव्यातील नव्या काबिजादीवर राज्य करू लागले. सावंतांना कुडाळसह आजच्या गोव्यातील पेडणे, डिचोली, सत्तरी महालाची जहागिरी मिळाली. तर सौंधेकरांना अंत्रुज ऊर्फ फोंडा महालासह आजच्या सांगे, केपे, काणकोणसह कारवार, अंकोला, सौंधे अशी जहागिरी मिळाली.

अठराव्या शतकाच्या सुरुवातीला नव्या काबिजादीतील पेडणे, डिचोली, सत्तरीवर सावंतवाडीकरांचा आणि फोंडा, केपे, सांगे, काणकोणवर सौंधेकरांचा, छत्रपतींचे जहागीरदार म्हणून अंमल सुरू झाला. या काळाच्या अगोदर वरील भागाशी या दोन्ही जहागीरदार राजांचा या भागाशी काडीमात्र संबंध नव्हता. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला छत्रपती शाहूंच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली बालाजी विश्वनाथ पेशवा, थोरले बाजीराव, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, उदाजी पवार, पिलाजी गायकवाड, परसोजी भोसले, घोरपडे बंधू यांनी हिंदवी स्वराज्याचे रूपांतर भव्य विशाल मराठा साम्राज्यात केले. उत्तरेत पंजाब सरहद्दीपासून ते दक्षिणेत कर्नाटकातील तुंगभद्रापर्यंत तर पूर्वेस गुजरातपासून पश्चिमेस ओरिसापर्यंत मराठा साम्राज्य पसरले. मोगल साम्राज्य पुरते खिळखिळे होऊन मोगल बादशहाची सत्ता दिल्लीच्या लाल किल्ल्यापुरतीच सीमित राहिली. या विशाल मराठा साम्राज्याचा धाक सर्वच विदेशी सत्तांवर बसला होता. त्यात गोव्याच्या पोर्तुगिजांवरही मराठा साम्राज्याचा वचक बसला होता.

अठराव्या शतकात पोर्तुगिजांचे राजकीय महत्त्व कमी होऊ लागले होते. इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या समुद्रातील संघर्षात पोर्तुगीज नाममात्र उरले होते. असे असूनही पोर्तुगिजांची पांथिक मग्रूरी तसूभरही कमी झाली नव्हती.

गोव्यातील सासष्टी, बार्देश, तिसवाडी व उत्तर कोकणातील प्रांत वसई, ठाणे, डहाणू यावर पोर्तुगिजांचे राज्य होेते. या भागातून छत्रपती शाहू व प्रधान बाजीराव यांच्याकडे हिंदूंच्या धार्मिक छळाच्या तक्रारी प्रचंड येत होत्या. पोर्तुगिजांना या भागातून कायमचे उखडून टाकण्याच्या निर्धाराने चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगिजांविरुद्ध वसई मोहीम झाली. तेव्हा गोव्यात पोर्तुगिजांच्या शेजारी असलेल्या छत्रपतींच्या जहागिरदारांनाही पोर्तुगिजाविरुद्धच्या मोहिमेत सामील केले. पोर्तुगीज वसईतून पूर्णपणे उखडून निघाले, परंतु गोव्यातील स्थानिक वतनदार, व्यापारी यांच्या कृपेने गोव्यातील पोर्तुगिजांचे राज्य वाचले. तेव्हा पोर्तुगिजांना दोन गोष्टींचे भान आले.

पहिले म्हणजे गोव्यातील पोर्तुगीज सत्तेशेजारील नव्या काबिजादीवर प्रत्यक्षात छत्रपती वा पेशव्यांचा अधिकार नसावा. हा भाग सावंतवाडकर व सौंधेकरांच्या ताब्यात असावा. दुसरा महत्त्वाचा भाग हा की आता हिंदू धर्मात व धर्मस्थळांवर अत्याचार केले तर गोव्यातीलही अस्तित्व टिकणार नाही.अठराव्या शतकाच्या शेवटच्या काळात पानिपतच्या पराभवानंतर मराठा साम्राज्यात अव्यवस्था निर्माण झाली. त्याचा फायदा घेत पोर्तुगिजांनी सन 1763 मध्ये फोंडा महाल पेशव्यांकडून व सन 1764 मध्ये उर्वरित सांगे, केपे, काणकोण सौंधेकरांकडून जिंकून घेतले. पुढे 1785 च्या काळात सावंतवाडकरांकडून पेडणे, डिचोली, सत्तरी हे महाल जिंकून घेतले. परंतु हे महाल जिंकून घेताना पोर्तुगिजांनी जाहीरनामा काढून हिंदू धर्मीयांना आश्वासन दिले की पोर्तुगीज नव्या काबिजादीतील हिंदू धर्माला व मंदिरांना हात लावणार नाहीत.

-सचिन मदगे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT