St. Francis Xavier : नुकतेच सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त होते. सर्व समुदाय सण साजरा करत असल्याने सार्वजनिक सुट्टीही होती. कॅथलिक समुदायासाठी ते अत्यंत आदरणीय संत आहेत, त्यांना ‘गोंयचो सायब’ म्हणून संबोधले जाते. या गोंयचो सायब संबोधनावरून गेल्या वर्षी वाद झाला होता, जो या वर्षीही सुरू झाला आणि पुढल्या वर्षीही 3 डिसेंबरच्या दरम्यान सुरू होईल.
आपल्यामध्ये असे बरेच लोक आहेत जे पूर्णपणे धार्मिक नसतील, पण माणूस म्हणून खूप चांगले आहेत, ज्यांना अन्य समुदायांतील लोकांची काळजी आहे. संत फ्रान्सिस झेविअर यांच्याबद्दल लोकांच्या मनात आजही गाढ श्रद्धा आहे.
माझ्या घराजवळच राहणारी माझी ऐंशी वर्षांची मैत्रीण, डॉक्टर आहे आणि एक नर्सिंग होम चालवते. नऊ दिवस होणाऱ्या ‘नोवेना’तील सकाळच्या 7 वाजताच्या सामूहिक कार्यक्रमास अत्यंत निष्ठेने उपस्थित राहते. त्यासाठी सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडते. स्वत: वाहन चालवून दररोज जवळजवळ 80 किमी प्रवास ती करते. ‘प्रार्थना तर घरूनही केली तरी पोहोचते’ असे तिच्या यजमानांनी ते हयात असताना तिला म्हटले होते. त्यावर तिने, ‘मी आई, पत्नी आणि डॉक्टर म्हणून सर्व भूमिका पार पाडते. मी आपल्या कर्तव्याचा भक्तिभावाने आदर करते, आपण माझ्या भक्तिभावाचा आदर करावा.’, असे म्हणत प्रेमळपणे त्यांची समजूत काढली.
सुमारे तीन दशकांहून अधिक काळापूर्वी, जेव्हा माझे लग्न नुकतेच ठरले होते, त्या दरम्यान सायबाचे फेस्त होते. हा योग जुळून आल्याने मला खूप आनंद झाला होता. त्यावेळी आम्ही दोघांनी एकमेकांसमवेत घालवलेले ते क्षण आजही स्मरतात. संत झेव्हियरच्या साक्षीने जे पवित्र अनुबंध जुळले ते कायमचेच. राष्ट्रपित्याचे स्थान जे माझ्या आईवडिलांच्या आयुष्यात होते, तेच स्थान आम्हा दोघांच्याही आयुष्यात गोंयच्या सायबाचे आहे. माझ्या आईवडिलांचे नाते ती दोघेही काळाच्या पडद्याआड जाईतो, टिकून होते तसेच आमचेही नाते गेली चाळीस दशके टिकून आहे व यापुढेही राहील. श्रद्धेचे, आशीर्वादाचे सामर्थ्य काय असते, ते वेगळे सिद्ध करण्याची आवश्यकताच नाही. श्रद्धा, मग ती महात्म्यावर असो की सेंट फ्रान्सिस झेवियरवर, त्याने काही फरक पडत नाही. कारण प्रत्येकाचा तो व्यक्तिगत अधिकार आहे. ज्याचा ज्याच्यावर विश्वास, श्रद्धा आहे त्याच्यावर त्याने तो ठेवावा. आपल्या राज्यघटनेनेच प्रत्येक नागरिकाला आपल्या पंथाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. मिशनरी आणि त्यांच्या कारवायांविरुद्ध राजकारणी बोलतात, पण स्वतःच्या मुलांना मात्र या मिशनरी शाळांमध्ये पाठवतात. त्यांच्या दांभिकपणातच त्यांच्या विरोधाचे रहस्य दडले आहे.
संत फ्रान्सिस झेवियर यांना अनेक लोक पूज्य मानतात कारण त्यांच्या हस्तक्षेपामुळेच अनेक वेळा गोवा वाचला. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांनी सतराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात पोर्तुगीजांकडून गोवा काबीज करण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांना कोकणावर ताबा मिळवून आपला तळ सुरक्षित करायचा होता आणि ते गोवा काबीज करूनच साध्य केले जाऊ शकत होते. दुसरीकडे पोर्तुगीज हे दख्खनमधील मुघलांच्या प्रगतीला फारसे अनुकूल नव्हते, परंतु ते मराठ्यांना मोठे शत्रू मानत असल्याने त्यांनी मुघलांना त्यांच्या प्रदेशातून सर्व सोयी आणि मुक्त मार्ग दिला. ‘मराठ्यांनी बदला म्हणून गोव्यातील अनेक गावे लुटली आणि जाळली, लहान मध्यम आकाराच्या बोटी ताब्यात घेतल्या आणि दोन पोर्तुगीज ख्रिस्ती पंथोपदेशकांना 1682 साली तुरुंगात टाकले.’, असा उल्लेख पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांनी त्यांच्या ‘पोर्तुगीज-मराठे संबंध’ या पुस्तकात केला आहे.
चौल किल्ला ताब्यात घेण्याचे अयशस्वी प्रयत्न संभाजी महाराजांनी जुलै आणि ऑगस्ट 1683 दरम्यान केले. मराठ्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याच्या उद्देशाने पोर्तुगीज व्हाईसरॉय मोठ्या फौजा व तोफखाना घेऊन ऑक्टोबर 1683 मध्ये फोंड्याच्या दिशेने निघाले आणि संभाजी महाराजांच्या अधिपत्याखालील एक महत्त्वाचे बंदर असलेल्या दुर्भाट येथे उतरले. फोंड्याचे देसाई, दुलबा नाईक हे संभाजी महाराजांच्या विरोधात गेले आणि पोर्तुगीजांना सामील झाले. मराठ्यांनी त्यांच्या मर्यादित साधनसामग्रीने आणि सैन्यानिशी किल्ल्याचे रक्षण केले. पोर्तुगीजांच्या तोफखान्याला किल्ल्याची भिंत फोडण्यात यश आले, तरीही मराठ्यांनी शरणागती पत्करली नाही. या वेढ्याची बातमी मिळताच संभाजी महाराज 9 नोव्हेंबर 1683 रोजी फोंडा येथे 600 सैनिकांसह किल्ल्यावर पोहोचले. व्हाईसरॉय कोंद द आल्व्हारो आता असहाय्य झाले होते आणि अचानक वेढा सोडला होता. संभाजी महाराजांनी जुना किल्ला मोडून टाकला आणि त्याजवळच मर्दनगड नावाचा नवीन किल्ला बांधला.
पोर्तुगीजांना हुसकावून लावण्याचा शेवटचा प्रयत्न
25 नोव्हेंबरच्या रात्री संभाजी महाराजांनी जुवे बेटावर (सांत इस्तेव्ह) ताबा मिळवत केला आणि धावजी खिंडीतून तिसवाडीत प्रवेश केला. रात्री 10 वाजता गोव्यात धोक्याची घंटा वाजू लागली आणि लोकांना मराठ्यांच्या येऊ घातलेल्या हल्ल्याबद्दल सावध करण्यात आले. शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेले पोर्तुगीज पंथगुरू चर्चमधून बाहेर पडत पूर आलेल्या मांडवीजवळ जमले. व्हाईसरॉय रात्रभर थांबले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बेटाकडे कूच केले आणि मराठ्यांशी घनघोर युद्ध केले. तथापि, मराठा घोडदळांनी पोर्तुगीजांवर मात केली आणि सैन्य अस्ताव्यस्त झाले. पोर्तुगीजांनी नदीच्या बाजूला असलेल्या शेतांचे बंधारे उद्ध्वस्त केले ज्यामुळे नदीची रुंदी वाढली.
खंडो चिटणीस यांनी जीव धोक्यात घालून संभाजी महाराजांना घोड्यासह बुडण्यापासून वाचवले. पाणी ओसरल्यावर हल्ला करायचा होता, पूर वाढतच होता. तरीही हल्ला सुरू झाला. पोर्तुगीज, ज्यांना रेकॉर्डमध्ये फिरंगी म्हणून संबोधले जाते, त्यांच्याकडे मजबूत शस्त्रास्त्रे होती. 26 नोव्हेंबर 1683 च्या दुपारपर्यंत संभाजी महाराजांचे सैन्य जुवेमध्ये होते, परंतु पोर्तुगीजांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि स्वतःला किल्ल्यात बंदिस्त केले. हे बेट मृतांचे बेट (इल्हा दोस मोर्तोज) म्हणून ओळखले जात असे. संभाजी महाराजांनी डिसेंबर 1683 मध्ये बार्देश आणि सासष्टीवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावे जाळणे, लुटणे आणि पुरुषांना गुलाम म्हणून पकडणे सुरू केले. त्यांनी अनेक किल्ले ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून तोफखाना हिसकावून घेतला. हा प्रकार जवळपास 26 दिवस चालला. व्हॉईसरॉयने 13 डिसेंबर 1683 च्या आपल्या घोषणापत्रात म्हटले आहे की, ‘मराठ्यांनी जाहीर केले होते की यापुढे गोव्यात पोर्तुगीज किंवा ख्रिश्चनांचा कोणताही मागमूस सापडणार नाही.’
या कठीण परिस्थितीतच व्हाईसरॉयने कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जुन्या गोव्यात जतन केलेल्या संत झेवियरच्या शवाची करुणा भाकली. असे मानले जाते की, या दैवी हस्तक्षेपामुळे शाहआलमच्या आगमनाची बातमी जानेवारी 1684 मध्ये आली आणि संभाजी महाराजांनी चालवलेल्या गोव्याच्या विद्ध्वंसातून पोर्तुगीजांची सुटका झाली. कारण, शाहआलम आल्याची बातमी येताच संभाजी महाराजांनी युद्ध थांबवले आणि रायगडावर परत धाव घेतली. परंतु, त्यानंतरही 1689 साली संभाजी महाराजांची हत्या होईपर्यंत अधूनमधून लढाया सुरूच राहिल्या.
मराठ्यांच्या संभाव्य हल्ल्यापासून बचावाचा उपाय म्हणून व्हाईसरॉयने आपली राजधानी मुरगाव किल्ल्यावर हलवण्याचा निर्णय घेतला. शाह आलम जानेवारी 1684 साली डिचोलीला पोहोचला नसता तर त्या वर्षी संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांची सत्ता भारतातून पुसून टाकली असती. 30 ऑगस्ट 1954 च्या अमेरिकन लाइफ मासिकात ‘संतांची मदत मागितली जाते’ या शीर्षकाच्या सचित्र लेखाचा आणखी एक संदर्भ आहे. यावेळची घटना म्हणजे 15 ऑगस्ट 1954 रोजी सत्याग्रहींनी केलेला प्रयत्न. ‘एक हास्यास्पद लहान गट, ज्यात बहुतेक किशोरवयीन आणि काही बेरोजगार युवक.’, असे लेखकाने सत्याग्रहींचे वर्णन केले आहे. एका चित्रात काही गोमंतकीय सेंट फ्रान्सिस झेवियरच्या संरक्षण मागण्यासाठी बॉम जीझस चर्चकडे जात असताना दाखवले. सर्व युरोपीय सत्ता मागे हटल्यानंतरच या उपखंडातून पोर्तुगिजांना जायचे होते. त्यांचा असा दृढ विश्वास होता की, त्यांच्यावर संत फ्रान्सिस झेविअरचा कृपाशीर्वाद आहे आणि तोपर्यंत भारतात त्यांचे संरक्षण संत करत आहे. त्या काळात पोर्तुगीजांनी संताला त्यांच्या दैवी हस्तक्षेपासाठी प्रार्थना केली आणि विश्वास ठेवला ते त्यांचे संरक्षण करतील. आज वसाहतोत्तर काळात सर्व गोमंतकीय संतावर विश्वास ठेवतात आणि त्यामुळे त्यांची कृपा अजूनही तशीच सर्वांवर आहे!
शतकानुशतके आपल्यावर झालेल्या कृपाशीर्वादासाठी, गोव्यातील सर्व जातीधर्माच्या लोकांनी संत फ्रान्सिस झेविअर यांना ‘गोंयचो सायब’ म्हटले आहे. भूतकाळात झालेल्या जखमा विसरून पुढे जाण्यासाठी, शरीराला स्वास्थ्य आणि आत्म्याला शांतता देण्यासाठी संत झेविअर यांच्यावर असलेली श्रद्धा, दृढ विश्वास हा रामबाण इलाज आहे.
राजकारणी जेव्हा मतपेटीवर डोळा ठेवून इतिहासाचा वापर करतात, तेव्हा त्यांच्या हेतूवर संशय घेण्यास वाव राहतो. प्रत्येकाला सश्रद्ध असण्याचा अधिकार आहे. आपल्या श्रद्धा जपताना इतरांच्या श्रद्धांचा आदर होणेही तितकेच आवश्यक आहे. श्रींच्या जन्मभूमीविषयी लोकश्रद्धेचा आदर सर्वोच्च न्यायालयानेही केला आहे.
-सुशीला सावंत मेंडीस
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.