
धास्तावलेल्या गोमंतकीयांना आरजी व फॉरवर्ड यांच्या संभाव्य युतीत आशेचा किरण दिसायला लागला आहे. आता ही आशा प्रत्यक्षात उतरते की नाही, याचे उत्तर मिळण्याकरता आणखी थोडे दिवस थांबावे लागणार आहे.
सध्या आरजी म्हणजे रिव्होल्यूशनरी गोवन्स आणि गोवा फॉरवर्ड यांची युती होण्याचे संकेत मिळत आहेत. काही मुद्द्यांवर ते एकत्र आल्याचे बघायला मिळत आहे. खरे तर सध्या मूळ मुद्दा आहे तो गोंयकरपणाचा. मूळ गोमंतकीयच आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हळूहळू त्यांचे अस्तित्वच पुसट व्हायला लागले आहे आणि आपली ‘व्होट बँक’ वाढविण्याकरता आमचे राजकारणी बाहेरच्या लोकांचे अस्तित्व जोपासण्याच्या खटाटोपात दिसत आहेत.
त्यामुळे मूळ गोमंतकीय दिशाहीन झाल्यासारखा वाटायला लागला आहे. दिल्लीस्थित लोक आज गोव्याच्या जमिनी चढ्या भावाने विकत घेताना दिसत आहेत. त्यामुळे आज गोव्यातील जमिनीच्या किमती आकाशाला स्पर्श करायला लागल्या आहेत. असे होऊनसुद्धा सरकारला बाहेरच्या लोकांना जमीन विक्री करण्यावर बंदी घालण्याचा कायदा करण्याची बुद्धी होत नाही. त्यामुळेच आज गोव्यात बाहेरच्या लोकांचे पीक यायला लागले आहे. अशावेळी आरजीसारख्या पक्षाची आठवण होणे साहजिकच आहे.
गेल्या निवडणुकीत कोणाचाही पाठिंबा न घेता या पक्षाने १०% मते घेतली होती हे विसरता कामा नये. आज त्यांचा एक आमदारही विधानसभेत आहे. काही मतदारसंघात त्यांनी घेतलेली झेप तर वाखणण्यासारखीच. शिरोडा मतदारसंघात आरजीचे उमेदवार शैलेश नाईक यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत ५,०६३ मते पडून ते तिसऱ्या क्रमांकावर आले होते. ही मते काँग्रेसला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त होती हे विशेष.
याचा अर्थ गोव्यात आरजीची शक्ती तयार होत आहे असा होऊ शकतो. आणि सध्या राज्यातील अनेक मतदारसंघात त्यांनी ज्या प्रकारे कार्यालये उघडण्याचा सपाटा लावला आहे, ते पाहता या अर्थाला अधिकच बळकटी प्राप्त होते. दुसऱ्या बाजूला गोवा फॉरवर्डनेही हाच मुद्दा लावून धरला आहे. त्यांच्याजवळ विजय सरदेसाईंसारखा प्रभावी नेताही आहे. पण त्यांची शक्ती आज तरी मर्यादित वाटत आहे.
हा पक्ष स्वबळावर भाजपला टक्कर देऊ शकेल अथवा सरकार स्थापन करू शकेल असे सध्या तरी वाटत नाही. पण त्यांना आरजीची साथ मिळाली आणि काँग्रेसने हात पुढे केला तर आगामी निवडणुकीत नक्कीच चमत्कार घडू शकतो. आणि अशा प्रकारची युती होण्याची संभावना निर्माण व्हायला लागली आहे.
आम आदमी पक्ष जरी वेगळी भाषा बोलत असला तरी आरजी व गोवा फॉरवर्ड तसेच काँग्रेस एकत्र आल्यास एक नवे समीकरण निर्माण होऊ शकते. गोव्याला मुक्ती मिळण्यापूर्वी म्हणजे १९ डिसेंबर १९६१पूर्वी जे गोव्यात जन्मले ते व त्यांचे वारसदार हेच खरे गोमंतकीय असे आरजीचे ‘पोगो बिल’ सांगते. आणि मूळ गोमंतकियांची व्याख्या हीच आहे. पण आज या व्याख्येला डांबर फासून बाहेरच्यांना गोमंतकीय बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
त्यामुळे मूळ गोमंतकीयांना उपेक्षित जीवन जगणे भाग पडायला लागले आहे. गोव्यातील युवकांना नोकऱ्यांकरता इतर राज्यांत वा परदेशात जाणे भाग पडायला लागत आहे. हे थांबवण्याकरता आरजी व फॉरवर्ड जवळ येणे अत्यंत आवश्यक असल्याचे गोव्यातील अनेकांना सध्या वाटायला लागले आहे. राजकारणापेक्षा सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे तो गोमंतकीय अस्मितेचा आणि सध्याची स्थिती पाहता पुढील दहा वर्षांत मूळ गोमंतकीय नामशेष झाल्याशिवाय राहणार नाहीत अशीच अनेकांची धारणा बनायला लागली आहे. राजकारणी जरी मतपेढी करता या बाहेरच्यांना आज गोंजारत असले तरी कालांतराने हे लोक ’भस्मासुर ’होण्याची शयता अधिक वाटते.
मुरगाव तालुयातील साकवाळ पंचायतीच्या सरपंचपदी नुकत्याच आरूढ झालेल्या अनुषा लमाणी ही याची नांदीही ठरू शकते. भविष्यात असे अनेक बिगर गोमंतकीय आमदार मंत्री वा मुख्यमंत्रीही होऊ शकतात. त्यावेळी गोमंतकीय ’देख तमाशा देख’ असे म्हणण्यापलीकडे काहीही करू शकणार नाहीत, हेही तेवढेच खरे आहे.
कालचा ’सुशेगाद’ गोवा आज गुन्हेगारीचे आगर बनायला लागला आहे तो याच बाहेरच्या लोकांकरता हे विसरता कामा नये. आणि यामुळेच धास्तावलेल्या गोमंतकीयांना आरजी व फॉरवर्ड यांच्या संभाव्य युतीत आशेचा किरण दिसायला लागला आहे. आता ही आशा प्रत्यक्षात उतरते की नाही, याचे उत्तर मिळण्याकरता आणखी थोडे दिवस थांबावे लागणार आहे, एवढे मात्र खरे!
- मिलिंद म्हाडगुत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.