Ponda And Sanquelim Municipal Council 2023 Dainik Gomantak
गोवा

Ponda- Sanquelim Municipal Council Election Result : विक्रमी मतदान, घसरलेला टक्का कुणाला देणार कौल ?

दैनिक गोमन्तक डिजिटल

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या साखळी पालिकेत झालेले विक्रमी मतदान आणि फोंड्यात घसरलेला मतदानाचा टक्का कुणाच्या बाजूने निकाल देणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून उद्या, रविवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सकाळी 11 वाजेपर्यंत सर्व प्रभागांचे निकाल हाती येतील, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या झालेल्या साखळी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 10 प्रभागांकरिता 31 उमेदवार रिंगणात आहेत. इथे सरासरी 87.56 टक्के मतदान झाले असून साखळी हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ असल्याने राज्याचे लक्ष या नगरपालिकेच्या निकालाकडे लागले आहे. भाजपकडून हा गड जिंकण्यासाठी अनेक प्रकारच्या रणनीती आखण्यात आल्या होत्या.

त्या कितपत यशस्वी होणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या पालिकेची जबाबदारी घेतली होती आणि युवा मोर्चा, महिला मोर्चासह सर्वांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या.

प्रत्येक प्रभागामध्ये मतदार प्रत्यक्ष मतदान करेपर्यंत ही जबाबदारी संबंधितांवर होती. फोंड्यात २ प्रभागांमध्ये निवडणुकीआधीच आपले उमेदवार निवडून आणण्यात मंत्री रवी नाईक यांना यश आले आहे.

सात वाजता उघडणार स्ट्रॉंग रूम

फोंडा आणि साखळी पालिकेसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर या सर्व मतपेट्या मतमोजणी केंद्राशेजारी उभारलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून उद्या, रविवारी सकाळी सात वाजता उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडण्यात येईल आणि तिथून त्या मतमोजणी केंद्रावर नेण्यात येतील.

मतमोजणीसाठी केंद्रे सज्ज

निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे या दोन्ही पालिकांची मतमोजणी आज सकाळी 8 वाजता सुरू होणार असून साखळीत ती बहुउद्देशीय सभागृहात होईल. तर फोंडा पालिकेची मतमोजणी गव्हर्मेंट कॉम्प्लेक्स, तिस्क-फोंडा येथे होईल. मतमोजणीसाठी ही दोन्हीही मतदान केंद्रे सज्ज झाली असून 100 मीटर अंतरापर्यंत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

‘टुगेदर’ 8 जागा जिंकेल : ब्लेगन

‘टुगेदर फॉर साखळी’च्या उमेदवारांना वाढीव मतांचा फायदा होईल. दहापैकी ‘टुगेदर’चे आठ उमेदवार निवडून येतील. इतर दोन ठिकाणी ५०-५० टक्के खात्री वाटते. परंतु यावेळीही सत्ता आमच्याकडेच राहील, असे प्रवीण ब्लेगन म्हणाले.

पोलिस दलाकडून मोठा फौजफाटा

साखळी पालिका निवडणूक खूपच चुरशीची झाल्याने मतमोजणी शांततेत पार पडावी, याकरता पोलिस दलाच्या वतीने उपअधीक्षक आणि निरीक्षकांच्या देखरेखीखाली मोठा फौजफाटा तैनात केला आहे. हीच परिस्थिती फोंडा येथेही आहे.

निवडणूक आयोगाने साखळी पालिकेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर आणि फोंडा पालिकेसाठी उपजिल्हाधिकारी रघुराज फळदेसाई यांच्या निरीक्षणाखाली विविध निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

वाढलेले मतदान कोणाच्या बाजूने?

साखळीत ‘टुगेदर फॉर साखळी’ पॅनेलच्या वतीने कडवी झुंज देण्यात धर्मेश सगलानी, राजेश सावळ, प्रवीण ब्लेगन कितपत यशस्वी झाले, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत. अनेक प्रभागांमध्ये 80 टक्क्यांच्या वर तर प्रभाग 7, प्रभाग 11, प्रभाग 12 मध्ये 90 टक्क्यांच्या वर मतदान झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघांत चुरस वाढली आहे. मात्र, हे वाढलेले मतदान कुणाला लाभणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

साखळी, फोंडयात प्रत्येकी दोन बिनविरोध :

साखळी पालिकेतून काँग्रेस गटाचे प्रवीण ब्लेगन, तर भाजप गटाचे रियाज खान बिनविरोध निवडून आले आहेत. तर फोंडा पालिकेतून भाजप समर्थक विश्वनाथ दळवी आणि विद्या पुनाळेकर बिनविरोध निवडून आले आहेत.

सत्ता भाजपचीच

राज्य सरकारने केलेल्या विकासाच्या आधारे तसेच केंद्र व राज्य सरकारने राबवलेल्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्यामुळे साखळी आणि फोंडा या दोन्हीही पालिकांमध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार बहुमताने निवडून येतील. भाजपची या दोन्ही पालिकांमध्ये सत्ता स्थापन होईल, यात शंका नाही.

- सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

"मतमोजणीसाठी आयोगाचे पोलिसांच्या सहकार्याने प्रयत्न सुरू आहेत. कडक पोलिस बंदोबस्त ठेवला असून मतमोजणी केंद्रावर उमेदवार किंवा त्यांनी जाहीर केलेले प्रतिनिधी यांना प्रवेश असेल. मतदान केंद्रांवर पुरेशी टेबल संख्या व कर्मचारी आहेत. याआधारे पहिल्या फेरीचा निकाल १० वाजेपर्यंत, तर दुसऱ्या फेरीचा निकाल ११ वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे."

- सागर गुरव, साहाय्यक संचालक, निवडणूक आयोग.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT