Ponda Municipality: फोंड्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या गर्दीमुळे नियोजनबद्धरीत्या शहराचा विकास करण्यासाठी फोंडा पालिकेने स्थानिक आमदार तथा राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांच्या सहकार्याने पुढाकार घेतला असून मंगळवारी फोंड्याचा मास्टरप्लॅन फोंडा पालिका सभागृहात सादर करण्यात आला
स्टुडिओपोड एजन्सीने हा आराखडा तयार केला आहे. टप्प्याटप्प्याने हा विकास करण्यात येणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात 315 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
यावेळी फोंड्यातील महत्त्वाच्या ठिकाणांचा विकास करताना फोंडावासीय तसेच शहरात येणाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचा इरादा या मास्टरप्लॅनमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
या मास्टरप्लॅनचे सादरीकरण करण्यात आले, त्यावेळेला कृषीमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष अर्चना डांगी तसेच इतर नगरसेवक व फोंड्यातील नागरिक उपस्थित होते.
फोंड्यातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग तसेच बसस्थानक परिसर, वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी नवीन मार्ग आणि विद्यार्थी वर्गाची सोय व्हावी, पालकांना पार्किंगची जागा, ई-बसगाड्यांची सोय, जुन्या बसस्थानकावरील गाड्यांच्या ठिकाणी अद्ययावत गाळे आदीची मास्टरप्लॅनमध्ये सोय केली आहे.
नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी फोंडावासीयांसाठी मास्टरप्लॅन खुला करून नंतरच अंतिम निर्णय घेऊ,असे सांगितले.
पुलाखालच्या जागेत उपक्रम !
फोंडा शहरातील उड्डाणपुलाखालची मोकळी जागा विविध उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे. मुंबईसह मोठ्या शहरात उड्डाणपुलाखालची जागा वापरून सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यात खाऊगल्ली ते वाचनालय, ज्येष्ठांसाठी विरंगुळा साधन व अनेक उपक्रमांचा समावेश आहे. याच धर्तीवर फोंड्यात मास्टरप्लॅनवर भर देण्यात येणार आहे.
चांगल्या सुविधा!
फोंडावासीयांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी मास्टरप्लॅनची निर्मिती करण्यात आली आहे. वाहने व वाढती गर्दी, मात्र जागा तीच असल्याने त्यातून सुवर्णमध्य काढून असलेल्या जागांचा वापर नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी होणार आहे. सर्वांचे त्यासाठी सहकार्य आवश्यक आहे. - रवी नाईक, कृषीमंत्री, गोवा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.